नसरापूर अत्याचार प्रकरणात न्यायालयाचा मोठा निर्णय नराधम भीमराव कांबळे दोषी घोषित?

पुणे जिल्ह्याच्या तसेच महाराष्ट्राच्या न्यायालयीन इतिहासात महत्त्वाची नोंद होईल अशा नसरापूर येथील साडेतीन वर्षांच्या बालिकेवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणाचा निकाल गुरुवारी जाहीर झाला. पुणे जिल्हा सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंके यांनी मुख्य आरोपी भीमराव प्रभाकर कांबळे (वय ६५) याला दोषी ठरवले. घटना घडल्यापासून दोषसिद्धीपर्यंतचा संपूर्ण प्रवास अवघ्या ५५ दिवसांत पूर्ण झाल्याने हा खटला राज्यातील सर्वात वेगवान न्यायप्रक्रियांपैकी एक ठरला आहे.

न्यायालयाने आरोपीविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या सर्व गंभीर आरोपांमध्ये गुन्हे सिद्ध झाल्याचे नमूद केले. संबंधित कलमांमध्ये मृत्युदंड, आजन्म कारावास तसेच दीर्घ मुदतीच्या कारावासाची तरतूद असल्याने शिक्षेबाबतची सुनावणीही विशेष महत्त्वाची ठरली. दोषी ठरवल्यानंतर न्यायालयाने आरोपीला त्याच्या शिक्षेबाबत विचारणा केली. (Nasrapur) त्यावेळी आरोपीने पुन्हा एकदा ही घटना अपघात असल्याचा दावा करण्याचा प्रयत्न केला. त्याने मुलीला खाऊ आणण्यासाठी नेले असताना पाय घसरून ती जखमी झाल्याचे सांगितले. मात्र न्यायालयाने हा युक्तिवाद फेटाळून लावत त्याच्यावरील गुन्हे सिद्ध झाल्याचे स्पष्ट केले.

शिक्षेबाबत युक्तिवाद करताना विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी हा गुन्हा अत्यंत क्रूर आणि दुर्मिळ स्वरूपाचा असल्याचे नमूद केले. वैद्यकीय पुराव्यांनुसार पीडित बालिकेवर दीर्घकाळ अमानुष अत्याचार करण्यात आल्याचे आणि तिच्या शरीरावर अनेक गंभीर जखमा आढळल्याचे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. आरोपीला आपल्या कृत्याचा कोणताही पश्चाताप नसल्याचेही त्यांनी सांगितले. समाजात महिलांच्या आणि बालकांच्या सुरक्षेचा संदेश देण्यासाठी तसेच न्यायव्यवस्थेवरील विश्वास दृढ ठेवण्यासाठी आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी त्यांनी केली.या सुनावणीदरम्यान पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल न्यायालयात उपस्थित होते. या प्रकरणातील तपासाची राज्यभर चर्चा झाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार (Nasrapur) यांच्या नेतृत्वाखालील विशेष तपास पथकाने अत्यंत वेगाने आणि काटेकोरपणे तपास पूर्ण केला. सीसीटीव्ही फुटेज, डीएनए अहवाल, वैद्यकीय पुरावे आणि ५५ हून अधिक साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे अवघ्या १५ दिवसांत सुमारे १,२०० पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले.

१ मे २०२६ रोजी महाराष्ट्र दिनाच्या संध्याकाळी नसरापूर परिसरातून साडेतीन वर्षांची बालिका बेपत्ता झाली होती. त्यानंतर तिचा मृतदेह आढळून आल्याने राज्यभर संतापाची लाट उसळली होती. दुसऱ्याच दिवशी पोलिसांनी तांत्रिक पुरावे आणि प्राथमिक तपासाच्या आधारे भीमराव कांबळे याला अटक केली. (Nasrapur) त्यानंतर वैज्ञानिक पुरावे गोळा करत तपास जलद गतीने पूर्ण करण्यात आला. १६ मे रोजी आरोपपत्र दाखल झाले आणि २१ मेपासून खटल्याची सुनावणी बंद दाराआड दैनंदिन पद्धतीने सुरू झाली.साक्षीदारांची साक्ष, पुरावे आणि दोन्ही बाजूंचे युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर २५ जून रोजी न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले. अवघ्या ५५ दिवसांत दोषसिद्धी झाल्याने या खटल्याची देशभर चर्चा सुरू झाली आहे. न्यायालयीन प्रक्रियेतील वेग, पोलिसांचा तपास आणि सरकारी पक्षाच्या प्रभावी मांडणीमुळे हा खटला महाराष्ट्रातील न्यायव्यवस्थेच्या इतिहासात विशेष नोंद म्हणून पाहिला जात आहे.

हेही वाचा :

इंधन दरवाढ की दिलासा? पाहा आजचे पेट्रोल-डिझेलचे ताजे भाव?

1500 की 3000 लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर नेमके किती रुपये जमा?

फोनपे वापरण्यासाठी मोठा झटका नवीन नियम लागू?