दुभंगलेली “साठी” तली शिवसेना!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी

महाराष्ट्रातील, मुंबईतील सर्व प्रकारच्या उपलब्ध नोकऱ्यांवर भूमिपुत्रांचा अर्थात स्थानिक तरुणांचा पहिला अधिकार आणि हक्क आहे. (Shiv Sena) अशी स्वच्छ, स्पष्ट भूमिका घेऊन प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांच्या प्रोत्साहनातून बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली. सत्तेपर्यंत पोहोचलेल्या शिवसेनेचा शुक्रवारी “साठी”तला वर्धापन दिन होता आणि तो ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर दोन ठिकाणी संपन्न झाला आहे. दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या वर्धापन दिन मेळाव्याला शिवसैनिकांची गर्दी होती. आमचीच शिवसेना खरी आहे असा दावा दोन्ही मेळाव्यातून करण्यात आला असला तरी सर्वोच्च न्यायालयाने त्यावर अद्याप शिवसेना कोणाची यावर शिक्कामोर्तब केलेले नाही.

गोरेगाव येथील नेस्को सेंटर मध्ये एकनाथ शिंदे यांच्या तर षन्मुखानंद हॉलमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा वर्धापन दिनानिमित्त चा मेळावा झाला. आणि दोन्ही मेळाव्यांना ऑपरेशन टायगर आणि ऑपरेशन तुडवा अशी गडद पार्श्वभूमी होती. दोन्ही ठिकाणी शिवसैनिकांमधील उत्साह सारखाच दिसत होता. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी भगव्या रंगाचा कुर्ता परिधान केला होता . बाळासाहेब ठाकरे यांचे सध्या जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे. या शताब्दीतच ऑपरेशन टायगर च्या माध्यमातून उद्धव ठाकरे गटाचे सहा खासदार फुटले.अर्थातच हे सहा खासदार षण्मुखानंद हॉलमध्ये उपस्थित नव्हते म्हणजे त्यांनी अगदी अधिकृतपणे ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केला आहे असे म्हणता येईल. अर्थातच त्या फुटीर खासदारांच्या बद्दल उपस्थित शिवसैनिकां मध्ये संतापाची भावना या मेळाव्यात दिसत होती. कवी नितीन चंदनशिवे यांनी त्यांच्या भाषणात शिवसैनिकांची संतापाची प्रातिनिधिक स्वरूपातील भावना व्यक्त केली. आदित्य ठाकरे यांनी युवा कार्यकर्त्यांना सोबत घेऊन महाराष्ट्र पिंजून काढावा असे आवाहन त्यांनी केले. (Shiv Sena) तेव्हा आदित्य यांनीही टाळी वाजवून त्याला प्रतिसाद दिला.

गोरेगाव येथील नेस्को सेंटर मध्ये उत्साहाचे वातावरण होते. एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांचे सर्व सहकारी व्यासपीठावर उपस्थित होते. मात्र ते सहा खासदार व्यासपीठावर दिसले नाहीत त्यामुळे ऑपरेशन टायगर चा सस्पेन्स वाढला आहे. नेस्को सेंटर मध्येही शिवसैनिकांची गर्दी उसळलेली होती. तिथेही उत्साही वातावरण होते. ऑपरेशन टायगर बद्दल एकनाथ शिंदे हे काय बोलतात याचे सर्वांनाच औत्सुक्य होते. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भाषणात, ऑपरेशन टायगर नंतर त्यांच्यावर होत असलेल्या टीकेला जोरदारपणे उत्तर दिले. शिवसेना ही काँग्रेसमध्ये विलीन होणार होती म्हणून आम्ही बाहेर पडलो. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे हे बाहेर पडत नाहीत. असा युक्तिवाद त्या सहा खासदारांनी जय महाराष्ट्र करताना केला होता. त्याला उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी या मेळाव्यात स्पष्ट केले की, भाजप बरोबर तीस वर्ष आम्ही होतो पण त्यांच्यात कधी विलीन झालो नाही, तर मग शिवसेना काँग्रेसमध्ये कशी विलीन होईल? आज जे सहा खासदार बाहेर गेले आहेत त्यांच्या प्रत्येक मतदारसंघात मी स्वतः प्रचार सभा घेतल्या आहेत. मी कुणाला भेटत नसेन तर मग तुम्ही निवडून कसे आहात असा प्रति सवाल त्यांनी केला आहे. उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात शिंदे यांना बाप चोरणारा माणूस, आणि भाजपला मुले पळवणारी टोळी अशा शब्दात संबोधले.

प्रसंगी मी पद सोडायला तयार आहे असे भावनिक प्रतिपादन त्यांनी करताना, तुम्ही ऑपरेशन टायगर करत असाल तर या देशातील लोकांनी ऑपरेशन कमळ हाती घेतले पाहिजे.ऑपरेशन टायगर नंतर होत असलेल्या टीकेला एकनाथ शिंदे यांनी नेस्को सेंटरमध्ये उचित शब्दात उत्तर दिले. ऑपरेशन टायगर करायला वाघाचं काळीज लागतं, लांडग्याचं नाही. हिम्मत असेल तर ऑपरेशन तुडवा करण्यासाठी पुढे या, तुमचे पाय जागेवर राहणार नाहीत असा इशारा द्यायला शिंदे विसरले नाहीत. तुम्हाला तुमची माणसे सांभाळता येत नसतील तर त्यात आमचा दोष काय असा सवालही त्यांनी उपस्थित करून ऑपरेशन टायगर ची स्पष्ट शब्दात कबूली दिली.

उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोघांचीही भाषणे आक्रमक होती. शिवसैनिकांना ऊर्जा देणारी होती. चार वर्षात दोन वेळा शिवसेना फुटली म्हणून शिवसैनिक खचलेला नाही तर तो पेटलेला आहे (Shiv Sena) अशा शब्दात ठाकरे यांनी शिवसैनिकांना पुन्हा रस्त्यावर येण्याचे आवाहन केले. तर मी सर्वांना सोबत घेऊन काम करतो. तुमचा पाय ब्रेक वर होता तर आमचा पाय हा एक्सलेटर वर आहे अशा शब्दात शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षातला शिवसेनेचा साठावा वर्धापन दिन अशा रीतीने एकमेकांवर शब्दांचे आसूड ओढत दोन्ही गटांनी साजरा केला.

हेही वाचा :

इंधन दरवाढ की दिलासा? पाहा आजचे पेट्रोल-डिझेलचे ताजे भाव?

1500 की 3000 लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर नेमके किती रुपये जमा?

फोनपे वापरण्यासाठी मोठा झटका नवीन नियम लागू?