एकीकडे पाणी टंचाई सुरू असल्याने काटकसरीचे अनेक उपाय योजले जात आहेत. पाणीपुरवठ्यात दहा टक्के कपात करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. अशी परिस्थिती असताना पाण्याचा अपव्यय केल्याप्रकरणी इचलकरंजी महापालिकेच्या एका कर्मचाऱ्यास निलंबित करण्यात आले आहे. मजूर भूपाल दत्तू कुरणे यांना विभागीय चौकशीच्या अधीन राहून निलंबित करण्यात आले असल्याचे बुधवारी सांगण्यात आले.

इचलकरंजी शहरात अल निनोच्या संभाव्य प्रभावामुळे उद्भवू शकणाऱ्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाकडून पाणीबचतीसाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. (Ichalkaranji) शहरातील नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन करण्यात येत असतानाच महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्याकडूनच मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत महापालिका प्रशासनाकडून संबंधित कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
राज्य शासनाने अल निनोच्या संभाव्य प्रभावामुळे निर्माण होणारी पाणीटंचाईची परिस्थिती लक्षात घेऊन १० टक्के पाणीकपात लागू करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. त्याचबरोबर इचलकरंजी शहरातील दैनंदिन पाण्याची गरज आणि प्रत्यक्ष उपलब्ध पाणीसाठा यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत असल्याने महापालिका प्रशासनाकडून नागरिकांना पाण्याचा अपव्यय टाळण्याचे आणि पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात येत आहे.(Ichalkaranji) अशा परिस्थितीत १२ ऑक्टोबर रोजी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील मजूर भूपाल दत्तू कुरणे यांनी कर्तव्य सुरू असताना पाण्याच्या टाकीवर पाणी भरल्यानंतर व्हॉल्व्ह बंद करण्याची जबाबदारी पार पाडली नसल्याचे निदर्शनास आले. परिणामी टाकी ओसंडून वाहू लागल्याने पाण्याची अतोनात नासाडी झाली. संबंधित कर्मचाऱ्याकडून कर्तव्यात कसूर झाल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले होते.
शहरातील नागरिकांना पाणीबचतीचे आवाहन करणाऱ्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनीच आपल्या जबाबदाऱ्या काटेकोरपणे पार पाडणे आवश्यक आहे. विशेषतः पाणीपुरवठ्या सारख्या अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांकडून अधिक दक्षता आणि जबाबदारीची अपेक्षा असते. (Ichalkaranji) मात्र, संबंधित कर्मचाऱ्याच्या निष्काळजी पणामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी झाल्याने प्रशासनाने या प्रकाराकडे गांभीर्याने पाहिले असुन या अनुषंगाने पाणीपुरवठा विभागातील मजूर भूपाल दत्तू कुरणे यांना विभागीय चौकशीच्या अधीन राहून निलंबित करण्यात आले आहे. शहरातील उपलब्ध पाणी साठ्याचा योग्य वापर होणे आणि नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपापली कर्तव्ये जबाबदारीने पार पाडणे आवश्यक असल्याचा संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे.
हेही वाचा :
मोदी कॅबिनेटचा मोठा निर्णय दिवाळीच्या आधीच कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर पण किती दिवसांचा मिळणार
भाजपमध्ये आणखी एक राष्ट्रीय पक्ष विलीन होणार पडद्यामागे घडामोडींना वेग