गुंता सोडवायचा कि, वाढवायचा?

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी

मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न तसा गुंतागुंतीचा आहे. इतर समाज नाराज होणार नाही, त्याला आपल्या ताटातलं दुसऱ्याच्या ताटात जाईल अशी भीती वाटणार नाही, आरक्षण दिलं तर न्यायालयात सुद्धा टिकलं पाहिजे. असे अनेक पैलू यामध्ये आहेत आणि त्यातून गुंता वाढला आहे. हा तयार झालेला गुंता सोडवायचा की वाढवायचा याचा आधी निर्णय झाला पाहिजे. तरच मराठा समाजाच्या प्रश्नावर उत्तर मिळणार आहे. मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्र्यांसाठी एकेरी भाषा वापरणे, शिवीगाळ करणे, सरकार पाडण्याचा वारंवार इशारा देणे हे सर्व काही आंदोलनाची ताकद कमी करणारे आहे.

कुणबी असल्याच्या 58 लाख नोंदी सापडल्या आहेत. त्या सर्वांना पडताळणीसह प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू आहे. (Maratha) त्यासाठी काही कालावधी लागणार आहे. सातारा आणि कोल्हापूर गॅझेट बाबत शासन सकारात्मक आहे. मराठा विद्यार्थ्यांना ओबीसी म्हणून सर्व प्रकारच्या सवलती देण्याचा मंत्रिमंडळाने निर्णय घेतला आहे. याचा अर्थ मराठा आरक्षणाच्या संदर्भात काहीतरी सकारात्मक घडताना दिसते आहे पण मनोज जडांगे पाटील नकारात्मक मानसिकतेत अडकून पडलेले दिसतात किंवा आहेत.मराठा समाजाच्या आरक्षण लढ्याची अंतरवाली सराटी ही राजधानी बनली आहे. दिनांक 29 ऑगस्ट पासून मनोज जरांगे हे तिथे उपोषणाला बसले आहेत.पाणी ग्रहणही त्यांनी सोडले होते पण प्रसाद लाड यांनी विनंती केल्यावर ते पाणी प्राशन करू लागले आहेत. पण वैद्यकीय तपासणी बद्दल ते शंका व्यक्त करत आहेत. वैद्यकीय अधिकारी हे राजकारणाच्या पलीकडचे असतात.

पण त्यांच्याबद्दल ते काही खोटं करत आहेत असे सूचित करणे हे त्यांच्यावर अन्याय केल्यासारखे आहे. अंतरवाली सराटी मध्ये मंत्री उदय सामंत गेले होते. पण मराठा आरक्षण उप समितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी मराठा समाजाचे वाटोळे केले असा आरोप करून मनोज जरांगे यांन प्रश्नाचे उत्तर शोधणारी एक वाट बंद करून टाकले आहे. कारण मी आता अंतरवाली सराटीकडे जाणार नाही. मराठा समाजासाठी जे काही करायचे ते सर्व काही केले आहे. यापेक्षा अधिक करायचे काही राहिलेले नाही अशी भूमिका विखे पाटील यांनी (Maratha) त्यानंतर घेतली आहे.सरकार म्हणते की मराठा समाजासाठी सर्व काही केले आहे. करण्यासाठी काही उरलेले नाही आणि मनोज जरांगे म्हणतात की या सरकारला मराठ्यांना मारायचे आहे. पण आम्ही आता मागे हटणार नाही. मुंबईत धडक मारू. मनोज जरांगे हे हट्टाला पेटलेले आहेत. आणि त्यांची शिवराळ भाषाही वाढली आहे. मित्तल नामक महिला जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर त्यांनी वापरलेली भाषा कुणालाही आवडणार नाही. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, उदय सामंत, संजय शिरसाठ, विखे पाटील यांचा ते एकेरी उल्लेख करू लागले आहेत.

मनोज जरांगे हे मराठा समाजाचे सर्वात प्रभावशाली नेते आहेत यात कुणाचेही दुमत नाही. इतर समाजातही त्यांच्याबद्दल आदराने बोलले जाते. एक चांगला लढाऊ नेता मराठा समाजाला मिळाला आहे हे इतर समाजाकडून मिळत असलेले कौतुक टिकवून ठेवण्याची जबाबदारी आता त्यांच्यावर आहे. आणि त्यांनीही अडवणुकीची भूमिका सोडून सरकारशी संवाद साधण्याला महत्त्व दिले पाहिजे.आमरण उपोषण हे आंदोलनाचे शेवटचे हत्यार आहे. अशावेळी सरकार हे सकारात्मक भूमिकेत आले पाहिजे आणि त्यासाठी योग्य वातावरण तयार केले पाहिजे अशी रणनीती आंदोलकांची असली पाहिजे.

मराठा समाजासाठी सरकारने जे काही केलेले आहे ते यापूर्वीच्या कोणत्याही सरकारने केलेले नाही. आणखी काही मराठा समाजासाठी करता येईल असे काही शिल्लकच राहिलेले नाही अशी भूमिका आरक्षण उप समितीचे अध्यक्ष विखे पाटील यांना का घ्यावी लागली याचा विचार मनोज जरांगे यांनी केला पाहिजे. आता तर सरकारच्या वतीने अंतरवाली सराटी या गावात चर्चेसाठी कुणीही जाणार नाही असे स्पष्ट झाले आहे. मनोज जरांगे हे मुंबईला धडक मारण्याविषयीचा निर्णय दिनांक 12 सप्टेंबर रोजी घेणार आहेत. मराठा समाज हा पुन्हा एकदा मुंबईत येऊन धडकला तर ऐन गणेश उत्सवाच्या काळात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. मुंबईत सार्वजनिक गणेशोत्सव हा अतिशय संवेदनशील असतो. पोलिसांच्या वर बंदोबस्ताचा प्रचंड ताण असतो. त्यात मराठा आंदोलनाची भर पडली तर परिस्थिती गंभीर होऊ शकते. (Maratha) म्हणूनच मनोज जरांगे यांनी मुंबईत धडक मारण्याचा निर्णय स्थगीत ठेवावा.

हेही वाचा :

सर्वात मोठी बातमी संजय राऊत यांच्यावर तुरुंगात विष प्रयोग? राऊतांनी काय दिलं उत्तर?

एकनाथ शिंदे यांच्या जवळच्या मंत्र्याला धक्का अधिकारात केली मोठी कपात?

कच्च्या तेलाच्या किंमती 100 डॉलवर,पेट्रोल-डिझेलचे भाव वाढले?