बंगळुरू : IPL 2025 चं विजेतेपद जिंकून इतिहास घडवणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Virat Kohli) च्या आनंदोत्सवाला मंगळवारी दुर्दैवी आणि रक्तरंजित वळण लागलं. चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर हजारोंच्या संख्येने जमलेल्या चाहत्यांमध्ये अचानक चेंगराचेंगरी झाली. या भीषण दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला असून, ३३ जण गंभीर जखमी झाले आहेत. यामुळे बंगळुरू शहर हादरून गेलं असून, विजयोत्सवाचा जल्लोष एका शोकांतिकेत बदलला आहे.
पहिली अटक; RCBच्या मार्केटिंग हेडला अटक
या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. RCB चे मार्केटिंग प्रमुख निखिल सोसले यांना बंगळुरू विमानतळावरून अटक करण्यात आली आहे. याशिवाय, इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी DNA एंटरटेनमेंट, कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना यांच्यासह काही अधिकाऱ्यांविरोधात गैरहत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कब्बन पोलीस ठाण्यात चौकशी सुरू आहे.
‘#ArrestKohli’ हॅशटॅग ट्रेंडमध्ये
या दुर्दैवी घटनेनंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी संताप व्यक्त केला. RCB कर्णधार विराट कोहली यांच्यावरही टीका होत असून, ‘#ArrestKohli’ हा हॅशटॅग ट्विटर (X) वर ट्रेंड करत आहे. मात्र, पोलिसांनी कोहलीच्या( Virat Kohli) विरोधात कोणताही पुरावा नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
CIDकडे तपास सोपवला
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या प्रकरणाची CIDमार्फत सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. भविष्यात अशा दुर्घटना होऊ नयेत यासाठी इव्हेंट मॅनेजमेंटच्या नियमांमध्ये सुधारणा केली जाणार असल्याचेही संकेत मिळाले आहेत.
१८ वर्षीय मनोज कुमारचा हृदयद्रावक मृत्यू
या चेंगराचेंगरीत १८ वर्षीय मनोज कुमार याचा मृत्यू झाला. तो पाणीपुरी विक्रेता देवराज एन यांचा मुलगा होता. “माझा मुलगा फक्त स्टेडियम पाहायला गेला होता… आता तो परत येणार नाही!” अशा शब्दांत मनोजच्या वडिलांनी आपली वेदना व्यक्त केली. सरकारकडून १० लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली असली, तरी “पैसे माझा मुलगा परत आणणार आहेत का?” हा देवराज यांचा सवाल मन सुन्न करणारा ठरला.
आता जबाबदारी कुणाची?
या घटनेमुळे महत्त्वाच्या प्रश्नांकडे लक्ष वेधलं जात आहे – एवढ्या मोठ्या गर्दीसाठी योजना का नव्हती?, पोलीस बंदोबस्त अपुरा का होता?, आणि RCB व आयोजकांनी गर्दीचे योग्य व्यवस्थापन का केलं नाही?
हेही वाचा :