ऑनलाईन गेमिंगचा नाद बेतला जीवावर! इचलकरंजीतील 24 वर्षीय तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; कर्जबाजारी झाल्याचा चिठ्ठीत उल्लेख

ऑनलाईन गेमिंगच्या व्यसनामुळे एका तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना हातकणंगले तालुक्यातील कोरोची येथे उघडकीस आली आहे. आदित्य मिलिंद कोळी (वय २४) असे या तरुणाचे नाव असून, (addiction) आर्थिक नुकसान आणि वाढलेल्या मानसिक तणावातून त्याने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. घटनास्थळी पोलिसांना त्याची सुसाईड नोटही सापडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळच्या सुमारास आदित्यने घराच्या वरच्या मजल्यावरील खोलीत छताला असलेल्या लोखंडी ॲंगलला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला. काही वेळाने कुटुंबीयांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर त्याला खाली उतरविण्यात आले; मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

घटनास्थळी सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये आदित्यने ऑनलाईन गेमिंगच्या आहारी गेल्याचे स्पष्ट केले आहे. सुरुवातीला छोट्या रकमांपासून सुरू झालेला हा खेळ पुढे मोठ्या आर्थिक नुकसानीत परिवर्तित झाला. या नुकसानीतून बाहेर पडण्यासाठी त्याने वारंवार पैसे गुंतवले, मात्र त्यातून कर्जाचा डोंगर वाढत गेला. या आर्थिक तणावामुळे तो मानसिकदृष्ट्या खचत गेला आणि शेवटी त्याने टोकाचे पाऊल उचलल्याचे नमूद केले आहे.

दरम्यान, आदित्यच्या कुटुंबावर यापूर्वीच संकट कोसळले होते. वर्षभरापूर्वी त्याच्या वडिलांचे निधन झाले होते, त्यामुळे घराची जबाबदारी त्याच्यावर आली होती. अशा परिस्थितीत तो ऑनलाईन गेमिंगच्या जाळ्यात अडकला आणि त्यातून बाहेर पडू शकला नाही. कर्ज फेडण्यासाठी त्याने स्वतःचा मोबाईलही विकल्याची माहिती समोर आली आहे.

या प्रकरणी शहापूर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. ही घटना ऑनलाईन गेमिंगच्या वाढत्या व्यसनाकडे आणि त्यातून उद्भवणाऱ्या आर्थिक व मानसिक परिणामांकडे लक्ष वेधणारी ठरत आहे.

हेही वाचा

आता मंत्र्यांसोबत फक्त एकाच व्यक्तीला प्रवेश; मंत्रालयातील गर्दी टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय

हादरवणारी घटना; आंब्याचे आमिष दाखवून अडीच वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार

कॅन्सरची सुरूवातीची लक्षणे कोणती?