इचलकरंजीत दोन दशकांनंतर ‘वस्त्रपरी’चा अरुणोदय प्रतीक्षेचा सुवर्णकाळ उगवला?

महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमाभागात वसलेली, देशादेशांत आपल्या विणकामाच्या ताकदीने आणि रंगबेरंगी धाग्यांच्या चमत्काराने ओळखली जाणारी वस्त्रनगरी इचलकरंजी. अडीच ते तीन लाखांच्या घरात पोहोचलेल्या या वर्दळीच्या शहरात एक काळ असा होता, जेव्हा स्थानिक ‘सिटी बस’चे हक्काचे चाक गल्लोगल्ली फिरायचे; परंतु काळ बदलला. (Ichalkaranji) शहराची व्याप्ती वाढत चालली असतानाच राज्य परिवहन विभागाच्यावतीने चालवली जाणारी ही हक्काची सेवा जणू इतिहासजमा झाली. दोन दशकाहून अधिक काळ इचलकरंजीकरांनी शहर बस शिवायचा हा लांबचा काळ मोठ्या अगतिकतेने काढला. अखेर आज हा सूर्य उगवला तो एका नव्या सुवर्णपर्वाचे क्षितीज घेऊनच!

‘वस्त्रपरी’ या शहराच्या आणखी अर्थकारणाशी एकरूप अशा देखण्या आणि आकर्षक नाममुद्रेने सज्ज झालेल्या इलेक्ट्रिक आणि आधुनिक बससेवेचा श्रीगणेशा या वस्त्रनगरीत दिमाखात झाला आणि इचलकरंजीकरांच्या अनेक वर्षांच्या प्रतीक्षेचा अखेर सुवर्णकाळ उगवला. ​गेल्या अडीच-तीन वर्षांपासून महानगरपालिका प्रशासनाने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी अक्षरशः जिवाचे रान केले होते. प्रशासकीय लालफितीचा कारभार, कंत्राटांचे जाळे आणि न संपणाऱ्या ताकदीच्या परवानग्या या सगळ्या चक्रव्यूहातून मार्ग काढत परिवहन सभापती अरुणा बचाटे यांनी जेबीएम कंपनीशी ऐतिहासिक करार घडवून आणला. बँक खात्यांची जुळवाजुळव करण्यापासून ते तांत्रिक अडचणींच्या मखरावरून मार्ग काढण्यापर्यंतचा हा प्रवास सोपा नव्हता.परंतु पंतप्रधान योजनेअंतर्गत २५ नव्याकोऱ्या, भगव्या रंगाच्या देखण्या बसेस जेव्हा शहराच्या मुख्यमार्गावरून धावू लागल्या.

हा प्रसंग केवळ वाहनांचा प्रवास नव्हता तर विकासाचा एक नवा बिंदू होता. खासदार धैर्यशील माने, आमदार राहुल आवाडे, महापौर उदय धातुंडे, उपमहापौर अनिल डाळ्या, सभापती अरुणा बचाटे, आयुक्त पल्लवी पाटील यांच्यासह तमाम नगरसेवक, अधिकारी आणि नागरिकांच्या साक्षीने या भगव्या बसेसनी जेव्हा शहरात पहिला वहिला फेरफटका मारला, तेव्हा ‘अखेर बस आलीच!’ हे कुजबुजणारे उद्गार प्रत्येकाच्या ओठांवर आनंदाच्या उकळ्या फुटत असल्याचे अधोरेखित करीत होते. (Ichalkaranji) ​विशेष म्हणजे, या ऐतिहासिक क्षणाचे स्वागत करण्यासाठी गोविंदराव हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून बसवर फुलांचा वर्षाव केला. लहानग्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि नागरिकांच्या डोळ्यांत झळकलेले समाधानाचे हास्य म्हणजेच इचलकरंजीकरांच्या मनातील अस्वस्थ हुंकार अखेर आनंदाच्या सुरांत परावर्तित झाल्याचा पुरावा होता.

तब्बल वीस वर्षांच्या लांब वनवासानंतर सुरू झालेली ही ‘वस्त्रपरी’ केवळ प्रवासाचे साधन नाही, तर तो या वस्त्रनगरीच्या गतिमान भविष्याची गती ठरणार असल्याचे एकूण वातावरण पाहता दिसून आले. शहराच्या कानाकोपऱ्याला जोडणारी ही बससेवा आता या पांढऱ्याशुभ्र वस्त्राचा नगरीला अधिक समृद्ध करेल असा आशावाद व्यक्त करण्यात आला. दोन दशकाहून अधिक काळ चाललेला हा प्रतिक्षेचा काळ मागे पडून आज खऱ्या अर्थाने इचलकरंजीच्या विकासाचा हा ‘अरुणोदय’ ताकदीनिशी झगमगला. ​या बससेवेमुळे सर्वसामान्यांचे दैनंदिन जीवन आता अधिक सुकर होणार आहे. (Ichalkaranji) अशातच आमदार राहुल आवाडे यांनी ही बस सेवा सप्टेंबर अखेर निःशुल्क असल्याचे जाहीर केल्याने संपूर्ण वस्त्रनगरीत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नवा उत्साह संचारला आहे.

हेही वाचा :

माधुरी वनतारामधून निघाली शुक्रवारी पहाटेपर्यंत नांदणीत पोहचणार?

LPG गॅस बुकिंगचा नियम बदलला जाणून घ्या नवीन नियम?

एका व्यक्तीकडे किती बँक अकाऊंट असावीत, जास्त खात्याने काय समस्या येऊ शकते ?