कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी
नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी नवी दिल्लीत बरेच काही घडताना दिसते आहे. शरद पवार, सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतलेली भेट, सर्वोच्च न्यायालयाने जंतर मंतर प्रकरणात तातडीने सुनावणी घेण्यास दिलेला नकार, त्यावर केलेली टिपणी, आंदोलनात घुसलेले काही असामाजिक घटक, मूळ मुद्दा बाजूला नेण्याचा होत असलेला प्रयत्न, आंदोलनामाच्या हेतूविषयी सुरू झालेली चर्चा आणि या देशाचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी शिक्षण व्यवस्थेवर केलेले भाष्य अशा अनेक घटना जंतर-मंतर भोवती फेर धरून नाचताना दिसू लागलेल्या आहेत.

राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आपली भूमिका मांडण्यासाठी बुधवारी पत्रकार परिषद घेतली.आणि त्यांनी आजची शिक्षण व्यवस्था या मूळ मुद्द्यालाच हात घातला. आजची शिक्षण व्यवस्था ही सर्वसामान्य माणसांसाठी राहिलेली नाही. ज्यांच्याकडे पैसा आहे आणि ज्यांच्या सत्तास्थानापर्यंत ओळखी आहेत अशांनाच नोकरी मिळते. गेल्या दहा वर्षात 152 पेपर फुटले. (meeting) त्याचा साडेसात कोटी विद्यार्थ्यांना फटका बसला. विद्यार्थी वर्ग नैराश्यात गेला. सरकार बदलले पाहिजे ही सार्वत्रिक भूमिका पाहायला मिळते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांची माफी मागावी, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला पाहिजे, ज्यांनी लाठी हल्ला केला त्यांची चौकशी झाली पाहिजे. असा एकूण त्यांच्या पत्रकार बैठकीचा सारांश आहे.
इसवी सन 2014 मध्ये नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाले आणि नंतर त्यांच्याच काळात शिक्षण पद्धती बदलली असे म्हणता येणार नाही, कारण ती स्वातंत्र्योत्तर काळापासून चालत आलेली आहे. त्यामुळे ही शिक्षण पद्धती बदलण्याची खरी जबाबदारी काँग्रेसवर होती. ती त्यांनी नीटपणे पाडलेली नाही. पण काँग्रेस शिवाय इतरही काही सरकारे केंद्रात सत्तेवर होती. त्यांनीही शिक्षण पद्धतीकडे ती बदलली पाहिजे या दृष्टीने पाहिले नाही. म्हणजे राष्ट्रीय काँग्रेस, जनता पक्ष, जनता दल, आणि भारतीय जनता पक्ष या सर्वांनी ते केंद्रात सत्तेत असताना या महत्त्वाच्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही.
आजची शिक्षण पद्धती “नाही रे वर्गाला”शिक्षणाची पुरेशी संधी देत नाही, हे खरेच आहे. दरवर्षी केंद्रीय”नीट”परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींची संख्या जवळपास 25 ते 30 लाख यादरम्यान असते. आणि यातील किमान 90% विद्यार्थी आणि विद्यार्थिनी या”आहे रे”वर्गातून आलेले असतात. हा दोष पूर्वांपार चालत आलेल्या शिक्षण पद्धतीमध्ये आहे आणि हा दोष काढून टाकलाच पाहिजे. पण त्यासाठी राजकारण विरहित नीती आखली पाहिजे. हे खरेच आहे की भारतीय जनता पक्षाचे सरकार देशात असताना गेल्या दहा वर्षात नीट आणि तत्सम परीक्षांचे 152 पेपर फुटले. आणि ज्यांनी पेपर फोडले त्यांना कठोर शिक्षा झालेली आहे असे एकही उदाहरण दिसत नाही. हे वास्तव आहे. (meeting) ज्यांच्याकडे पैसा आहे आणि वशिला आहे त्यांनाच नोकऱ्या मिळतात. हे आजचे चित्र नाही तर ते कालही तसेच घडत होते. म्हणजे त्यालाही आज पर्यंतचे केंद्रातले सर्व सत्ताधारी जबाबदार आहेत असे म्हणता येईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या देशातील विद्यार्थ्यांची माफी मागितली पाहिजे, हे म्हणायला ठीक आहे पण आणीबाणी लादली म्हणून इंदिराजी गांधी यांनी देशवासीयांची माफी मागितली पाहिजे या विरोधकांच्या तेव्हाच्या मागणीचे काय झाले? याचाही विचार त्यांनी करावा. पण केवळ पंतप्रधानांच्या माफी नाम्याने मूळचा प्रश्न संपुष्टात येणार आहे का? केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे ही सर्वांचीच मागणी आहे. पण तितके नैतिक पातळीवरचे राजकारण गेल्या अनेक वर्षांपासून गायब झालेले आहे. विद्यार्थ्या वर पोलिसांनी बळाचा वापर केला. अमानुष लाठी मार केला. अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, याची चौकशी व्हावी ही मागणी कदाचित मान्य होईलही, पण त्यातून काय साध्य होणार आहे? आतापर्यंत अशाच प्रकारच्या चौकशा झाल्या पण त्याचे पुढे काय झाले हे देशाला कधीही कळाले नाही.
पण एक चांगले झाले, आणि ते म्हणजे आजच्या शिक्षण पद्धतीविषयी चर्चेला तोंड फोडले. शिक्षण व्यवस्थेमध्ये अमुलाग्र बदलत करावयाचा झाला (meeting) तर त्यामध्ये सर्वच राजकीय पक्षांनी आणि त्यांच्या नेत्यांनी आपले योगदान दिले पाहिजे. आजच्या विरोधी पक्षांनी ही मागणी रेटून नेली पाहिजे. कारण राहुल गांधी यांच्या म्हणण्याप्रमाणे या देशातील विद्यार्थी रस्त्यावर आलेला असेल तर विरोधी पक्षालाही रस्त्यावर उतरावे लागेल. राहुल गांधी यांनी शिक्षण पद्धती बदलली पाहिजे हा विचार मांडला आहे आणि तो त्यांच्यासह सर्वांनीच गांभीर्याने मनावर घेतला पाहिजे.
हेही वाचा :
हेरवाडमध्ये पाण्याच्या टाकीतून हजारो लिटर पाणी गळतीने वाया?