पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळात पुन्हा एकदा मोठा फेरबदल होण्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात वेग आला आहे. सप्टेंबरच्या सुरुवातीला मंत्रिमंडळाचा विस्तार आणि फेरबदल होण्याची शक्यता असल्याची चर्चा सुरू असून, या संभाव्य बदलांमुळे बिहारमधील अनेक नेत्यांचे राजकीय गणितही बदलण्याची शक्यता आहे. कोणत्या मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळणार आणि कोणत्या नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

नवभारतने दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्रिमंडळात सप्टेंबर महिन्यात मोठा फेरबदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. संविधानानुसार केंद्रीय मंत्रिमंडळात पंतप्रधानांसह जास्तीत जास्त 81 सदस्य असू शकतात. (political) सध्या काही मंत्रीपदे रिक्त असल्याने या विस्तारामध्ये नव्या नेत्यांना संधी देण्याची शक्यता आहे. आगामी काळातील राजकीय समीकरणे, मंत्र्यांची कामगिरी आणि सरकारच्या प्राधान्यक्रमांचा विचार करून फेरबदल केला जाऊ शकतो, अशी चर्चा आहे.
मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घेतला जाण्याची शक्यता आहे. अपेक्षेप्रमाणे कामगिरी न करणाऱ्या मंत्र्यांना पदावरून हटवले जाऊ शकते, तर वयामुळे सक्रिय राजकारणात अडथळे निर्माण होत असलेल्या काही नेत्यांबाबतही नेतृत्वाकडून निर्णय घेतला जाऊ शकतो.(political) त्याचबरोबर युवा मतदारांचा वाढता प्रभाव लक्षात घेता, 50 वर्षांपेक्षा कमी वयाच्या नेत्यांना मंत्रिमंडळात अधिक प्रतिनिधित्व देण्याचा विचार होऊ शकतो. महिलांनाही नव्या फेरबदलात अधिक संधी मिळण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
या संभाव्य फेरबदलाचा सर्वाधिक परिणाम बिहारमधील केंद्रीय मंत्र्यांवर होऊ शकतो, अशी चर्चा आहे. सध्या बिहारमधून मोदी सरकारमध्ये आठ मंत्री आहेत. यामध्ये चार कॅबिनेट मंत्री आणि चार राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. त्यामुळे बिहार विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील बदललेली राजकीय परिस्थिती आणि आगामी राजकीय समीकरणे लक्षात घेता केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रतिनिधित्वाबाबत भाजपकडून काही महत्त्वाचे निर्णय घेतले जाऊ शकतात.
बिहारमधील काही दिग्गज नेत्यांच्या नावांची या संभाव्य फेरबदलाच्या पार्श्वभूमीवर चर्चा सुरू झाली आहे. केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांच्या नावाची विशेष चर्चा होत असून त्यांच्या वयाचा मुद्दाही राजकीय चर्चेत आहे. (political) त्यांच्या जागी राज्यसभा खासदार विवेक ठाकूर यांना मंत्रिमंडळात संधी मिळू शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.याचबरोबर केंद्र सरकारमध्ये राज्यमंत्री असलेल्या सतीश चंद्र दुबे यांच्या जागी राज्यसभा खासदार मनन मिश्रा यांना मंत्रिपदाची संधी मिळू शकते, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दुसरीकडे, जलशक्ती मंत्रालयाचे राज्यमंत्री राज भूषण चौधरी यांच्या कामगिरीबाबतही चर्चा सुरू असून, संभाव्य फेरबदलात त्यांच्या नावाचाही विचार होऊ शकतो, असे बोलले जात आहे.
मात्र या सर्व चर्चा सध्या राजकीय अंदाजांपुरत्याच मर्यादित आहेत. मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार, कोणत्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये बदल होणार, कोणाला मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवला जाणार आणि कोणत्या नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार, याचा अंतिम निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे वरिष्ठ नेतृत्व घेणार आहे.त्यामुळे सप्टेंबरमध्ये खरोखरच केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार का आणि झाला तर बिहारमधील कोणत्या नेत्यांचे राजकीय भवितव्य बदलणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा :
CNG दर वाढल्याने ऑटोचालकांचा ९ सप्टेंबरला संपाचा इशारा, केली मोठी मागणी?
राजकारणात खळबळ बडा नेता देणार राजीनामा तारीखही केली जाहीर?
एअरपोर्टवर अमित शाह-एकनाथ शिंदेंची गुप्त भेट १० मिनिटांच्या चर्चेने राजकीय चर्चांना उधाण?