सहलीला गेली अन् घात झाला, 15 वर्षांच्या मुलीचा दरीत सापडला मृतदेह, पालकांनो ‘या’ 5 चुका टाळा

वार्षिक परीक्षा संपली की मुलांच्या आनंदाला पारावार राहत नाही. केरळमधील 15 वर्षांची श्रीनंदाही असाच आनंद साजरा करण्यासाठी कर्नाटकातील चिक्कमंगळुरूच्या डोंगररांगांमध्ये कुटुंबासोबत सहलीला गेली होती. पण नियतीला काही वेगळेच मान्य होते. दोन दिवस बेपत्ता राहिल्यानंतर अखेर श्रीनंदाचा मृतदेह माणिक्यधारा धबधब्याजवळील दरीत आढळला.

निसर्गाचा आनंद कधी शोकांतिकेत बदलेल याचा नेम नसतो. कर्नाटकातील चिक्कमंगळुरू येथे सहलीला गेलेल्या श्रीनंदा या मुलीचा दरीत पडून झालेला मृत्यू ही केवळ एक अपघात नाही, तर प्रत्येक पालकासाठी दिलेली धोक्याची घंटा आहे. (karnataka) काही सेकंदांचे दुर्लक्ष किंवा ‘रील्स’चा मोह किती महाग पडू शकतो, हे या दुर्दैवी घटनेवरून समोर आले आहे. जर तुम्हीही मुलांसोबत फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. जाणून घ्या, पर्यटन स्थळांवर मुलांचा जीव धोक्यात पडू नये म्हणून कोणत्या 5 गोष्टींची खबरदारी घेणे आवश्यक आहे.

केरळमधील पालक्कड येथील 15 वर्षीय श्रीनंदा हिचा कर्नाटकातील चिक्कमंगळुरू येथील बाबा बुदानगिरी डोंगर रांगांमध्ये झालेला मृत्यू अत्यंत दुर्दैवी आहे. 10 वीची परीक्षा संपल्यानंतर आनंदाने सहलीला आलेली ही मुलगी अचानक बेपत्ता झाली आणि दोन दिवसांनी तिचा मृतदेह दरीत आढळला. या घटनेने पर्यटन स्थळांवरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

  1. सेल्फी आणि रीलचा मोह टाळा
    काही वेबसाईटच्या वृत्तांनुसार, श्रीनंदा बेपत्ता होण्यापूर्वी मोबाईलवर रील रेकॉर्ड करत होती. डोंगरदऱ्या किंवा धबधब्यांच्या ठिकाणी एका सेकंदाचे दुर्लक्षही जीवघेणे ठरू शकते. पालकांनी मुलांना कड्याच्या टोकावर जाऊन फोटो काढण्यापासून रोखले पाहिजे.
  2. ‘हँड-होल्डिंग’ आणि देखरेख
    विशेषतः धुक्याच्या ठिकाणी किंवा घनदाट जंगलात मुलांचा हात सोडू नका. श्रीनंदा ज्या ठिकाणाहून बेपत्ता झाली, तिथून तिचा मृतदेह अवघ्या 150 मीटर अंतरावर सापडला. निसर्गात मुले पटकन डोळ्याआड होतात, त्यामुळे त्यांच्यावर सतत नजर ठेवा.
  3. हवामान आणि स्थानिक परिस्थिती
    चिक्कमंगळुरू किंवा सह्याद्रीसारख्या भागात हवामान क्षणात बदलते. धुक्यात रस्ता सापडणे कठीण होते. अशा वेळी मुलांच्या खिशात पालकांचा फोन नंबर आणि पत्ता असलेले ‘इमर्जन्सी कार्ड’ नेहमी ठेवावे.
  4. योग्य पादत्राणे आणि कपडे
    धबधब्यांच्या ठिकाणी दगड निसरडे असतात. मुलांच्या पायात ग्रीप असलेले ट्रेकिंग शूज आहेत याची खात्री करा. साध्या चपलांमुळे पाय घसरून अपघात होण्याची शक्यता जास्त असते.
  5. आपत्कालीन शिट्टीचा वापर
    ट्रेकिंग किंवा निर्जन ठिकाणी जाताना मुलांच्या बॅगेला एक शिट्टी बांधून ठेवा. जर मुले चुकून लांब गेली किंवा रस्ता चुकली, तर ओरडण्यापेक्षा शिट्टीचा आवाज लांबपर्यंत पोहोचू शकतो, ज्यामुळे त्यांना शोधणे सोपे होते.

हेही वाचा

SBI ग्राहकांनो लक्ष द्या! उद्या ‘या’ वेळेत तात्पुरत्या सेवा बंद राहणार

सांगलीत भोंदूबाबाची एन्ट्री; स्मशानभूमीत आढळली काळी बाहुली अन् सुया, नागरिकांमध्ये दहशत

GPayचं हटके फीचर! आता बँक अकाउंटशिवाय करा UPI पेमेंट; पॉकेट मनी आहे तरी काय?