अमरावती जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर (circulating) व्हायरल होत असलेल्या अश्लील व्हिडीओंच्या प्रकरणाने आता अत्यंत गंभीर वळण घेतले आहे. सुमारे ३५० हून अधिक व्हिडीओ आणि मोठ्या प्रमाणावर आक्षेपार्ह फोटो समोर आल्याने केवळ अमरावतीच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात अल्पवयीन मुलींचा समावेश असल्याची शक्यता व्यक्त केली जात असून, त्यांच्या गोपनीयतेचा भंग झाल्याने समाजमन हादरले आहे.

प्राथमिक तपासात काही संशयितांनी तरुणी आणि अल्पवयीन मुलींना पैशांचे आमिष दाखवून तसेच काही वेळा दबाव टाकून अश्लील कृत्ये करण्यास भाग पाडल्याचे समोर आले आहे. या कृत्यांचे व्हिडीओ तयार करून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले आणि त्याच माध्यमातून पीडितांना ब्लॅकमेल करण्याचा प्रकार सुरू असल्याची माहिती मिळत आहे. या रॅकेटमध्ये अनेक मुली अडकल्या असण्याची शक्यता व्यक्त होत असून, हा प्रकार संघटित गुन्हेगारीचा भाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, या प्रकरणावरून राजकीय वर्तुळातही आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. काही नेत्यांनी प्रशासनावर निष्क्रियतेचा आरोप करत पोलिसांनी स्वतःहून गुन्हा दाखल करून तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता तक्रारीची वाट न पाहता आरोपींना अटक करावी, अशी भूमिका मांडली जात आहे.
अमरावती ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तपासाला सुरुवात केली आहे. सायबर सेलच्या मदतीने व्हायरल झालेल्या व्हिडीओंचा माग काढण्याचे आणि ते सोशल मीडियावरून हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. अद्याप कोणतीही अधिकृत तक्रार नोंदवली नसली, तरी पोलिसांकडून पुरावे गोळा करण्याचे काम सुरू असून, पीडितांची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. गरज पडल्यास महिला पोलीस अधिकाऱ्यांमार्फत जबाब नोंदवले जातील, असेही प्रशासनाने सांगितले आहे.
दरम्यान, या घटनेविरोधात विविध संघटना आणि नागरिकांनी संताप व्यक्त करत पोलिस अधीक्षक कार्यालयावर धडक देत आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. आरोपी फरार झाल्याची माहिती समोर आल्याने त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विविध ठिकाणी पथके रवाना केली आहेत. परिसरात तणावपूर्ण शांतता असून, नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले असून, अफवांवर विश्वास न ठेवण्यास सांगितले आहे. तांत्रिक तपासाच्या आधारे सत्य लवकरच समोर येईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.
हे ही वाचा ;
मोबाईलच्या किमतीत मोठी वाढ; जाणून घ्या कोणत्या कंपनीचे फोन किती महाग झाले?
लाडक्या बहिणींची अर्जप्रक्रिया पुन्हा सुरु होणार? आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं
दहावी, बारावीच्या निकालाबाबत महत्त्वाची अपडेट, या दिवशी लागण्याची शक्यता