माजी केंद्रीय मंत्री, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे म्हटले तर राजकारणात आहेत आणि म्हटले तर त्यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेतली आहे. पण तरीही आपण लोकांच्या चर्चेत राहिले पाहिजे असे त्यांना अधून मधून वाटते आणि मग ते काहीतरी राजकीय भाष्य करतात.राजकारणाच्या पृष्ठभागावर थोडे फार तरंग उठतात आणि ते दिसण्याच्या आधीच लुप्त होतात.

पृथ्वीराज चव्हाण यांचे शिक्षण नवी दिल्लीत झाले. त्यांच्या मागे दिवंगत केंद्रीय मंत्री आनंदराव चव्हाण आणि माजी खासदार श्रीमती प्रमिलाताई चव्हाण या माता-पित्यांची प्रभावळ होती. त्यांना दिल्ली दरबारी मान होता. राजकीय पार्श्वभूमी असल्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांना त्याचा लाभ झाला. ते आपल्या पारंपारिक कराड लोकसभा मतदारसंघातून निवडून जायचे. (politics) काही काळ ते केंद्रीय मंत्री होते. अशोक चव्हाण यांना राजीनामा द्यावा लागल्यानंतर त्यांच्या जागी पृथ्वीराज चव्हाण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. आघाडी सरकारचे ते प्रमुख होते पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांच्या फाइल्स वर सह्या करण्यास ते विलंब लावायचे. म्हणूनच की काय शरद पवार यांनी पृथ्वीराज चव्हाण यांना उद्देशून “त्यांच्या हाताला लकवा मारलेला आहे काय?”अशी जळजळीत टीका केली होती.
महाराष्ट्रात 2014 पासून भाजप प्रणित युतीचे, महायुतीचे (उद्धव ठाकरे यांचा अडीच वर्षांचा काळ वगळता) सरकार आहे. आणि तेव्हापासून पृथ्वीराज चव्हाण हे राजकारणाच्या मुख्य धारेपासून थोडेसे दूर राहिले आहेत. महाराष्ट्राच्या काँग्रेसमध्ये त्यांना फारसे महत्त्व उरलेले नाही. कारण नाना पटोले, विजय वडेट्टीवार यांनी आपले महत्त्व वाढवलेले आहे. कारण ते कायम चर्चेत असतात. अधून मधून प्रवक्ते म्हणून सचिन सावंत प्रतिक्रिया देण्यासाठी उपलब्ध असतात. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून हर्षवर्धन सपकाळ यांना सुद्धा बोलावे लागते. या सर्वांमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद भूषवलेले पृथ्वीराज चव्हाण हे कुठे दिसत नाहीत. (politics) म्हणून मग महाराष्ट्राच्या राजकारणात स्वतःची एक स्पेस तयार करण्याची त्यांची धडपड असते. मग थोडीफार खळबळ उडवून देणारे वक्तव्य त्यांच्याकडून केले जात असते.
एफसटीन फाईल मध्यंतरी गाजत होती. या फाईल मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही संवेदनशील प्रकरण आहे. असा जोरदार दावा करून नरेंद्र मोदी हे पंतप्रधान पदावरून लवकरच पायउतार होतील आणि त्यांच्या जागी देवेंद्र फडणवीस यांना संधी दिली जाईल. असे वक्तव्य त्यांनी केले होते आणि आपले म्हणणे महिन्याभरात सिद्ध होईल असा ठाम दावाही ते करत होते. प्रत्यक्षात काहीही घडले नाही पण थोडीफार महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली इतकेच.आताही त्यांनी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे हे त्यांच्या पक्षात अस्वस्थ होते. आणि म्हणून मग ते काँग्रेसमध्ये येण्यासाठी
इच्छुक आणि उत्सुक होते. त्यांना पक्षात घेण्याविषयी काँग्रेस श्रेष्ठींनी जवळपास निर्णय घेतला होता. त्यांना कोणते मंत्रीपद द्यायचे यावरही चर्चा झाली होती मात्र तेव्हा पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी विरोध केला आणि मग मुंडे यांचा काँग्रेस प्रवेश झाला नाही. असे वक्तव्य त्यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्याला काँग्रेस श्रेष्ठींनी दुजोरा दिलेला नाही.
नेहमी मीडिया मध्ये दिसत असलेल्या नाना पटोले, विजय वडेट्टीवार, हर्षवर्धन सपकाळ यांनीही कोणती प्रतिक्रिया दिलेली नाही. पंकजा मुंडे यांनी मात्र माझे पिताश्री हे कमळात होते आणि कमळातच विसावले अशी प्रतिक्रिया देऊन पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा सपशेल खोटा असल्याचे म्हटले आहे. तर भाजपच्या काही नेत्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांनी गोपीनाथ मुंडे यांचा अपमान केला असल्याचे म्हटले आहे.पृथ्वीराज चव्हाण यांनी गोपीनाथ मुंडे हे हयात असताना असे वक्तव्य करणे आवश्यक होते. नंतर त्यांचे निधन होऊन 12 वर्षांचा कालावधी लोटला आहे. एक तप झाल्यानंतर पृथ्वीराज चव्हाण हे अशा प्रकारचे वक्तव्य करताना दिसतात. विशेष म्हणजे त्यांच्या वक्तव्यावर खुलासा करण्यासाठी गोपीनाथ मुंडे तसेच मनमोहन सिंग हे दोघेही आज हयात नाहीत.
तरीही त्यांचा संदर्भ देऊन चव्हाण हे मुंडे यांच्या विषयी अशा प्रकारे दावा करताना दिसतात. त्यातून त्यांना नेमके काय सिद्ध करावयाचे होते किंवा आहे हे समजून येत नाही. पण महाराष्ट्राच्या राजकारणात आपण चर्चेत असले पाहिजे हा हेतू मनात ठेवून ते (politics) अशा प्रकारची वक्तव्ये करत असतात असे म्हटले पाहिजे. महाराष्ट्रातील कोणत्याही पक्षाच्या राजकीय नेत्यांनी कोणत्याही प्रकारचे वक्तव्य केले तर त्यावर प्रतिक्रिया देण्यासाठी सदैव तत्पर असणाऱ्या संजय राऊत यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. गोपीनाथ मुंडे हे काँग्रेसमध्ये असते तर त्यांचा जीव वाचला असता असे ते म्हणतात. मग त्यांच्या अपघाती मृत्यूला ते अप्रत्यक्षपणे भारतीय जनता पक्षाला जबाबदार धरतात असा त्याचा अर्थ होतो.
हेही वाचा :
धीरज परदेशीची भगव्या टिळ्यामुळे हत्या का? संग्राम जगताप यांच्या मागण्या काय?
तुम्ही नालायक गृहमंत्री राजीनामा द्या, पृथ्वीराज चव्हाण अमित शहांवर संतापले?