दिल्लीतील “मानापमान” एक राजकीय(न)नाट्य

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी: भारतीय संस्कृतीमध्ये किंवा अन्य कोणत्याही संस्कृतीत मान अपमान अतिशय महत्त्वाचा समजला जातो. जिथे मानसन्मान (Honor)राखला जातो तेथे नक्कीच जावे, पण जिथे मानसन्मानाची अपेक्षा असते तेथे अपमान झाला तर मनाला निश्चितच यातना होतात. कळत आणि नकळत झालेल्या कृतीचा संबंध अपमानाशी लावला जाऊ नये. तो अस्मितेचा मुद्दा कोणी बनवू नये. त्याही पुढे जाऊन कोणाला हा अपमान झाला आहे असे वाटत नसेल किंवा त्याच्या ध्यानीमनीही नसेल तर इतरांनी त्या कृतीमध्ये अपमानच आहे असे सांगण्याचे काही कारण उरत नाही. पण हे झाले सर्व सामान्य जनते बद्दल. राजकारणी लोकांचे काय? त्यांना कोणताही विषय चालतो किंबहुना ही मंडळी विषय शोधतच असतात.

आणि विषय सापडला की त्याचे राजकीय भांडवल केले नाही तर तो राजकारणी नव्हेच! नवी दिल्लीत देशाचे विरोधी पक्षनेते काँग्रेसचे राहुल गांधी यांच्या निवासस्थानी गुरुवारी झालेल्या एका कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांना सहाव्या रांगेत बसवले गेले असा मुद्दा काहीजणांनी उपस्थित केला आहे आणि त्यावर उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे(Honor).नवी दिल्लीतील या घटनेवरून महाराष्ट्रात मात्र संगीत मानापमान या नाटकाचे राजकीय मंचावर प्रयोग सुरू झाले आहेत. कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांनी इसवी सन 1911 म्हणजे 114 वर्षांपूर्वी लिहिलेल्या संगीत मानापमान या नाटकाचे प्रयोग वेगळा संदर्भ घेऊन महाराष्ट्रातील राजकारणी मंडळींच्याकडून सुरू केले जातील असे तेव्हा त्यांनाही वाटले नसेल. तेव्हा हे नाटक किर्लोस्कर नाटक मंडळी या नाट्यसंस्थेकडून रंगभूमीवर आणले होते आणि आता या नाटकाचे मानापमान हे शीर्षक घेऊन काहीजणांनी त्याचे राजकीय प्रयोग सुरू केले आहेत.


गुरुवारी नवी दिल्ली येथे राहुल गांधी यांच्या निवासस्थानी इंडिया आघाडीतील नेत्यांच्यासाठी स्नेह भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याआधी राहुल गांधी यांनी भारतीय जनता पक्षाकडून मत चोरी कशी केली जाते याचे एका स्क्रीनच्या माध्यमातून डेमो दाखवण्याचे नियोजन केले होते आणि ते पाहण्यासाठी उद्धव ठाकरे हे सहाव्या रांगेत बसले होते या मुद्द्यावरून शुक्रवारी दिवसभर महाराष्ट्रात उलट सुलट प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात होत्या.स्क्रीनवर जे दाखवले गेले जात होते ते लांबूनच व्यवस्थित दिसू शकते म्हणूनउद्धव ठाकरे हे सहाव्या रांगेतील खुर्चीवर बसले होते.त्यांना मणक्याचाही त्रास आहे. असा खुलासा याबद्दल चर्चा सुरू झाल्यानंतर संजय राऊत यांनी केला आहे. पण हा खुलासा महायुतीच्या घटक पक्षांतील काही जणांना समाधानकारक वाटलेला नाही.

भारतीय जनता पक्षाचे आशिष शेलार, चंद्रशेखर बावनकुळे, शिवसेनेचे एकनाथ शिंदे, नरेंद्र म्हस्के, यांनी सहाव्या रांगेचा मुद्दा उपस्थित केला आहे. शिंदे म्हणतात की काँग्रेसने उद्धव ठाकरे यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे, तर नरेंद्र मस्के म्हणतात की हा महाराष्ट्राचा अपमान आहे, आशिष शेलार यांनी तर हा मराठी माणसाचा दिल्लीकरांनी केलेला अपमान आहे असे म्हटले आहे, भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ठाकरे कुटुंबाने सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी जाणे म्हणजे वाकणे असा त्याचा अर्थ होतो असे म्हटले आहे.बाळासाहेब ठाकरे असताना दिल्लीतील बडे नेते हे मातोश्रीवर बाळासाहेबांना भेटायला जायचे. बाळासाहेब मात्र कधीही कुणाच्याही घरी कुणाला भेटायला म्हणून गेलेले नव्हते याची आठवणही ही मंडळी आज करून देताना दिसत होती.

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला उद्धव ठाकरे यांच्यावर जहाल टीका करायला या निमित्ताने संधीमिळाली आहे. पिंजरा चित्रपटातील मास्तर ची उपमा ठाकरे यांना देण्यात आली आहे.संजय राऊत यांनी सेनेचे खासदार म्हस्के यांना धुंदी गांडूळ म्हटले आहे तर मस्के यांनी राऊत यांना गांजा राऊत म्हटले आहे. सुषमा अंधारे यांनी बाळासाहेबांचा पक्ष चोरणारे तुम्ही अशी टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांना सहाव्या रांगेत बसवले अशी टीका करणाऱ्या मंडळींना सुप्रिया सुळे यांनी बालिशपणा असे म्हटले आहे. राहुल गांधी यांच्या निवासस्थानातील कार्यक्रम हा खासगी होता, त्यामुळे तेथे मान अपमान किंवा शिष्टाचार असा काही संबंध नव्हता. कुणी कुणाला मुद्दाम अमुक ठिकाणीच बसण्यास सांगितलेले नव्हते. असा खुलासाही त्यांनी केला तेव्हा तुम्ही पहिल्या रांगेत कशा काय असा प्रतिसाद त्यांना करण्यात आला. एकूणच दिल्लीतील मानापमान चा विषय महाराष्ट्रात सध्या गाजतो आहे. आणखी काही दिवस तो चघळला जाणार आहे.

हेही वाचा :

सलमान-ऐश्वर्या रायची अनोखी गोष्ट: ‘भाऊ’च्या भूमिकेतून प्रेमकथेपर्यंतचा प्रवास
महादेवी हत्तीणीच्या घरवापसीसाठी सर्वोच्च न्यायालयात सोमवारी संयुक्त याचिका
कुलगाममध्ये भीषण चकमक: 2 जवान शहीद, 11 जखमी