पाऊस पडायला उशीर का होतोय? IMD ने सांगितली 5 प्रमुख कारणे?

मान्सूनच्या प्रतीक्षेत असलेल्या महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला यंदा जून महिन्यात उष्णतेचा आणि पावसाच्या कमतरतेचा दुहेरी फटका बसत आहे. दक्षिण महाराष्ट्रापर्यंत पोहोचलेला मान्सून गेल्या काही दिवसांपासून पुढे सरकण्यात अपयशी ठरल्याने शेतकरी, नागरिक आणि प्रशासनाची चिंता वाढली आहे. भारतीय हवामान विभागाच्या ताज्या आकडेवारीनुसार, ४ जून ते १८ जून २०२६ या कालावधीत देशभरात सरासरीपेक्षा तब्बल ४१ टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे. अपेक्षित ७२.२ मिमी पावसाच्या तुलनेत केवळ ४२.६ मिमी पाऊस झाल्याने मान्सूनच्या प्रगतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

हवामान तज्ज्ञांच्या मते, यंदा मान्सूनच्या गतीला अनेक हवामानशास्त्रीय घटक अडथळा ठरत आहेत. अरबी समुद्रात आवश्यक त्या प्रमाणात वादळी प्रणाली निर्माण झालेली नसल्याने वातावरणात पुरेसा ओलावा उपलब्ध होत नाही. (monsoon) त्याचबरोबर नैऋत्येकडून वाहणारे मान्सूनचे वारेही कमकुवत पडल्याने पावसाचे ढग राज्याच्या अंतर्गत भागात पोहोचण्याचा वेग मंदावला आहे. पश्चिम हिंदी महासागरातून विषुववृत्त ओलांडून येणाऱ्या आर्द्रतेने भरलेल्या वाऱ्यांचाही प्रभाव कमी झाल्याने ढगांची निर्मिती आणि पर्जन्य प्रक्रिया प्रभावित झाली आहे.

याशिवाय अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात प्रभावी कमी दाबाची क्षेत्रे निर्माण न झाल्यामुळे मान्सूनला अपेक्षित चालना मिळालेली नाही. हवामानातील जागतिक बदलांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारी ‘मॅडेन-ज्युलियन ऑसिलेशन’ (MJO) प्रणालीदेखील सध्या कमकुवत अवस्थेत असल्याने दक्षिण भारतातून महाराष्ट्राकडे ढगांचा प्रवास मंदावला आहे. परिणामी राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाने दडी मारली आहे. (monsoon) दरम्यान, आंतरराष्ट्रीय हवामान घडामोडींमध्ये पुन्हा एकदा ‘एल निनो’ची परिस्थिती निर्माण होत असल्याचे संकेत मिळत आहेत. पॅसिफिक महासागरातील पाण्याचे तापमान वाढल्याने भारतीय मान्सूनवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एल निनोचा प्रभाव वाढल्यास पावसाचे प्रमाण आणखी घटू शकते, अशी भीती हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

पावसाच्या या दीर्घ प्रतीक्षेमुळे राज्यातील खरीप हंगाम धोक्यात आला आहे. सोयाबीन, कापूस, भात यांसारख्या पिकांच्या पेरण्या रखडल्या असून वेळेत पाऊस न झाल्यास उत्पादन घटण्याचा धोका निर्माण झाला आहे. दुसरीकडे, धरणांमधील पाणीसाठाही अपेक्षित वेगाने वाढत नसल्याने भविष्यात ग्रामीण आणि शहरी भागांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो. (monsoon) त्यामुळे आता सर्वांचे लक्ष मान्सूनच्या पुढील वाटचालीकडे लागले असून, येत्या काही दिवसांत पावसाला पोषक परिस्थिती निर्माण होईल का, याकडे राज्याचे लक्ष केंद्रित झाले आहे.

हेही वाचा :

फुटीचा शाप असलेली शिवसेना!

विधान परिषदेसाठी आज होणार मतदान?

SBI मध्ये पदवीधरांसाठी बंपर भरती जाणून अर्ज प्रक्रिया?