हिवाळा सुरू झाला की अनेकांना सर्दी, नाक बंद होणे, डोकेदुखी आणि चेहऱ्यावर जडपणा जाणवू लागतो. विशेषतः ज्यांना सायनसचा त्रास आहे, त्यांच्यासाठी थंडीचा ऋतू अधिक त्रासदायक ठरू शकतो. थंड आणि कोरडी हवा, धूळ, प्रदूषण तसेच ॲलर्जीमुळे नाकातील आणि सायनसमधील आतील आवरणाला सूज येऊ शकते. (winter) त्यामुळे सायनसच्या त्रासात वाढ होऊ शकते. सायनसचा त्रास नेमका कशामुळे वाढतो? त्याची लक्षणे कोणती आणि हिवाळ्यात हा त्रास कमी करण्यासाठी कोणते उपाय करावेत, हे जाणून घेऊयात.

सायनस म्हणजे आपल्या कवटीतील नाकाभोवती, गालांच्या हाडांमध्ये, डोळ्यांच्या मधोमध आणि कपाळाच्या भागात असलेल्या हवेने भरलेल्या पोकळ्या. या पोकळ्यांमध्ये श्लेष्मा (म्युकस) तयार होतो. हा श्लेष्मा नाकातून बाहेर पडण्यास मदत होते. मात्र सायनसच्या आतील आवरणाला सूज आल्यास श्लेष्मा व्यवस्थित बाहेर पडत नाही. (winter) त्यामुळे नाक बंद होणे, चेहऱ्यावर दाब जाणवणे आणि डोकेदुखी अशी लक्षणे दिसू शकतात. या स्थितीला सायनुसायटिस (Sinusitis) म्हणतात.
हिवाळ्यात सायनसचा त्रास वाढण्याची ४ कारणे :
थंड हवा :
हिवाळ्यातील थंड आणि कोरड्या हवेमुळे नाकाच्या आतील आवरणाला त्रास होऊ शकतो. (winter) त्यामुळे नाकातील नैसर्गिक ओलावा कमी होऊन कोंडलेपणा जाणवू शकतो.
सर्दी – व्हायरल इन्फेक्शन :
हिवाळ्यात सर्दी-खोकल्याचे प्रमाण वाढते. व्हायरल इन्फेक्शनमुळे नाक आणि सायनसच्या आतील आवरणाला सूज येऊ शकते. त्यामुळे श्लेष्मा बाहेर पडण्याचा मार्ग अडतो आणि सायनसची लक्षणे वाढतात.
अॅलर्जीची समस्या :
हवेतील धूळ, धूर आणि प्रदूषणामुळे नाकाच्या आतील भागाला जळजळ होऊ शकते. संवेदनशील व्यक्तींमध्ये यामुळे सायनसचा त्रास अधिक जाणवू शकतो. धूळ, धुळीतील सूक्ष्म कण, बुरशी किंवा इतर अॅलर्जी निर्माण करणाऱ्या घटकांमुळे नाकाला सूज येऊ शकते. अॅलर्जिक राइनायटिसमुळे शिंका येणे, नाक वाहणे आणि नाक बंद होणे अशी लक्षणे दिसतात.
बंद खोलीतील कोरडी हवा :
हिवाळ्यात खिडक्या बंद ठेवणे आणि हीटरचा वापर करणे यामुळे घरातील हवा कोरडी होऊ शकते. अशा वातावरणात नाकातील कोरडेपणा आणि अस्वस्थता वाढू शकते.
सायनसची ७ लक्षणे :
१.नाकाच्या आतील भागाला सूज आल्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो
२.कपाळ, डोळ्यांच्या आजूबाजूला आणि डोक्याच्या पुढील भागात वेदना जाणवू शकतात.
३.गाल, नाक आणि डोळ्यांच्या आसपास जडपणा किंवा दाब जाणवतो.
४.सतत नाक वाहणे किंवा नाकातून घट्ट श्लेष्मा बाहेर येणे.
५.नाकातील श्लेष्मा घशाच्या मागील बाजूला गेल्यामुळे खोकला किंवा घसा खवखवण्याचा त्रास होतो.
६.नाक बंद असल्यामुळे वास घेण्याची क्षमता कमी होऊ शकते.
७.सतत नाक बंद राहणे, डोकेदुखी आणि झोपेचा त्रास यामुळे थकवा जाणवू शकतो.
उपाय काय :
सलाईन नाकाचा स्प्रे वापरा :
नाक बंद होण्याचा त्रास असल्यास सलाईन स्प्रेचा वापर करा. यामुळे नाकातील चिकट श्लेष्मा मोकळा होण्यास आणि नाकातील कोरडेपणा कमी होण्यास मदत होते. नाक धुण्यासाठी सलाईन रिन्स वापरत असल्यास फक्त डिस्टिल्ड, स्टेराइल किंवा उकळून थंड केलेले पाणी वापरा.
कोमट पाणी आणि गरम पेये प्या :
हिवाळ्यात शरीर हायड्रेट ठेवणे आवश्यक आहे. दिवसभर पुरेसे पाणी प्या. कोमट पाणी, गरम सूप किंवा आले-तुळशीचा चहा घेतल्याने घशातील कोरडेपणा कमी होण्यास मदत होऊ शकते.
चेहऱ्यावर कोमट शेक घ्या :
सायनसमुळे कपाळावर किंवा गालांवर दाब आणि जडपणा जाणवत असल्यास स्वच्छ कापड कोमट पाण्यात भिजवून पिळून घ्या. हे कापड कपाळावर आणि गालांवर काही मिनिटे ठेवा.
प्रदूषणापासून दूर राहा :
तुम्हाला धूळ, परागकण किंवा बुरशीची अॅलर्जी असल्यास त्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा.धूळ, धूर, सिगारेटचा धूर आणि तीव्र सुगंध यामुळे सायनसचा त्रास वाढू शकतो. त्यामुळे घराची नियमित स्वच्छता करा आणि बाहेर जाताना प्रदूषणापासून बचाव करण्यासाठी योग्य मास्क वापरा.
हेही वाचा :
दूध दरवाढीचा ग्राहकांना मोठा झटका, गोकुळकडून इतिहासामधली सर्वात मोठी दरवाढ
कबनूर येथे दोन घरफोड्यांमध्ये सव्वातीन लाखांचा ऐवज लंपास
थंडीच्या दिवसांत दही खाणे योग्य की अयोग्य आयुर्वेदात नेमकं काय म्हटलं