आंदोलनाची वेळ चुकतेय!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी

‌ देशात आणि राज्यात राजकीय स्थैर्य आहे, पण आर्थिक स्थिरता दोलायमान आहे.(protest) संपूर्ण देश टंचाईग्रस्त बंद आहे. अशावेळी सकल मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाची घोषणा केली आहे. आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे मात्र, ते चुकीच्या वेळेला केले जाऊ नये. आणि म्हणूनच त्यांच्या आंदोलनाची वेळ चुकते आहे की काय? असा प्रश्न उपस्थित होताना दिसतो आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाचा विश्वासघात केला आहे, घोर फसवणूक केली आहे, म्ह णूनच मराठा समाजाला त्याचे हक्क मिळवून देण्यासाठी मी पुन्हा एकदा आंदोलनात उतरणार आहे आणि हे आंदोलन पहिल्या आंदोलनापेक्षा कितीतरी पटीने तीव्र असणार आहे असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी या गावी बोलताना दिला आहे. सातारा, कोल्हापूर गॅझेटियर लागू करण्यात यावे. कुणबी म्हणून सरसकट मराठ्यांना प्रमाणपत्र द्यायला सुरुवात करावी. देवेंद्र फडणवीस यांनी सकल मराठा समाजाला खुश करण्याची संधी सोडू नये असे आवाहन करताना त्यांनी फार मोठे आंदोलन उभे केले जाईल असा इशारा दिला आहे.

सध्या मध्यपूर्व तसेच पश्चिम आशियाई देशांमध्ये अस्थिर वातावरण आहे.(protest) शस्त्र संधी कोणत्याही क्षणी मागे घेऊन डोनाल्ड ट्रम्प हे युद्धाचा भडका उडवू शकतात. चाळीस दिवस झालेल्या इजराइल अमेरिका विरुद्ध इराण यांच्यातील युद्धामुळे ऊर्जा संकट गंभीर बनलेलै आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना काटकसर करण्याचे आवाहन केले आहे. देशात इंधन टंचाई निर्माण झाली आहे. डिझेल आणि पेट्रोलचे दर वाढले आहेत. एकूणच संपूर्ण देश एका प्रतिकूल वातावरणाशी सामना करतो आहे. अशावेळी सर्वांनी एक जबाबदार नागरिक म्हणून पंतप्रधानांच्या पाठीशी राहिले पाहिजे. काल परवा पर्यंत राज्यात राजकीय स्थिरता होती किंवा ती आजही आहे पण सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या शहर आणि काटशहाच्या राजकारणामुळे महाराष्ट्रातील राजकीय स्थिरता अडचणीत येऊ शकते. महायुतीची सत्ता अबाधित राहूनही राजकीय भूकंप होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशावेळी प्रशासनावर ताण पडेल अशी आंदोलने होऊ नयेत.


मनोज जरांगे पाटील हे गेल्या काही महिन्यापासून मीडियापासून दूर होते. (protest)देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील आंदोलनाच्या वेळी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे, कृतिशील भूमिका घेतलेली नसेल, तर ते करण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी इतका वेळ का घेतला? त्यांच्या हातामध्ये कुणीतरी लिहून दिलेले स्क्रिप्ट आहे की काय? अशी शंका मनात येऊ शकते. देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा सकल मराठा समाजाला मुंबई येथे जे लिखित आश्वासन दिले होते त्याचे पालन करायला हवे होते. मराठा समाजाला कुणबी म्हणून प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया का बंद पडली आहे? किंवा आत्तापर्यंत किती मराठ्यांना कुणबी म्हणून प्रमाणपत्र दिले आहे आणि त्याचा फायदा किती झाला आहे याचा लेखाजोखा फडणवीस यांनी मराठा समाजासमोर मांडायला हवा. मनोज जरांगे पाटील हे आंदोलनाचा टेम्पो वाढवत जातात आणि नंतर अचानक उपोषण मागे घेतात. सरकार आमच्या आंदोलना पुढे झुकले आहे. मागण्या मान्य केल्या आहेत. असे वातावरण तयार करून ते उपोषण सोडतात. असे यापूर्वी काही वेळा घडलेले आहे.दिनांक 30 मे पासून ते पुन्हा आमरण उपोषण सुरू करणार आहेत. या उपोषणाच्या माध्यमातून यापूर्वी घडले नव्हते इतके मोठे उग्र आंदोलन यावेळी उभा करू असे ते म्हणतात.

त्यांच्या आंदोलनाला विरोध असण्याचे कारण नाही. संविधानाने दिलेला तो अधिकार आहे.(protest) या अधिकाराचा संकोच होता कामा नये. आणि त्याचवेळी आंदोलनासाठी निवडलेली वेळ योग्य आहे काय? याचा त्यांनी गांभीर्याने विचार केला पाहिजे. देश टंचाईच्या झळा सोसतो आहे. ऊर्जा संकटाला सामोरे जातो आहे, महागाईची होरपळ वाढलेली आहे. आणि नजीकच्या काही दिवसात पावसाला सुरुवात होणार आहे. अशा प्रतिकूल वातावरणात उपोषण, आंदोलन करणे म्हणजे प्रशासनाला वेठीस धरण्यातला प्रकार म्हणावा लागेल. आधी देश आणि नंतर समाज अशी भूमिका घेतली गेली पाहिजे. आणि म्हणूनच मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनासाठी निवडलेली वेळ चुकीची आहे. देशाशी आमचे काही देणे घेणे नाही अशा पद्धतीची आहे. देशासमोरील आव्हानात्मक स्थिती बदलल्यानंतर किंवा निवळल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन करावे. त्याला लोकांचे समर्थन मिळेल आणि सहानुभूतीही मिळेल.

हेही वाचा

ऑनलाईन औषध विक्रीविरोधात २० मे रोजी औषध दुकाने बंद..?

होर्मुझच्या नाकाबंदीमुळे खरीप हंगामावर सावट

मिरजेत एकाच रस्त्यासाठी तीनवेळा निधी..!