विजय MGR बनले तर…? तामिळनाडूत सत्तेसाठी सुरू मोठा राजकीय गेम, AIADMK अन् DMK मध्ये संभाव्य युती, भाजपचीही एंट्री

तामिळनाडू विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सरकार स्थापनेचा प्रश्न अधिकच गुंतागुंतीचा बनला आहे. कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने सत्तेचा तिढा (complicated) कायम असून राज्याच्या राजकारणात अभूतपूर्व घडामोडी घडताना दिसत आहेत. कट्टर प्रतिस्पर्धी मानले जाणारे डीएमके आणि एआयएडीएमके हे दोन पक्ष एकत्र येण्याच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे.

अभिनेते-राजकारणी विजय यांच्या तामिळनाडू वेत्री कळघम पक्षाने निवडणुकीत मोठी झेप घेतल्याने पारंपरिक पक्षांमध्ये चिंता वाढल्याचे बोलले जात आहे. विजय यांचा वाढता प्रभाव भविष्यातील राजकारणात मोठे बदल घडवू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे त्यांना रोखण्यासाठी डीएमके आणि एआयएडीएमके एकत्र येऊ शकतात, अशी चर्चा रंगली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, या संभाव्य समीकरणामागे भाजपचीही महत्त्वाची भूमिका असू शकते. काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्याचा हा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे. सध्या काँग्रेसने आपल्या पाच आमदारांसह विजय यांना पाठिंबा दर्शवला आहे. चर्चेत असलेल्या सूत्रांनुसार, एआयएडीएमकेचे ई. पलानीस्वामी यांना मुख्यमंत्रीपद देण्यात येऊ शकते, तर डीएमके बाहेरून पाठिंबा देण्याचा पर्याय समोर आहे.

मात्र, डीएमके नेतृत्व या प्रयोगाबाबत सावध भूमिका घेत असल्याचे समजते. अशा युतीमुळे पक्षातील कार्यकर्ते आणि पारंपरिक मतदारांमध्ये नाराजी निर्माण होऊ शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे, विजय यांच्या पक्षानेही आक्रमक भूमिका घेतली आहे. डीएमके-एआयएडीएमकेने सरकार स्थापनेचा दावा केल्यास आपल्या १०८ आमदारांचे सामूहिक राजीनामे दिले जातील, असा इशारा टीव्हीकेकडून देण्यात आला आहे.

तामिळनाडू विधानसभेत बहुमतासाठी ११८ आमदारांचा पाठिंबा आवश्यक आहे. विजय यांच्या पक्षाकडे सर्वाधिक १०८ जागा आहेत. डीएमके आघाडीकडे ७४, एआयएडीएमके आघाडीकडे ५३, तर इतर पक्षांकडे ६ जागा आहेत. त्यामुळे कोणत्याही पक्षाला स्वतंत्रपणे सत्ता स्थापनेचा मार्ग सोपा नाही.

दरम्यान, सर्वात मोठा पक्ष असूनही विजय यांना अद्याप राज्यपालांकडून सरकार स्थापनेचे निमंत्रण देण्यात आलेले नाही. बहुमताचा पुरावा सादर करण्याची अट घालण्यात आल्याने विरोधकांनी राज्यपालांच्या भूमिकेवर टीका केली आहे. सध्याच्या विधानसभेचा कार्यकाळ १० मे रोजी संपत असल्याने घटनात्मक संकट निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

तामिळनाडूतील सध्याची परिस्थिती केवळ सत्ता स्थापनेपुरती मर्यादित नसून राज्याच्या भविष्यातील राजकीय दिशेला आकार देणारी ठरू शकते. विजय यांच्या उदयानंतर निर्माण झालेली नवी समीकरणे आणि पारंपरिक पक्षांची हालचाल यामुळे राज्यातील राजकारण तापले आहे.

हेही वाचा

सावधान! हातात FASTag धरून टोल भरणे पडणार महागात

कर्ज थकवणाऱ्यांच्या मालमत्तेबाबत RBI चे मोठे पाऊल

मोठी बातमी! एकनाथ शिंदेंचा मोठा अपघात टळला, वादळात अडकलं हेलिकॉप्टर