यवतमाळ जिल्ह्यातील चिखलवर्धा गावात मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. खेळता खेळता घराशेजारी उभ्या असलेल्या बंद कारमध्ये गेलेल्या चार वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. अंश केळझरकर असे या मुलाचे नाव आहे. कारचा दरवाजा लॉक झाल्याने तो बराच वेळ वाहनाच्या आत अडकून राहिला. उन्हामुळे कारमधील तापमान वाढल्याने त्याचा श्वास गुदमरल्याची माहिती समोर आली आहे.

अंश घराबाहेर खेळत असताना शेजारी उभ्या असलेल्या कारमध्ये गेला. त्यानंतर कारचा दरवाजा लॉक झाल्याने त्याला बाहेर पडता आले नाही. बराच वेळ तो कारमध्येच अडकून राहिल्याने त्याची प्रकृती गंभीर झाली. कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्याला तातडीने घाटंजी येथील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्यावेळी वेळेवर ऑक्सिजन आणि रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
यानंतर सामाजिक कार्यकर्त्यांच्या रुग्णवाहिकेच्या मदतीने अंशला पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे हलवण्यात आले. मात्र, यवतमाळ येथे उपचार सुरू असतानाच चिमुकल्या अंशची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे केळझरकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अंशचे वडील रोजमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. घरातील एकुलत्या एका लहान मुलाचा अशा प्रकारे अकाली मृत्यू झाल्याने आई-वडिलांसह कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.
या घटनेनंतर ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेतील सुविधांचा प्रश्नही पुन्हा ऐरणीवर आला आहे. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका, ऑक्सिजन आणि तातडीच्या उपचारांची उपलब्धता किती महत्त्वाची आहे, हे या घटनेतून समोर आले आहे. दुसरीकडे, लहान मुलांच्या सुरक्षिततेबाबत पालकांनीही विशेष काळजी घेण्याची गरज आहे. खेळताना मुले वाहनांमध्ये, बंद खोल्यांमध्ये किंवा इतर धोकादायक ठिकाणी जात नाहीत ना, याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. विशेषतः उष्ण हवामानात बंद कारमध्ये मुलांना क्षणभरही एकटे सोडणे धोकादायक ठरू शकते. एका छोट्याशा निष्काळजीपणाचे परिणाम किती गंभीर असू शकतात, हे अंशच्या दुर्दैवी घटनेने अधोरेखित केले आहे.
हेही वाचा :
UPI पेमेंटला व्यापाऱ्यांचा विरोध दुकानांवरील QR कोड हटवण्यास सुरुवात?
‘हुपरी’ प्रकल्पातून आत्मनिर्भरतेचे पाऊल परकीय चलनात बचत?
भारत अफगाणिस्तान मालिकेदरम्यान 19 लोकांना अटक, पोलिसांनी असं का केलं?