जंतर-मंतर चे ग्रहण सुटलं?

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी

सर्वोच्च न्यायालयाच्या एका उपहासात्मक टिपणीतून जन्माला आलेल्या कॉक्रोच जनता पार्टीने अवघ्या दोन-तीन महिन्यात सोशल मीडियाचा प्रभावी वापर करून युवा पिढीचा असंतोष संघटित केला नीट परीक्षा पेपर फुटीचा विषय हाती घेऊन या पार्टीने बलाढ्य सरकारला अक्षरशः झुकवून मागण्या मान्य करून घेतल्या. 36 दिवस चाललेल्या या लढ्याला देशातील युवा पिढीने यश मिळवून दिले. युवा पिढी ही कोणत्याही देशातील असो, तिच्या भवितव्याकडे दुर्लक्ष केले तर सत्ता डळमळीत होऊ शकते हे सिद्ध झाले आहे. या लढ्याच्या यशाचे श्रेय घेण्यासाठी आता राजकीय पक्ष तसेच अन्य घटक पुढे येतील पण या यशाचा खरा मानकरी या देशातील विद्यार्थी युवा वर्ग आहे हे कोणीही मान्य करेल.

सीजेपी नावाचा पक्ष अभिजीत दिपके या तरुणांनी स्थापन केल्यानंतर त्याला कोणीही गांभीर्याने घेतले नव्हते. नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी सोनम वांगचुक यांनी जंतर मंतर रोडवर बेमुदत उपोषण सुरू केले. त्याला जेसीपी ने समर्थन दिले. वांगचुक यांच्या उपोषणाने देशभर हवा तयार झाली. (Jantar Mantar) त्यांच्या या आंदोलनाची दखल परदेशातील काही वृत्तपत्रांनीही घेतली होती. दिल्ली उच्च न्यायालयाच्या एका आदेशाचा सोयीचा अर्थ लावून सोनम यांना एका मध्यरात्री नाट्यमयरीत्या प्रशासनाने रुग्णालयात दाखल केले आणि त्या क्षणापासून अभिजीत दिपके याने जंतरमंतर आंदोलनाची सूत्रे आपल्या हाती घेतली. सीजेपीच्या आंदोलनाला देशातील महानगरांमधील युवकांनी डोक्यावर घेतले होते.

हे आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न पोलिसांच्या माध्यमातून केंद्र शासनाने केला पण जमिनीवर आपटलेला चेंडू जसा उसळी घेतो तशी उसळी या आंदोलनाने घेतली. जंतर-मंतर वरचा हा लढा खऱ्या अर्थाने सोशल मीडियाने उचलून धरला. नवी दिल्लीतील काही घटक हा लढा सोशल मीडियावर प्रभावीपणे आणण्यासाठी काम करत होते. पोलिसांनी केलेल्या बेछूट लाठी हल्ल्याच्या क्लिप व्हायरल केल्या जाऊ लागल्या. हे अगदी ठरवून केल्याप्रमाणे घडत होते. सोशल मीडिया अतिशय कौशल्याने वापरणाऱ्या भारतीय जनता पक्षाचा मीडिया सेल सुद्धा त्यापुढे हतबल झालेला दिसला. सीजेपीच्या या लढ्याला काँग्रेससह इंडिया आघाडीतील घटक पक्षांनी सक्रिय पाठिंबा दिला. राहुल गांधी यांनी उपलब्ध झालेल्या आंदोलनात्मक व्यासपीठाचा अतिशय कौशल्याने फायदा घेऊन हे आंदोलन हायजॅक करण्याचा प्रयत्न केला. मुळात जेसीपी ने हे आंदोलन सोनम वांगचुक यांच्याकडून स्वतःकडे खेचून घेतले होते आणि केंद्र शासनाने सीजेपीशी संवाद साधून त्यांच्याशीच चर्चा केली आणि जंतर मंतर चे हे ग्रहण सुटले.

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला, नीट परीक्षा फुटी प्रकरणातून नैराश्यात गेलेल्या वीस विद्यार्थी विद्यार्थिनींनी आत्महत्या केली होती त्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक कोटी रुपये नुकसान भरपाई दिली जाणार आहे आणि आंदोलकांवरील खटले टप्प्याटप्प्याने मागे घेतले जाणार आहेत. या प्रमुख तीन मागण्या मान्य करवून घेण्यात जेसीपी यशस्वी ठरली आणि या देशातील युवा वर्ग वास्तवातील नायक ठरला.
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र शासनातील एका कॅबिनेट मंत्र्यांचा राजीनामा ही गेल्या बारा वर्षांतील महत्त्वाची घटना समजली जाते. या लढ्याला अभूतपूर्व यश मिळाल्यानंतर जेसीपी चा नेता अभिजीत दीपके यांनी एक विकेट पडली! अशी प्रतिक्रिया देऊन आम्हाला आणखी काही घडवायचे आहे असे सूचित केलेले आहे.

देशातील सर्वच विरोधी पक्षांनी या लढ्याच्या यशाचे श्रेय सीजेपीला दिले आहे पण आम्हीही हा लढा उचलून धरला होता असे सांगायला हे पक्ष विसरलेले नाहीत. शरद पवार यांनी तर आपण पंतप्रधानांची भेट घेतल्यामुळे हे घडले आहे (Jantar Mantar) अशी प्रतिक्रिया देऊन त्याचे श्रेय आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. जंतर-मंतर रोडवरील आंदोलकांना सरकारशी चर्चा करण्याचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आंदोलकांशी चर्चा करण्याचे आवाहन मी केले होते आणि नंतर तसेच घडले असा खुलासा शरद पवार यांनी केला आहे. शरद पवार भेटल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी सलग दोन दिवस मध्यरात्री स्वतःच्या संकेतस्थळावरून युवा पिढीशी संपर्क साधला आणि नंतर जंतर-मंतरवरचे हे ग्रहण सुटण्याच्या हालचाली सुरू झाल्या हे मान्य करावे लागेल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघ चालक डॉक्टर मोहन भागवत यांनीही देशातील युवा पिढीशी सत्ताधाऱ्यांनी सतत संवाद साधला पाहिजे असे म्हटले आहे.

जंतर-मंतरवर सुरू असलेल्या या आंदोलनात काही असामाजिक घटकही घुसले होते. त्यांनी दिलेल्या घोषणा, या नरेंद्र मोदी यांच्या विरोधी होत्याच शिवाय हिंदू देवतां विरोधी होत्या. काही विद्यार्थी आणि विद्यार्थिनीनी नरेंद्र मोदी यांच्या बद्दल अतिशय खालच्या पातळीवरची टीका केली होती. 36 दिवस चाललेले या आंदोलनातील या घटना सर्वसामान्य माणसाला वेदनादायी ठरल्या होत्या.इथून पुढे परीक्षांचे पेपर फोडणाऱ्या विरुद्ध कठोर कारवाई करणारे विधेयक संसदेच्या या पावसाळी अधिवेशनात मांडले जाणार आहे. दहा कोटी रुपयांचा दंड आणि दहा वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा अशी तरतूद या विधेयकात करण्यात येणार आहे. (Jantar Mantar) याशिवाय नीट पेपर फुटी प्रकरणातील मोठे गावकर याच्यासह सर्व संशयित आरोपी विरुद्ध चा खटला जलद गती न्यायालयात चालवला जाणार आहे. केंद्र शासनाची ही भूमिका स्वागत करावी अशी आहे.

आता नजीकच्या काळात म्हणजे येत्या वर्षभरात देशात कोणत्याही राज्याची विधानसभेची निवडणूक नाही. 2018 मध्ये उत्तर प्रदेश, गुजरात, पंजाबसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांमध्ये सीजेपीचा किती प्रभाव राहील हे आत्ताच सांगता येणार नाही. पण सीजेपीच्या तीन प्रमुख मागण्या मान्य केल्यामुळे भाजपला या देशातील युवावर्ग मोठा अडथळा ठरेल असे वाटत नाही. कारण तोपर्यंत पुलाखालून बरेचसे पाणी वाहून गेलेले असेल.

हेही वाचा :

दिवसा होणार अंधार, ऑगस्ट महिन्यात मोठे सूर्यग्रहण, तब्बल इतके तास?

जंतर-मंतर चे ग्रहण सुटलं

नीटनंतर MPSC चा महत्वाचा पेपर फुटल्याचा धक्कादायक दावा, संपूर्ण राज्यात खळबळ?