कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्रात मराठी आणि देशात हिंदू , 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण असा विचार मांडून बाळासाहेब ठाकरे यांनी मोठ्या कष्टाने उभी केलेली शिवसेना ही महाराष्ट्राची सर्वात प्रभावी संघटना होती. पण गेल्या 35 वर्षात फुटीचा शाप असलेली शिवसेना फुटत गेली आणि फुटत राहिली. (Shiv Sena) त्याचे एकमेव कारण म्हणजे नेतृत्वाची संघटनेवरची सुटत चाललेली पकड आणि “मातोश्री” वर केडर लेस नेत्यांना मिळत असलेली प्रतिष्ठा होय.

पक्ष संघटन कोणतेही असो, त्या पक्षाचा प्रमुख नेता, त्याच्या पक्ष संघटनेत मरगळ आली किंवा पक्ष संघटन पराभूतांच्या मानसिकतेत गेले तर थेट रस्त्यावर उतरतो. पायाला भिंगरी लावल्यागत फिरत राहतो. कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण करण्यासाठी आटापिटा करतो. उद्धव ठाकरे यांनी हे 14 वर्षांपूर्वी केले होते. इसवी सन 2012 मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाल्यानंतर काही दिवसांनी शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे हे मातोश्री बाहेर पडले होते. “आता रडायचं नाही लढायचं”हा संदेश सामान्य शिवसैनिकापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी राज्यभर दौरा केला होता. कार्यकर्त्यांमध्ये पुनश्च उत्साह पेरला होता. पण हे स्पिरिट नंतर कधीच दिसले नाही. सामान्य शिवसैनिकांचा सुप्त विरोध असूनही त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस यांच्याशी राजकीय घरोबा करून मुख्यमंत्रीपद मिळवले होते. बाळासाहेब ठाकरे यांच्या मूळ विचारांच्या विरोधातील ही त्यांची कृती होती आणि ती शिवसैनिकच काय सर्वसामान्य जनतेलाही आवडलेली नव्हती.
इसवी सन 1991 मध्ये छगन भुजबळ यांनी 19 आमदारांना सोबत घेऊन शिवसेना फोडली होती. ते काँग्रेसमध्ये गेले होते. (Shiv Sena) त्यानंतर नारायण राणे यांनी 16 आमदारांना सोबत घेऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 2006 मध्ये राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली होती. मात्र त्यांनी शिवसेना फोडली असे म्हणता येणार नाही. कारण ते शिवसेनेमधील कोणालाही बरोबर घेऊन बाहेर पडले नव्हते. भुजबळ आणि राणे यांनी शिवसेना फोडली तेव्हा त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना त्यांच्या मतदारसंघातील मतदारांनी नंतरच्या विधानसभा निवडणुकीत पराभूत केलं होतं. ही ताकद बाळासाहेबांची होती. 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी तब्बल 40 आमदारांना सोबत घेऊन शिवसेनेत मोठे बंद केले. पण नंतर झालेल्या 2025 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी जवळपास 57 उमेदवारांना विधानसभेवर निवडून आणले. त्यांच्यासोबत गेलेला एकही आमदार पराभूत झाला नाही. याचाच अर्थ असा आहे की, उद्धव ठाकरे यांच्यात बाळासाहेबांची धग उरलेली किंवा दिसलेली नाही. बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर ज्यांच्यावर जहाल टीका केली त्याच राजकीय पक्षांसोबत उद्धव ठाकरे गेले हे शिवसैनिकांना सुद्धा आवडलेले नव्हते हे जवळपास सिद्ध झालेले आहे.
भाऊसाहेब वाकचौरे, ओम राजे निंबाळकर, संजय दिना पाटील, संजय जाधव, नागेश पाटील आष्टीकर, आणि संजय देशमुख या सहा खासदारांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे. हे ऑपरेशन टायगर गेले वर्षभर चर्चेत होते. हे ऑपरेशन मंगळवारी रात्री हे सहा खासदार खासगी विमानाने नवी दिल्लीत पोहोचल्यानंतर यशस्वी झाले आणि त्याची बुधवारी हे राजकीय वर्तमान महाराष्ट्राला समजले मात्र खळबळ उडाली नाही. कारण हे कधीतरी घडणार होते आणि ते मंगळवारी घडले, हे महाराष्ट्राला अभिप्रेत आणि अपेक्षितच होते. उद्धव ठाकरे यांच्याकडून त्याच्या पक्षातील खासदार, आमदार तत्सम लोकप्रतिनिधींना सन्मानाची वागणूक मिळत नाही. (Shiv Sena) त्यांच्या सुखदुःखात ते सहभागी होत नाहीत. अंबानींच्या प्रत्येक कार्यक्रमाला ते सहकुटुंब उपस्थित असतात मात्र त्यांच्याच पक्षातील आमदार खासदारांच्या कौटुंबिक सोहळ्यांना त्यांची उपस्थिती नसते. नीलम गोऱ्हे यांच्या घरी दुःखद घटना घडली होती तेव्हा त्यांनी सांत्वनाचा एक फोनही केला नाही असे नीलम गोऱ्हे यांनीच पक्ष सोडल्यानंतर सांगितले होते.
त्यांचे आमदार भास्कर जाधव यांनी तर बुधवारी मीडियाशी बोलताना उद्धव ठाकरे यांच्या कार्यशैलीवर अप्रत्यक्षपणे टीका केली. हा घरचाच आहेर म्हणावा लागेल. संजय राऊत यांनी तर शिवसेनेचे राजकीय मार्केटिंग कधी केले नाही मात्र शरद पवार आणि त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांचे ते प्रवक्ते असल्यासारखेच वागत होते. सध्या तर काँग्रेस मजबूत झाली पाहिजे असे सांगताना दिसतात. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे नऊ पैकी सहा खासदार उबाठा गटापासून वेगळे झाले आहेत. चार वर्षात दुसऱ्यांदा शिवसेना फुटते याची कारणे शोधण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी आता अतिशय गांभीर्याने आत्मचिंतन केले पाहिजे.
हेही वाचा :
लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! मे महिन्याचे 1500 रुपये बँक खाते करा चेक?