जिममध्ये व्यायाम करणारे तरुण, शरीरयष्टी कमावण्यासाठी प्रोटीन पावडर घेणारे नागरिक आणि सोशल मीडियावर हेल्थ सप्लिमेंट्सचा प्रचार करणाऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. (Tukaram Mundhe) अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी प्रोटीन पावडर, न्यूट्रास्युटिकल्स आणि आरोग्यपूरक उत्पादनांच्या विक्रीसंदर्भात कठोर नियम लागू करण्याची घोषणा केली आहे. या नियमांचे उल्लंघन केल्यास पाच ते दहा लाख रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो. इतकेच नव्हे, तर सप्लिमेंट्समुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास जन्मठेपेच्या शिक्षेचीही तरतूद करण्यात आली आहे.

सध्या तरुणांमध्ये जिममध्ये जाणे, शरीर कमावणे आणि फिटनेस राखण्याचे प्रमाण वाढले आहे. या वाढत्या मागणीचा फायदा घेत अनेक व्यावसायिक तसेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून विविध प्रकारच्या हेल्थ सप्लिमेंट्सची विक्री केली जात आहे. मात्र, ही उत्पादने वापरण्यापूर्वी आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन घेतले जात नसल्याचे दिसून आले आहे.परिणामी, कोणते उत्पादन किती प्रमाणात घ्यावे किंवा ते शरीरासाठी योग्य आहे की नाही, (Tukaram Mundhe) याची माहिती नसतानाही अनेक तरुण त्यांचे सेवन करत आहेत. अशा उत्पादनांच्या वापरामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने आता या व्यवसायावर नियंत्रण आणण्याचा निर्णय घेतला आहे.
एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पत्रकार परिषद घेऊन या नव्या नियमांची माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, प्रोटीन पावडर, मल्टिव्हिटॅमिनच्या गोळ्या, वजन कमी करण्यासाठी वापरली जाणारी उत्पादने, खेळाडूंसाठीचे पूरक आहार आणि हर्बल प्रोडक्ट्स यांची बाजारपेठ मोठ्या प्रमाणात विस्तारली आहे.मात्र, काही ठिकाणी उत्पादनामध्ये असलेले प्रत्यक्ष घटक आणि त्याच्या पॅकेटवर किंवा जाहिरातीत दिलेले नाव यामध्ये तफावत आढळली आहे. 13 नोव्हेंबर रोजी करण्यात आलेल्या कारवाईतही अशाच प्रकारचे गैरप्रकार उघडकीस आल्याचे मुंढे यांनी सांगितले. त्यामुळे एफडीएची अधिकृत परवानगी घेतल्याशिवाय जिम सप्लिमेंट्सचे उत्पादन, वितरण किंवा विक्री करता येणार नाही.
नव्या नियमांची अंमलबजावणी केवळ उत्पादक किंवा विक्रेत्यांपुरती मर्यादित राहणार नाही. सप्लिमेंट्स तयार करणाऱ्या कंपन्या, पुरवठादार, वितरक, आयातदार, मेडिकल स्टोअर्स, जिम आणि हेल्थ सेंटर्स यांनाही या तरतुदींचे पालन करावे लागेल. संबंधित व्यवसायासाठी एफडीएचा आवश्यक परवाना असणे बंधनकारक करण्यात आले आहे. परवानगीशिवाय उत्पादन तयार करणे, त्याचा पुरवठा करणे किंवा बाजारात विक्री करणे हा नियमभंग मानला जाणार आहे. त्यामुळे या क्षेत्रातील प्रत्येक व्यावसायिकाला आपल्या व्यवसायाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.
दुसरीकडे, सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सच्या जाहिरातींवरही प्रशासनाचे विशेष लक्ष असणार आहे. सध्या अनेक जण इन्स्टाग्राम रील्स आणि इतर सोशल मीडिया माध्यमांतून वजन झटपट कमी करणे, चेहऱ्याचा रंग उजळवणे किंवा त्वचेला ग्लो आणणे अशा प्रकारचे दावे करत विविध उत्पादनांचा प्रचार करतात. प्रत्यक्षात या दाव्यांना योग्य आधार किंवा वैद्यकीय मान्यता नसतानाही नागरिकांचा त्यावर विश्वास बसतो. लहान मुले, गर्भवती महिला, विविध आजारांनी त्रस्त असलेले रुग्ण आणि खेळाडूही अशा उत्पादनांचे सेवन करतात. (Tukaram Mundhe) त्यामुळे चुकीच्या माहितीमुळे आरोग्याचे नुकसान होण्याचा धोका वाढतो. यापुढे दिशाभूल करणाऱ्या जाहिराती करणारे इन्फ्लुएंसर्स आणि संबंधित विक्रेत्यांवरही कठोर कारवाई केली जाणार असल्याचे तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले आहे.
नियमभंग केल्यास किती दंड आणि शिक्षा :
– नियमावलीचे उल्लंघन केल्यास पाच लाख रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो.
– हेल्थ सप्लिमेंट्सबाबत दिशाभूल करणाऱ्या जाहिराती केल्यास दहा लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो.
– एफडीएचा परवाना न घेता व्यवसाय केल्यास दहा लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे.
– संबंधित सप्लिमेंट्सच्या सेवनामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.
हेही वाचा :
दूध दरवाढीचा ग्राहकांना मोठा झटका, गोकुळकडून इतिहासामधली सर्वात मोठी दरवाढ
कबनूर येथे दोन घरफोड्यांमध्ये सव्वातीन लाखांचा ऐवज लंपास
थंडीच्या दिवसांत दही खाणे योग्य की अयोग्य आयुर्वेदात नेमकं काय म्हटलं