महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. बारावीची परीक्षा १० फेब्रुवारी ते ११ मार्चदरम्यान, तर दहावीची परीक्षा २० फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत पार पडली होती. सर्व विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण झाली (Important news) असून गुणांचे संकलनही अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे बारावीचा निकाल ५ मेपर्यंत, तर दहावीचा निकाल १५ मेपूर्वी जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

यंदा बोर्डाकडून निकालासोबत मोठा बदल करण्यात आला आहे. बनावट गुणपत्रिका आणि प्रमाणपत्रांच्या वाढत्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी गुणपत्रिका आणि बोर्ड प्रमाणपत्र आता स्वतंत्र न देता एकाच पानावर दिले जाणार आहे. या नव्या दस्तऐवजावर विद्यार्थ्याचा फोटो छापलेला असेल. तसेच त्यावर विशेष क्युआर कोडही देण्यात येणार आहे.
हा क्युआर कोड स्कॅन केल्यावर संबंधित विद्यार्थ्याची संपूर्ण वैयक्तिक आणि शैक्षणिक माहिती पाहता येणार असल्याने बनावटगिरीला मोठा अडथळा निर्माण होणार आहे. महाराष्ट्र बोर्डाच्या इतिहासात प्रथमच असा बदल करण्यात आला असून यामुळे प्रमाणपत्रांची विश्वासार्हता वाढणार आहे. सध्या सर्व विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकांची छपाई प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. निकाल लागल्यानंतर साधारण महिनाभरात विद्यार्थ्यांना मूळ गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र वितरित करण्यात येणार आहे.
दरम्यान, अकरावी प्रवेश प्रक्रियेबाबतही महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. गेल्या वर्षापासून अकरावीची प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने राबवली जात आहे. अनेक विद्यार्थी केवळ प्रवेश घेऊन वर्षभर कोचिंग क्लासला जात असल्याच्या तक्रारींनंतर ही पद्धत अधिक काटेकोर करण्यात आली आहे. यंदा दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे १७ मेपासून अकरावी प्रवेशासाठी नोंदणी सुरू होणार आहे. ऑनलाइन गुणपत्रिकेच्या आधारे विद्यार्थ्यांना महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरता येणार असून शिक्षण विभागाने त्यासाठी तयारी सुरू केली आहे.
हेही वाचा
अचानक बदलला टी 20i संघाचा कर्णधार, आता या खेळाडूकडे नेतृत्व
सावध ‘हे’ आजार मूकपणे ठरतील जीव घेणारे, जाणवत नाही एकही लक्षण
धावत्या लोकलमध्ये खुनी खेळ, धारदार चाकूने प्रवाशांमध्ये मोठी घबराट नेमकं काय घडलं?