बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील वाटेफळ येथे किरकोळ कारणावरून भयंकर हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. उघड्यावर लघुशंका केल्याच्या कारणावरून नऊ जणांच्या टोळक्याने दोन तरुणांवर धारदार हत्यारांनी(weapons) हल्ला करून गंभीर जखमी केले. ही घटना २७ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी साडेसात वाजता घडली असून, आणखी दोन जणांवर हल्ला करून त्यांनाही मारहाण करण्यात आली आहे. एकूण चार तरुण गंभीर जखमी झाले असून, बीडमध्ये कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

प्रशांत बापू चौधरी (वय २२) आणि त्यांचा चुलत भाऊ भाऊसाहेब चौधरी हे दोघे बाजारहाट करून घरी जात असताना बस स्टँडवर थांबले असता, लघुशंकेसाठी त्यांनी आडोशाला जावे लागले. यावेळी नारायण कोळेकर याने आक्षेप घेत शिवीगाळ केली. प्रशांतने दिलगिरी व्यक्त केली, तरीही कोळेकर आणि त्याच्या भावाने लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली.
हल्ला इतका वाढला की नारायण कोळेकरने साथीदारांना बोलावून घेतले. लोखंडी गज, रॉड, लाकडी दांडक्यांनी सशस्त्र (weapons)टोळक्याने प्रशांत आणि भाऊसाहेब यांना अमानुषपणे मारहाण केली. भाऊसाहेब बेशुद्ध पडले. या गोंधळात वेदांत चौधरी आणि दीपक कराळे हे मदतीस धावून आले, पण त्यांनाही बेदम मारहाण झाली. वेदांतच्या डाव्या हाताच्या करंगळीला गंभीर दुखापत झाली, तर दीपकलाही धमकावण्यात आले.
हल्लादरम्यान नारायण कोळेकरच्या पत्नीने दगड फेकून वेदांतचा मोबाइल फोडला. तसेच, बाळासाहेब कोळेकरने प्रशांतच्या हातातील सोन्याची अंगठी जबरदस्तीने काढून घेतल्याचा आरोप आहे.

पोलिसांची कारवाई
या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि जखमी तरुणांना तातडीने अहमदनगरच्या सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी प्रशांत चौधरी यांच्या तक्रारीवरून नारायण कोळेकर, बाळासाहेब कोळेकर, सोमनाथ व सुशील चितळकर, अजय व दुर्गेश साबळे, सोन्या उल्हारे, धरम महारनोर व अन्य अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपास सुरू असून आरोपी फरार आहेत.
संतोष देशमुख प्रकरणाची आठवण
या घटनेने काही महिन्यांपूर्वी बीडमधील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या अमानुष हत्येची आठवण जागवली आहे. या प्रकरणामुळे बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा कायदा-सुव्यवस्थेवरील प्रश्न उपस्थित झाला आहे.
न्याय आणि कारवाईची मागणी
या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण आहे. आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे. पोलिस आणि प्रशासन यांच्यावर पुन्हा एकदा कठोर आणि निष्पक्ष तपासाची जबाबदारी आली आहे.
हेही वाचा :
पाकिस्तानची नवी कुरापत; भारतीय लष्कराची वेबसाइट हॅक करण्याचा प्रयत्न
मोठी बातमी! प्रसिद्ध रॅपरला अटक; फ्लॅटमधून गांजा अन् बिबट्याचे दात सापडले
परिवहन मंत्र्यांच्या ‘त्या’ आदेशाने एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांमध्ये खळबळ!