देशभरात E20 पेट्रोलबाबत सुरू असलेल्या चर्चेदरम्यान केंद्र सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. नागरिकांकडून शुद्ध पेट्रोल (E0) आणि इथेनॉल मिश्रित पेट्रोल असे दोन्ही पर्याय उपलब्ध करून देण्याची मागणी होत असली, तरी सरकारने ती फेटाळून लावत E20 पेट्रोल हेच देशातील मानक पेट्रोल राहणार असल्याचे जाहीर केले आहे.

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने स्पष्ट केले की, देशभरात E0, E10 आणि E20 असे तीन प्रकारचे पेट्रोल एकाच वेळी उपलब्ध करून देणे तांत्रिक आणि आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य नाही. प्रत्येक प्रकारच्या पेट्रोलसाठी स्वतंत्र साठवणूक टाक्या, पाइपलाइन आणि वाहतूक व्यवस्था उभारावी लागेल, (E20 petrol) ज्यामुळे इंधन वितरणाचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढेल.सरकारच्या माहितीनुसार, भारतात एक लाखाहून अधिक पेट्रोल पंप, रिफायनरीज, डेपो, पाइपलाइन आणि साठवणूक केंद्रांचे विस्तृत नेटवर्क आहे. या संपूर्ण यंत्रणेत तीन प्रकारच्या पेट्रोलचा पुरवठा करणे अत्यंत गुंतागुंतीचे आणि खर्चिक ठरेल. त्यामुळे देशात E20 पेट्रोलच मुख्य इंधन म्हणून कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
काही वाहनचालकांनी E20 पेट्रोलमुळे जुन्या वाहनांमध्ये तांत्रिक समस्या निर्माण होत असल्याची चिंता व्यक्त केली होती. यावर सरकारने सांगितले की, E20 लागू करण्यापूर्वी वाहन उत्पादक, सुटे भाग निर्माते, चाचणी संस्था आणि तज्ज्ञांशी विस्तृत चर्चा करण्यात आली होती. इंजिनची कार्यक्षमता, इंधन प्रणाली, प्रदूषण आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने विविध चाचण्या करण्यात आल्या असून त्यानंतरच हा निर्णय घेण्यात आला.सरकारने वाहन उत्पादकांकडील आकडेवारीचाही हवाला दिला आहे. (E20 petrol) त्यानुसार, मोठ्या प्रमाणावर जुन्या वाहनांमध्ये E20 पेट्रोलचा वापर होऊनही इंधनामुळे गंज, इंजिनचे नुकसान किंवा सुट्या भागांवर परिणाम झाल्याच्या ठोस तक्रारी समोर आल्या नसल्याचा दावा करण्यात आला आहे.
सरकारने हेही मान्य केले आहे की E20 पेट्रोलमुळे वाहनांचे मायलेज सुमारे 3 ते 5 टक्क्यांनी कमी होऊ शकते. मात्र, त्याबदल्यात उच्च ऑक्टेन रेटिंगचे इंधन मिळते, ज्यामुळे इंजिनची कार्यक्षमता सुधारण्यास मदत होते. (E20 petrol) तसेच इथेनॉल मिश्रणामुळे कच्च्या तेलावरील आयात अवलंबित्व कमी होते, प्रदूषणात घट होते आणि देशातील इथेनॉल उद्योग तसेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांना लाभ मिळतो, असे सरकारचे म्हणणे आहे.सरकारच्या आकडेवारीनुसार, नोव्हेंबर 2025 ते जून 2026 या कालावधीत देशात पेट्रोलमध्ये सरासरी 20 टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट गाठण्यात आले आहे. त्यामुळे भविष्यातही E20 पेट्रोललाच प्राधान्य दिले जाणार असून, स्वतंत्रपणे शुद्ध पेट्रोल उपलब्ध करून देण्याचा कोणताही प्रस्ताव सध्या विचाराधीन नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.
हेही वाचा :
बच्चू कडू आक्रमक मंत्र्याविरुद्ध हक्कभंग प्रस्ताव केला सादर?