धक्कादायक! सिझर झालेली प्रसूत महिला ६ तास तडफडली, वेळेत डॉक्टर न आल्याने मृत्यू, महापालिका आरोग्याधिकाऱ्यांची माहिती; पोलिस म्हणाले…

सोलापूरमध्ये एका खासगी रुग्णालयात घडलेल्या धक्कादायक प्रकारामुळे आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. सिझेरियन शस्त्रक्रियेनंतर काही तासांतच प्रसूत महिलेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली असून, यामागे डॉक्टर आणि रुग्णालय प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा आरोप करण्यात येत आहे.

निराळे वस्ती येथील अनुजा सनी बावळे यांच्यावर मुरारजी पेठेतील कृष्णामाई नर्सिंग होममध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली होती. शस्त्रक्रियेनंतर त्यांच्या प्रकृतीत बिघाड होत असताना देखील वेळेवर तज्ज्ञ डॉक्टरांनी तपासणी केली नाही, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरू असताना तब्बल सहा तास रुग्णाकडे दुर्लक्ष झाल्याचा गंभीर दावा करण्यात आला आहे. या काळात केवळ नर्सिंग स्टाफकडून उपचार सुरू होते, असेही सांगण्यात आले.

प्रकृती अत्यंत गंभीर झाल्यानंतर अनुजांना दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मात्र प्राथमिक तपासणीत त्या महिलेचा मृत्यू मूळ रुग्णालयातच झाल्याचे निदर्शनास आले आहे, अशी माहिती आरोग्याधिकारी डॉ. राखी माने यांनी दिली. तपासात सिझेरियननंतर मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव, पल्स व बीपी घटणे आणि मेंदूला रक्तपुरवठा कमी होणे यामुळे रुग्ण शॉकमध्ये गेल्याचे आढळून आले.

या घटनेनंतर महापालिकेकडून संबंधित दोन्ही रुग्णालयांना नोटीस बजावण्यात आली असून उपचारासंदर्भातील सर्व कागदपत्रे सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, या प्रकरणी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवले असून सीसीटीव्ही फुटेजही ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सुरू आहे.

मृत महिलेच्या कुटुंबीयांनी पोलिस आयुक्तांची भेट घेऊन दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. मात्र रुग्णालय प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावत, रुग्णाचे सर्व सिग्नल नॉर्मल असल्याचा दावा केला आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, दोषींवर काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा

SBI ग्राहकांनो लक्ष द्या! उद्या ‘या’ वेळेत तात्पुरत्या सेवा बंद राहणार

सांगलीत भोंदूबाबाची एन्ट्री; स्मशानभूमीत आढळली काळी बाहुली अन् सुया, नागरिकांमध्ये दहशत

GPayचं हटके फीचर! आता बँक अकाउंटशिवाय करा UPI पेमेंट; पॉकेट मनी आहे तरी काय?