केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आठवा वेतन आयोग नेमका कधी लागू होणार, याबाबत उत्सुकता वाढत असतानाच आयोगाच्या तयारीला वेग आला आहे. समिती आता अॅक्शन मोडमध्ये आली असून बैठकींची (curiosity) मालिकाच सुरू झाली आहे. मागील आठवड्यात देहरादून येथे पहिली बैठक पार पडली, तर पुढील महत्त्वाची बैठक दिल्लीमध्ये कर्मचारी संघटनांसोबत होणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीच्या अपेक्षांना नवी चालना मिळाली आहे.

दरम्यान, विविध कर्मचारी संघटनांनी आपल्या मागण्या आयोगासमोर मांडण्यास सुरुवात केली आहे. त्यामध्ये फेडरेशन ऑफ नॅशनल पोस्टल ऑर्गनायझेशनने (FNPO) टपाल विभागातील कर्मचाऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर वेतनवाढीची मागणी केली आहे. पोस्टमन आणि मेल गार्ड कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन सध्याच्या २५,५०० रुपयांवरून थेट १ लाख १२ हजार रुपये करण्याचा प्रस्ताव संघटनेने दिला आहे. लेव्हल-५ पदांसाठी ही मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय नव्याने रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठीही मोठ्या वेतनश्रेणीची मागणी करण्यात आली आहे. मल्टी टास्किंग स्टाफसाठी प्रारंभिक वेतन ६९ हजार रुपये ठेवावे, अशी संघटनेची भूमिका आहे. सध्या सातव्या वेतन आयोगानुसार नव्या कर्मचाऱ्यांचे बेसिक वेतन १८ हजार रुपये आहे. त्यामुळे प्रस्तावित वाढ लक्षणीय मानली जात आहे. FNPO ने फिटमेंट फॅक्टरमध्येही मोठी वाढ सुचवली आहे. सध्या २.५७ असलेला फिटमेंट फॅक्टर वाढवून ३.८३ करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. हा प्रस्ताव मान्य झाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी झेप दिसू शकते.
तसेच ग्रामीण डाक सेवकांनाही आठव्या वेतन आयोगाच्या कक्षेत आणावे, अशी ठोस मागणी करण्यात आली आहे. त्यांच्यासाठीही समान लाभ आणि संरक्षण मिळावे, अशी संघटनेची भूमिका आहे. याशिवाय सर्व कर्मचाऱ्यांना दरवर्षी ६ टक्के वेतनवाढ देण्याची मागणीही पुढे करण्यात आली आहे.
डाक सहाय्यक, सॉर्टिंग सहाय्यक, मेल गार्ड, नागरी शाखा, प्रशासकीय कार्यालय आणि लेखा विभागातील कर्मचाऱ्यांसाठीही स्वतंत्र मागण्या आयोगाकडे सादर करण्यात आल्या आहेत. काही वेतनस्तरांचे विलीनीकरण करण्याचाही प्रस्ताव देण्यात आला आहे.
आठवा वेतन आयोग अद्याप अधिकृतरीत्या लागू झालेला नसला तरी बैठका सुरू झाल्याने प्रक्रिया वेगाने पुढे जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे येत्या काळात केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा
अचानक बदलला टी 20i संघाचा कर्णधार, आता या खेळाडूकडे नेतृत्व
सावध ‘हे’ आजार मूकपणे ठरतील जीव घेणारे, जाणवत नाही एकही लक्षण
धावत्या लोकलमध्ये खुनी खेळ, धारदार चाकूने प्रवाशांमध्ये मोठी घबराट नेमकं काय घडलं?