काँग्रेस पक्षाचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी अखेर काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. त्यांनी नुकताच काँग्रेसच्या प्राथमिक सभासदत्वाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी भोरमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना आपली भूमिकाही स्पष्ट केली होती. त्यानंतर त्यांनी आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण उपस्थित होते.
संग्राम थोपटे यांच्या प्रवेशावेळी अनेक कार्यकर्त्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. या सर्वांचं प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वागत केलं. प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. मुंबईतील भाजपच्या मुख्यालयात संग्राम थोपटे यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला आहे. दरम्यान, थोपटे यांच्या पक्षप्रवेशाला स्थानिक भाजप नेत्यांनी विरोध केला आहे. त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना एक पत्र लिहिलं आहे. त्यामध्ये, घरात बाहेरचे पाहुणे जास्त झाले की घरातील लोकांना बाहेर झोपावं लागतं, अशा शब्दांत नाराजी व्यक्त करणारं पत्र लिहिलं आहे.