बॉलिवूडमधून अत्यंत दु:खद बातमी समोर आली आहे. (sad news) अनेक चित्रपट आणि लोकप्रिय टीव्ही मालिकांमध्ये आपल्या दमदार अभिनयाची छाप उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते भरत कपूर यांचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या 86 व्या वर्षी सोमवारी आपल्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. वयोमानानुसार उद्भवलेल्या आरोग्य समस्यांमुळे त्यांची प्रकृती खालावली होती.

अभिनेते अवतार गिल यांनी भरत कपूर यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला. त्यांनी सांगितले की, भरत कपूर यांच्या मुलाचा त्यांना फोन आला होता. गेल्या तीन दिवसांपासून भरत कपूर अस्वस्थ होते. याआधी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांचे निधन झाले.
त्यांच्या निधनानंतर मंगळवारी सायन रुग्णालयाजवळील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी आणि तीन मुलांचा परिवार आहे. 30 एप्रिल रोजी सायन रुग्णालयाजवळील भाऊ दाजी मार्गावरील नॉर्थ बॉम्बे असोसिएशन येथे त्यांच्या चौथ्याची विधी पार पडणार असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली आहे. भरत कपूर यांच्या अंत्यसंस्कारावेळी अभिनेते राकेश बेदी, दिग्दर्शक रमेश कुमार, अभिनेते कुलदीप सिंग तसेच IPTA थिएटर ग्रुपचे अनेक सदस्य उपस्थित होते. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे.
भरत कपूर हे हिंदी चित्रपटसृष्टीतील परिचित आणि विश्वासार्ह कलाकार मानले जात होते. 1970 च्या दशकाच्या सुरुवातीपासून त्यांनी चार दशकांहून अधिक काळ चित्रपट आणि दूरदर्शन क्षेत्रात काम केले. सहाय्यक भूमिका, नकारात्मक व्यक्तिरेखा आणि प्रभावी पडद्यावरील उपस्थिती यामुळे त्यांनी प्रेक्षकांच्या मनात वेगळी ओळख निर्माण केली.
‘नूरी’, ‘राम बलराम’, ‘लव्ह स्टोरी’, ‘बाजार’, ‘आखरी रास्ता’, ‘सत्यमेव जयते’, ‘स्वर्ग’, ‘खुदा गवाह’, ‘साजन चले ससुराल’ आणि ‘मीनाक्षी: ए टेल ऑफ थ्री सिटीज’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या. तसेच ‘सांस’, ‘अमानत’, ‘भाग्यविधाता’, ‘तारा’, ‘चुनौती’ आणि ‘कहानी चंद्रकांता की’ यांसारख्या मालिकांमधूनही त्यांनी घराघरांत लोकप्रियता मिळवली. भरत कपूर यांच्या निधनाने हिंदी चित्रपटसृष्टीतील एक अनुभवी आणि बहुआयामी कलाकार हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
हेही वाचा
अचानक बदलला टी 20i संघाचा कर्णधार, आता या खेळाडूकडे नेतृत्व
सावध ‘हे’ आजार मूकपणे ठरतील जीव घेणारे, जाणवत नाही एकही लक्षण
धावत्या लोकलमध्ये खुनी खेळ, धारदार चाकूने प्रवाशांमध्ये मोठी घबराट नेमकं काय घडलं?