नृसिंहवाडीतील कन्यागत महापर्वकाळासाठी शिरोळ पालिकेचा १८६७ कोटीचा विकास आराखडा तयार, पालिका सभेत सादरीकरण

सन २०२८ साली तीर्थक्षेत्र नृसिंहवाडी येथे होणाऱ्या ‘ कन्यागत महापर्वकाळा’च्या निमित्ताने भाविक आणि शिरोळकर नागरिकांसाठी सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शिरोळ नगरपालिकेकडून सुमारे १८६७ कोटी रुपयाचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. या विकास आराखड्याचे शिवपालिकेच्या बुधवारी झालेल्या सभेत चित्रफितद्वारे पदाधिकारी, नगरसेवक यांच्यासमोर सादरीकरण करण्यात आले.

सभेत शिरोळ शहरातील गायरान जागेत असणारे सर्व अतिक्रमण नियमानुकूल करण्यासाठी प्रयत्न करणे. अमृत २.० पाणीपुरवठा योजनेचे काम मार्च २०२७ अखेर पूर्ण करणे. (Shirol) यासह विषय पत्रिकेवरील सर्व विषयांना पालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. शिरोळ नगरपरिषदेच्या कै. दिनकरराव यादव सभागृहात प्रथम लोकनियुक्त महिला नगराध्यक्षा योगिता कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली उपनगराध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव व मुख्याधिकारी विशाल पाटील यांच्या उपस्थितीत सर्वसाधारण सभा झाली.

या सभेत मानाची जय भवानी तोफेच्या दुरुस्तीसाठी आणि दसऱ्यानिमित्त तोफेच्या सलामीसाठी शोभेची दारू खरेदी केलेल्या खर्चास मंजुरी देण्यात आली. यानंतर अमृत २.० पाणीपुरवठा योजनेचे मक्तेदार ईगल इन्फ्रा इंडिया यांच्याकडून आलेल्या पत्राचे वाचन करण्यात आले. या पाणीपुरवठा योजनेच्या सुरू असलेल्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. ही योजना मार्च २०२७ अखेर पूर्ण करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला. प्रारूप विकास आराखडा योजनेचा आढावा घेत असताना शहरातील रहदारी सुलभ करण्यासाठी बाह्य रस्ते तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला.

नगरपालिकेच्यावतीने शहरातील मालमत्ता कर आकारणीसाठी फेर सर्व्हे करण्यासाठी नवीन ठेकेदार नेमून दोन महिन्यात सर्व्हे पूर्ण करून नागरिकांच्या दंडाची रक्कम माफ करण्यासाठी प्रयत्न करणे. चुकीची मालमत्ता कर आकारणी निश्चित करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करण्याचा निर्णय या सभेत घेण्यात आला.आठवडा बाजार व दैनंदिन बाजारातील कर वसुलीत नाममात्र भाडेवाढ करण्यात आली. (Shirol) शहरातील गायरान जमिनीवरील सर्व अतिक्रमणे नियमानुकूल करण्यासाठी पालिकेच्या वतीने पाठपुरावा करण्यास मंजुरी देण्यात आली. अग्निशामन वाहनाचा विमा उतरवण्यासाठी आलेल्या खर्चास मंजुरी देण्यात आली.

नगरपरिषदेकडून शहरातील दहीहंडी गोविंदाचा विमा उतरवण्यासाठी अजिंक्यतारा मंडळाकडे वर्ग करण्यात (Shirol) आलेल्या रक्कमेतून झालेल्या खर्चास मंजुरी देण्यात आली. पालिकेच्या माध्यमातून पथ विक्रेत्यांच्या अडीअडचणी सोडवून त्यांना शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे. कोळी गल्ली येथील अंबाबाई मंदिराच्या सभागृहाचे बांधकाम पालिकेच्यामाध्यमातून करण्यासाठी पत्रव्यवहार करणे, यासह विविध विषयांना मंजुरी देण्यात आली.

या सभेस कल्पना काळे, सुवर्णा कांबळे, रेखा कोरे, सविता पुजारी, दिपाली फल्ले, अनुराधा गुरव, विदुला यादव, श्वेता जाधव, शिवानी कांबळे, अमरसिंह पाटील, शरद मोरे, दीपक भाट, विजय आरगे, ओंकार गावडे, उल्हास आवळे, अमरसिंह शिंदे, राहुल कोळी, सचिन शिंदे, निलेश गावडे, शाहुल कोळी आदी नगरसेवक, नगरसेविका पालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा : 

इचलकरंजीत पाणी वाया घालवणाऱ्यांवर महापालिकेचा बडगा, तोटी नसलेली ३१ नळजोडणी खंडित

कृषिमंत्र्यांचा फायन्सास कंपन्यांना मोठा इशारा, थेट मुख्यमंत्रीच

नोकरभरतीचे पेपर फोडणाऱ्यांची आता खैर नाही सरकारने घेतला डेंजर निर्णय, आता थेट