निवडणूक प्रचाराचे तंत्र कालचे आणि आजचे

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : 21 व्या शतकातील निवडणूक प्रचारावर माहिती व तंत्रज्ञानाचा प्रचंड(political campaign) प्रभाव आहे. वृत्तपत्रे, दूरदर्शन, भ्रमण दुरध्वनी, समाज माध्यम अशी अनेक माध्यमे आज निवडणूक प्रचारासाठी उपलब्ध आहेत. मात्र विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात प्रचार तंत्र फारच मागास होते. उमेदवाराचे नाव, त्याचा राजकीय पक्ष आणि निवडणूक चिन्ह हे शेवटच्या मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी कृष्णधवल वृत्तपत्रे, आणि घरांच्या भिंती, प्रत्येक गल्लीत, चौकात, तिकटीवर, राजकीय पक्षांचे उभारलेले बूथ, ध्वनीवर्धक यंत्रणा, कोपरा सभा, पदयात्रा, “ताई माई अक्का” चा कंठ शोष, आणि चित्रकारांच्या कडून तयार करण्यात आलेली खास भव्य रंगीत पोस्टर्स अशा पातळीवर प्रचाराचा एकूण भर असायचा.

घराच्या भिंती ह्या जणू उमेदवारांच्या मालकीच्या असल्यासारख्या एका रात्रीत रंगवून त्यावर उमेदवाराचे(political campaign) नाव त्याचे निवडणूक चिन्ह काढले जायचे. अनेकदा या भिंती अद्याक्षराच्या माध्यमातून आरक्षित केल्या जायच्या. घरमालकाची पूर्व परवानगी न घेताच भिंतीचा ताबा घेतला जायचा. महापालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या काळात साऱ्या शहराचे आणि गावाचे विद्रुपीकरण व्हायचे. टी एन शेषन यांनी ते निवडणूक आयुक्त असताना शहराचे विद्रुपीकरण थांबवले. घरमालकाची लेखी परवानगी असल्याशिवाय साधा राजकीय पक्षाचा झेंडा सुद्धा लावण्यास प्रतिबंध होता. विलासराव देशमुख हे मुख्यमंत्री असताना त्यांनी शहर विद्रुपीकरण प्रतिबंधक कायदाच पारित केला.

राजकीय पक्षांकडून विशेषतः तेव्हा श्रीमंत असलेल्या काँग्रेस पक्षाकडून देशभरातील वृत्तपत्रांना पान पान भरून जाहिराती दिल्या जायच्या. या जाहिरातीत काही चित्रे काढून, विरोधकांना विंचू, माकड, खेकडे असे म्हटले जायचे. राष्ट्रीय काँग्रेसचे राष्ट्रीय खजिनदार सिताराम केसरी यांच्याकडून देशभरातील प्रमुख वृत्तपत्रांना या जाहिराती प्रसिद्धीसाठी दिल्या जायच्या. या जाहिरातीवर बरीच चर्चा व्हायची. अशाप्रकारे विरोधकांवर होणाऱ्या टिके बद्दल देशातील विचारवंत तेव्हा सह्यांचे निवेदन निवडणूक आयोगाचे आयुक्त आणि राष्ट्रपती यांना द्यायचे.

चाळीस वर्षांपूर्वी कोल्हापुरातील शिवाजी चौकात सध्या जेथे ऑटो रिक्षा स्टॉप आहे तेथे काँग्रेसचे एक भले मोठे पोस्टर लावले जायचे. काँग्रेसचे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार उदयसिंगराव गायकवाड यांच्याकडून शिवाजी चौकात हे भव्य दिव्य पोस्टर लावले जायचे. सुप्रसिद्ध चित्रकार जे बी सुतार यांच्याकडून हे पुस्तक तयार करून घेतले जायचे. त्या पोस्टरचे उद्घाटन व्हायचे. आणि गणेशोत्सवामध्ये एखादा देखावा बघायला लोक झुंडीने कसे येतात तसे हे पोस्टर बघायला शिवाजी चौकात लोक झुंडीने यायचे.

के आर कुंभार यांच्याकडूनही अशा प्रकारचे भव्य पोस्टर तयार करून घेतली जायची. बिंदू चौक, गंगावेश, ताराराणी चौक, फोर्ड कॉर्नर अशा विविध ठिकाणी अशा प्रकारची पोस्टर्स लावली जायची. राजकीय पक्षाच्या उमेदवारांच्या जाहीर प्रचार सभा या प्रामुख्याने बिंदू चौकात व्हायच्या. रात्री दहा वाजल्यानंतर जाहीर सभा घ्यायच्या नाहीत हा नियम तेव्हा पाळला जात नव्हता आणि त्याबद्दल कोणी तक्रारही करत नव्हते. जाहीर प्रचारसभा मधील आरोप आणि प्रत्यारोपामुळे तेव्हा वातावरण तणावग्रस्त बनायचे.

लोकसभा निवडणुकीतील उमेदवार तेव्हा मतदार संघातील तालुक्याचे गाव तसेच इतर मोठी गावे इथेच प्रचारासाठी अर्थात पदयात्रा काढण्यासाठी जात असत. गाव आणि गाव पिंजून काढणे हा प्रकार तेव्हा नव्हता. गावचे पोलीस पाटील, किंवा सरपंच गावकऱ्यांना बोलावून घ्यायचे आणि कोणाला मतदान करायचे हे भंडार्याची शपथ घालून ते सांगायचे. सरपंच किंवा पोलीस पाटील ज्या उमेदवाराला मतदान करा असे सांगतील त्याला मतदान व्हायचे. इकडे तिकडे थोडाफार फरक पडायचा.
प्रचाराच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांच्या कडून भव्य रॅली काढली जायची. ह्या रॅलीज पाहण्यासाठी लोकांची दुतर्फा गर्दी झालेली असायची. ह्या रॅली म्हणजे उमेदवाराचे शक्ती प्रदर्शन मानले जायचे.

हेही वाचा :

भले, आम्ही असो एकत्र! जाहीरनामा आमुचा वेगळा!

पंतप्रधान मोदींची 28 एप्रिलला कोल्हापुरात सभा, तपोवनात येणार भगवं वादळ !

अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना ‘वाय प्लस’ दर्जाची सुरक्षा!