शक्तिपीठ महामार्गासाठी कोल्हापुरात जमीन मोजणीचा आदेश आला, राजू शेट्टी, बंटी पाटलांची भूमिका काय?

शक्तिपीठ महामार्गासाठी येत्या ९ सप्टेंबरपासून जमीन मोजणीचा कार्यक्रम प्रशासनाने जाहीर केल्याने कोल्हापूर जिल्ह्यात प्रशासन आणि शेतकरी यांच्यात संघर्षाची ठिणगी पडली आहे. या जमीन मोजणीला विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली असून, ९ सप्टेंबरला गावबंदी आणि शिवारबंदी करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

माजी खासदार राजू शेट्टी यांनी याबाबत पत्रकार परिषद घेत शेतकऱ्यांच्या आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली. शक्तिपीठ महामार्गाविरोधातील लढा आता अधिक तीव्र करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. “नांगराच्या फाळाला धार लावून तयार ठेवा,” असे आवाहन शेट्टी यांनी शेतकऱ्यांना केले.शेट्टी म्हणाले, “अधिकारी जबरदस्तीने जमीन मोजणी करण्यासाठी शिवारात आले, तर त्यांना शेतात पाऊल ठेवू देऊ नका. शेतकऱ्यांनी आपल्या शिवाराचे रक्षण करण्यासाठी सज्ज राहावे.” (farmers) त्यांच्या या वक्तव्यामुळे जमीन मोजणीच्या मुद्द्यावर संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

महिला शेतकरीही आंदोलनात उतरणार जमीन मोजणीला विरोध करण्यासाठी महिला शेतकऱ्यांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे. ९ सप्टेंबरला मोजणीच्या दिवशी प्रत्येक गावातील महिला शेतकरी शिवारात ठाण मांडून बसणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. तहसीलदार, प्रांत अधिकारी आणि पोलिसांचा ताफा आला तरी त्यांना शिवारात प्रवेश करू न देण्याचा निर्धार महिलांनी व्यक्त केला. “शिवारात रक्ताचे पाट वाहतील; मात्र शक्तिपीठ महामार्गासाठी एक इंचही जमीन देणार नाही,” अशी संतप्त भूमिका बैठकीत व्यक्त करण्यात आली. (farmers) शक्तिपीठ महामार्गाच्या जमीन मोजणीविरोधातील आंदोलनाची रूपरेषाही बैठकीत जाहीर करण्यात आली. ३ सप्टेंबरला जिल्ह्यातील प्रत्येक गावात महामार्गाच्या शासकीय आदेशाची जाहीर होळी करून निषेध नोंदविण्यात येणार आहे. ७ सप्टेंबरला जिल्ह्यातील शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देणार असून, जमीन मोजणीच्या आदेशाची होळी करून प्रशासनाचा निषेध करण्यात येणार आहे.

९ सप्टेंबरला जमीन मोजणीच्या दिवशी गावबंदी आणि शिवारबंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रशासन आणि पोलिसांना गावातच रोखण्याचा निर्धार शेतकरी संघटनांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, प्रशासनाकडून जमीन मोजणीची तयारी सुरू असताना शेतकऱ्यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे कोल्हापूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. (farmers) त्यामुळे ९ सप्टेंबरला प्रशासन मोजणी कशी पार पाडणार आणि शेतकरी त्याला कसा विरोध करणार, याकडे लक्ष लागले आहे. या बैठकीस कॉम्रेड गिरीष फोंडे, इरिगेशन फेडरेशनचे विक्रांत पाटील, कॉम्रेड सम्राट मोरे, कॉम्रेड शिवाजी मगदूम, शिवाजी कांबळे, प्रकाश पाटील, कृष्णात डी. पाटील, नामदेव यादव, भगवान पाटील, कृष्णात साबळे, अमित नाळे यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा :

इचलकरंजीत राजकीय भूकंप प्रकाश आवाडेंची लोकसभा लढण्याची तयारी खासदार माने गटाची धाकधूक वाढली?

महाराष्ट्रात पाऊस कोसळणार की नाही? जाणून घ्या आजचा हवामान अंदाज?

८ ते १० तास बैठे काम करताय ? हार्टला का आहे धोका डॉक्टरांनी सांगितले?