कोल्हापूर जिल्हा वार्तापत्र : कोल्हापूरात महापौर खुर्चीचा पुन्हा पोरखेळ

कोल्हापूर कमी कालावधीचा – सहा महिन्याचा महापौर करण्याच्या प्रकारामुळे कोल्हापूरच्या महापौर पदाची राज्यभर अप्रतिष्ठा झाली. आता महापालिकेत महायुतीची सत्ता आहे आली तरी हे चित्र बदलण्याची शक्यता कमीच आहे. भाजपचा महापौर होऊन दहा महिन्यांचा कालावधी झाल्यावर आताच त्यांना बदलावे या मागणीसाठी एकनाथ शिंदे शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस कडून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.

भाजप इतक्यात पद सोडण्यास तयार नसल्याने ऐन थंडीत महापौर बदलावरून कोल्हापुरातील राजकारण तापले आहे. यंदाच्या जानेवारीत झालेल्या निवडणुकीत काँग्रेस ३४ जागा मिळवून सर्वात मोठा पक्ष ठरला होता. ठाकरे शिवसेनेला १ जागा मिळाली होती. (Kolhapur) तरीही महायुतीने भाजपचे २६, शिंदे शिवसेनेचे १४, अजित पवार राष्ट्रवादीचे ४, जनसुराज्यचा १ असे ४६ संख्याबळ जमवले. मोठा भाऊ म्हणून भाजपचा पहिला महापौर ६ फेब्रुवारीला रुपाराणी निकम यांच्या रूपाने झाला.

तथापि, महापौर पद कोणत्या पक्षाला, किती कालावधीसाठी याचे सूत्र ठरले नसल्याने आता महापालिकेत महापौर पदावरून मित्रपक्षात वादाला तोंड फुटले आहे. उपमहापौरपदी जनसुराज्यचे एकमेव सदस्य अक्षय जरग यांची निवड झाली. (Kolhapur) त्याला आता दहा महिने होत आले. त्यावर, सर्वांना संधी मिळावी म्हणून महापौरपदाचा कालावधी १० महिने ठेवण्याचे ठरले होते, अशी शिंदे शिवसेनेची भूमिका पुढे आली आहे. तर इचलकरंजीच्या धर्तीवर, कामाला वेळ मिळावा म्हणून सव्वा वर्षाचा कालावधी असावा, अशी भाजपची भूमिका आहे. या दोन भूमिकांमधूनच सध्याचा वाद पेटला आहे.

विद्यमान महापौर रुपाराणी निकम यांनी आपण वरिष्ठांच्या आदेशानंतरच राजीनामा देणार, महापौरपदाचा किमान सव्वा वर्षाचा कालावधी मिळायला हवा, अशी इच्छा व्यक्त केली आहे. याबाबत भाजपचे स्थानिक वरिष्ठ नेते मौन बाळगून आहेत. आणखी कालावधी मिळाला तर बरेच अशी त्यांची सुप्त भावना असावी. त्यामुळे भाजपचा महापौर सव्वा वर्ष ठेवायचा की पूर्वीप्रमाणेच १० महिन्यांची खांडोळी करायची, हे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या हातात आहे, यावरून मतभेत ताणले गेले आहेत.

शिंदे शिवसेनेचे आमदार, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी स्पष्ट महापालिका निवडणुकीनंतर महायुतीच्या नेत्यांनी एकत्रितपणे महापौरांचा कालावधी १० महिन्यांचा ठरवला होता. जे ठरले ते घडत गेले तर कटुता येत नाही, अन्यथा कटुता वाढत जाते. सर्व नगरसेवकांना संधी मिळावी यासाठी १० महिन्यांचे महापौरपद ठरले होते, तेच कायम असावे. याबाबत मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत चर्चा झाली आहे, असे स्पष्ट करीत महापौर बदलण्याची वेळ आली असल्याचे अधोरेखित केले आहे. शिंदेसेनेच्या वतीने महापौरपदासाठी अजित इंगवले, आश्किन आजरेकर, अनुराधा खेडकर, अभिजीत खतकर यांची नावे चर्चेत असून शारंगधर देशमुख यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. शिंदे शिवसेनेने कोल्हापूरचा महापौर शिवसेनेचाच होईल, असा दावा केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आदिल फरास यांनीही महापौर पदावर दावा केल्याने वादाची तीव्रता वाढली आहे. महायुतीमधील पक्षाला १० महिन्याचा कालावधी दिला गेल्याचा दावा त्यांनी केला असल्याने भाजप – शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी अशीही तिहेरी रस्सीखेच सुरू झाली आहे. परंतु, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ हे मात्र कालावधी बाबत संभ्रमात असल्याचे दिसतात. महापौपदाचा कालावधी सव्वा वर्षे की १० महिने याबाबत महापौर निकम, आमदार क्षीरसागर यांच्याशी चर्चा करून वरिष्ठ पातळीवर तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे म्हटले आहे. काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी महायुतीतील गोंधळावर आमच्या काळातही महापौर बदलण्यात आले, परंतु आतासारखी भांडणे आमच्या काळात नव्हती, टोला मारला आहे.

या सगळ्याचे वादाचे राजकीय परिणाम होतील असे दिसत आहे. एकतर, महायुतीतील विश्वासाला तडा जाण्याची भीती आहे. ठरलेले सूत्र (फॉर्म्युला) पाळला नाही तर पुढील प्रत्येक पदवाटपात अविश्वास वाढत जाईल. दुसरा परिणाम म्हणजे कोल्हापूरचे राजकारण हे नेहमीच वेगळे, आक्रमक, स्वाभिमानी राहिले आहे. (Kolhapur) त्यामुळे मुंबईतून घेतलेला निर्णय स्थानिक कार्यकर्त्यांना मान्य होईलच, असे नाही. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत त्याचा प्रकर्षाने प्रत्यय आला आहे. तिसरा परिणाम म्हणजे सव्वा वर्षाचा कालावधी ठरला तर पाच वर्षांत चारच महापौर होतील, १० महिन्यांचा कालावधी ठरला तर सहा महापौर होतील, त्यामुळे अनेक इच्छुक नगरसेवकांचे भवितव्य या निर्णयावर अवलंबून राहील. आणखी म्हणजे, गोकुळच्या निवडणुकीत महायुतीने एकत्र येऊन सतेज पाटील यांना सत्तेपासून दूर ठेवले होते. आता महापौरपदावरून महायुतीतच फूट पडली तर त्याचा फायदा काँग्रेसला होऊ शकतो. वादाचा आणखी एक परिणाम म्हणजे कोल्हापूर महापौरपद अडीच वर्षांसाठी ओबीसीसाठी राखीव आहे. त्यामुळे पुढील महापौर ओबीसी समाजातूनच येणार, हे निश्चित आहे.पण त्यामुळे दाखले, जात पडताळणी यावरूनही नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बैठकीत होणार असल्याचे सांगितले जाते. तो निर्णय कोणाच्या बाजूने झुकतो, त्यावर कोल्हापूर महापालिकेतील पुढील अडीच वर्षांचे राजकारण, महायुतीची एकी, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सत्तासमीकरणे ठरणार आहेत. सत्ता आली पण वादाला सुरुवात झाली हे चित्र कोल्हापुरातील महायुतीसाठी त्रासदायक ठरू शकते.

हेही वाचा : 

इचलकरंजीत पाणी वाया घालवणाऱ्यांवर महापालिकेचा बडगा, तोटी नसलेली ३१ नळजोडणी खंडित

कृषिमंत्र्यांचा फायन्सास कंपन्यांना मोठा इशारा, थेट मुख्यमंत्रीच

नोकरभरतीचे पेपर फोडणाऱ्यांची आता खैर नाही सरकारने घेतला डेंजर निर्णय, आता थेट