राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राज्य कार्यकारिणी सदस्य राजेंद्र हगवणे यांच्या सुनेने गळफास घेऊन आपले जीवन संपवले. त्यांच्या मृत्यूप्रकरणानंतर संपूर्ण राज्यात वातावरण तापलेले आहे. त्यानंतर आता या प्रकरणी नवीन माहिती समोर आली आहे.
वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिच्या 9 महिन्यांच्या बाळाला आजी-आजोबांच्या घरी आणण्यासाठी प्रयत्न सुरू होते. अखेर त्या बाळाचा ताबा कस्पटे कुटुंबियांना मिळाला आहे. हे बाळ निलेश चव्हाण नावाच्या व्यक्तीकडे असल्याची माहिती समोर आली होती.
याबाबत वैष्णवीच्या मामांना विचारले असता ते म्हणले की, आम्ही गेल्या ३ दिवसांपासून बाळाचा शोध घेत होतो. आज सकाळ आम्ही निलेश चव्हाण यांच्या घरी गेलो पण त्यांनी काही दार उघडले नाही. त्यामुळे आम्ही विचार करू लागलो की बाळ कुठे असणार. त्यानंतर काही वेळाने आम्हाला एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला होता. त्या व्यक्तीने बाळ आमच्या ताब्यात दिलं. बाणेरच्या हायवेजवळ हे बाळ आमच्याकडे सोपवण्यात आले. आता ही अज्ञात व्यक्ती नेमकी कोण होती यांची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मोठी कारवाई करत राजेंद्र तुकाराम हगवणे आणि सुशील राजेंद्र हगवणे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून हकालपट्टी केली आहे. याबाबतचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी जारी केला आहे.
वैष्णवीच्या वडिलांनी बावधन पोलिस ठाण्यात फिर्यादी दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे, सासरा राजेंद्र हगवणे, नणंद करिष्मा हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांच्याविरोधात हुंड्यासाठी मानसिक आणि शारिरिक छळ केल्याचा आरोप केला आहे. हुंड्यासाठी वैष्णवीने आयुष्य संपवले, असा दावाही केला जात आहे.