शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी मान्सून आगमनाचा यंदापासून स्थानिक अंदाज, महिनाभर आधीच कळणार तारीख

देशाच्या विविध प्रदेशांत मान्सूनचे आगमन कधी होणार याचा स्थानिक पातळीवरील अंदाज वर्तवणारे मॉडेल (लोकल मान्सून ऑनसेट फोरकास्टिंग सिस्टीम-एलएमओएफएस) पुण्यातील ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटीओरोलॉजी’च्या (आयआयटीएम) पुढाकाराने विकसित करण्यात आले आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा समावेश असलेल्या या मॉडेलच्या साह्याने यंदापासून १५ राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशामधील शेतकऱ्यांना त्यांच्या भागात मान्सून कधी दाखल होईल, हे एक महिना आधी समजू शकेल.

नवी दिल्लीतील कार्यक्रमात मान्सून आगमनाचा अंदाज वर्तवणाऱ्या आणि उत्तर प्रदेशमधील पावसाचा अचूक अंदाज वर्तवणाऱ्या मॉडेलचे मंगळवारी उद्घाटन झाले. या प्रसंगी केंद्रीय पृथ्वी विज्ञान सचिव डॉ. एम. रविचंद्रन, भारतीय हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा आणि ‘आयआयटीएम’चे संचालक डॉ. सूर्यचंद्र राव उपस्थित होते. (Monsoon) मान्सून केरळमध्ये दाखल कधी होणार याच्या तारखेचा अंदाज ‘आयएमडी’तर्फे साधारण दोन आठवडे आधी स्वतंत्रपणे दिला जातो. केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यावर पावसाचे प्रमाण आणि नैर्ऋत्य मोसमी प्रवाहाची स्थिती पाहून देशाच्या इतर राज्यांमध्ये मान्सूनचे आगमन कधी होणार हे काही दिवस आधी जाहीर केले जाते.

‘महाराष्ट्र टाइम्स’शी बोलताना डॉ. राव म्हणाले, ‘आयआयटीएमचा दोन आठवड्यांचा विस्तारित अंदाज, एआयवर आधारित अंदाज आणि शिकागो विद्यापीठाच्या सांख्यिकी मॉडेलच्या एकत्रीकरणातून ‘एलएमओएफएस’ विकसित केले आहे. ‘आयआयटीएम’मधील अर्क सुपर कम्प्युटरवर हे मॉडेल चालवले जाते. (Monsoon) मान्सून आगमनाच्या काळात दर बुधवारी जाहीर होणाऱ्या या अंदाजातून पुढील चार आठवड्यांमध्ये ठरावीक भागांमध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता किती हे समजू शकेल. पहिल्या टप्प्यात मध्य भारतालगतच्या मान्सूनच्या मध्यवर्ती क्षेत्रातील ३१९६ मंडळांसाठी हा अंदाज देण्यात येईल.’

दरम्यान, बंगालच्या उपसागरावर मोसमी वाऱ्यांचा वाढता जोर आणि पावसाची शक्यता लक्षात घेता, (Monsoon) येत्या चार ते पाच दिवसांत अंदमान-निकोबार बेटांवर मान्सून दाखल होण्याचा अंदाज ‘आयएमडी’ने वर्तवला आहे.

हेही वाचा

चाकूहल्ल्यातील जखमी तरुणाचा मृत्यू

महिला की पुरुष? कोणाचे हृदय असते जास्त स्ट्राँग? तज्ज्ञ म्हणतात

बोरगावात कडकडीत बंद