कोल्हापुरात उमेदवारांपेक्षा नेत्यांचीच कसोटी; कसं आहे निवडणुकीचं चित्र?

महायुतीत कोल्हापूरची जागा कोणाला याविषयी सुरुवातीपासूनच उत्सुकता(picture) होती. २०१९ मध्ये ही जागा शिवसेनेने जिंकली, पण त्यानंतर या पक्षातच फूट पडली. खासदार प्रा. संजय मंडलिक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साथ दिली. त्यामुळे या जागेवर शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा दावा प्रबळ होता. पण जिल्ह्यातील एक तरी जागा भाजपला मिळावी, त्यातही विशेषतः कोल्हापूरची मिळावी यासाठी भाजप नेत्यांचे प्रयत्न सुरू होते.

त्यातून शेवटी ही जागा शिवसेनेला(picture) मिळाली; मात्र खासदार प्रा. मंडलिक यांनाच उमेदवारी मिळेल का नाही याविषयी संभ्रमावस्था होती. तो संभ्रम दूर होऊन मंडलिक यांची उमेदवारी जाहीर झाली. महायुतीचे नेते प्रा. मंडलिक यांच्या प्रचारात सक्रिय असले तरी प्रत्यक्ष कोण किती मताधिक्य देणार? याचा फैसला ४ जूनला होईल.

दुसरीकडे महाविकास आघाडीत कोल्हापूरची जागा काँग्रेसला मिळावी यासाठी जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांचे पहिल्यापासून प्रयत्न सुरू होते. पण या जागेवर उद्धव ठाकरे ठाम होते. जागा आम्हाला द्या, उमेदवार कोणही असू दे अशी त्यांची भूमिका होती. पण पाटील यांनी जागा काँग्रेसला आणि वर्षभरापूर्वीच श्रीमंत शाहू छत्रपती महाराज हेच उमेदवार असतील असे संकेत दिले होते. शाहू महाराज उमेदवार असतील तर चालतील पण त्यांनी शिवसेनेच्या चिन्हावर लढावे अशी भूमिका ठाकरे यांनी घेतली. पण त्यानंतर पाटील यांनी केलेल्या प्रयत्नातून जागा काँग्रेसला मिळाली आणि शाहू महाराजांची उमेदवारी जाहीर झाली.

तिसरा प्रबळ उमेदवार नसल्याने प्रा. मंडलिक विरुद्ध श्रीमंत शाहू छत्रपती महाराज अशी दुरंगी लढत होणार आहे. ‘वंचित’सह अन्य डाव्या पक्षांनीही शाहू महाराज यांना साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात शेकाप, जनता दल, भाकप, माकप यांचा समावेश आहे. शाहू महाराज यांच्या प्रचाराची सर्वस्वी जबाबदारी आमदार सतेज पाटील यांच्यावर असेल. त्यांना आमदार पी. एन. पाटील, जयश्री जाधव, ऋतुराज पाटील, माजी आमदार संजय घाटगे यांच्यासह अन्य नेत्यांची साथ असेल.

दुसरीकडे महायुतीच्या प्रा. संजय मंडलिक यांच्यासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ, मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, समरजितसिंह घाटगे, आमदार प्रकाश आबिटकर, राजेश पाटील हे मैदानात असतील. थेट शाहू महाराज यांच्यावर टीका न करता महायुतीच्या उमेदवारांसह नेत्यांकडून आमदार सतेज पाटील यांना ‘टार्गेट’ केले जात आहे. तर त्याला पाटील प्रत्युत्तर देत आहेत. पाटील यांचा कोल्हापूर दक्षिण, उतर व करवीर विधानसभा मतदारसंघात प्रभाव आहे. त्यांना राधानगरीतील ए. वाय. पाटील, अभिजीत तायशेटे, चंदगडच्या माजी आमदार संध्यादेवी कुपेकर, कागलचे संजय घाटगे अशा नेत्यांची साथ मिळत आहे.

हेही वाचा :

छगन भुजबळ यांची मोठी घोषणा, लोकसभा निवडणुकीतून माघार

मविआला शेट्टींचा अन् महायुतीला पाटलांचा धसका; मत विभाजनानं कोणाचा होणार ‘गेम’?

नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, निवडणूक अर्ज दाखल करताच अमित शहा कडाडले