शिवसेना आमदाराची ‘शिवाजी कोण होता?’च्या प्रकाशाला जीवे मारण्याची धमकी; फोन करुन शिव्या दिल्या अन्…; धक्कादायक

शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड पुन्हा एकदा वादाच्या केंद्रस्थानी आले आहेत. (controversy) कोल्हापूरमधील प्रशांत आंबी यांना फोन करून त्यांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. हा संपूर्ण वाद कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांनी लिहिलेल्या ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकावरून निर्माण झाला असल्याचे सांगितले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित पुस्तकाबाबत गैरसमज झाल्याने आमदार गायकवाड यांनी प्रशांत आंबी यांनाच लेखक समजून त्यांना फोन केला. “तू एकेरी पुस्तक का लिहिलं?” असा जाब विचारत त्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्याचे समोर आले आहे. मात्र आंबी यांनी हे पुस्तक आपण लिहिले नसून ते पानसरे यांचे असल्याचे स्पष्ट करत, पुस्तकाचा उद्देश छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करण्याचा नसल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. तरीही गायकवाड यांनी शिवीगाळ करत “तू पण पानसऱ्यांकडे जाशील” अशा शब्दांत धमकी दिल्याचा आरोप आंबी यांनी केला आहे.

या कथित संभाषणाची ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली असून, आमदारांवर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे. आंबी यांनी या प्रकरणी राजारामपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला असल्याचेही सांगितले आहे. त्यांनी स्पष्ट केले की, धमक्या देऊनही ते मागे हटणार नाहीत आणि शिवाजी महाराजांचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम सुरूच ठेवतील.

दरम्यान, या प्रकरणावर आमदार गायकवाड यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. व्हायरल झालेली ऑडिओ क्लिप ही तोडमोड करून पसरवण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच संबंधित पुस्तकात इतिहासाची तोडफोड करून शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करण्यात आल्याचा आरोप करत, “अशा लोकांना शिव्याच दिल्या पाहिजेत,” असे म्हणत त्यांनी आपल्या वर्तनाचे समर्थन केले आहे.

हेही वाचा

राहुरी-बारामती पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; सुनेत्रा पवार आणि अक्षय कर्डिले यांचं भवितव्य ठरणार

लग्नासाठी अल्पवयीन मुलीचं अपहरण, हात-पाय बांधून जिल्हा परिषदेच्या शाळेत डांबलं अन् महाराष्ट्राला हादरवणारी घटना

पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग? जाणून घ्या आजचे लेटेस्ट रेट