इन्स्टाग्रामवरच्या ‘त्या’ मेसेजने घेतला जीव…

पुणे येथे वास्तव्यास असलेल्या एका तरुणाला, इन्स्टाग्रामवर(Instagram) एका तरुणीच्या बहिणीला शिवीगाळ केल्याचा राग मनात धरून, तरुणी आणि तिच्या साथीदारांनी अमानुष मारहाण करून व विष पाजून ठार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. साईनाथ गोरक्षनाथ काकडे असे मृत तरुणाचे नाव असून, ही घटना १० मे रोजी सकाळ ते दुपारच्या दरम्यान अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण शिवारात घडली.

मृत साईनाथ काकडे याचा भाऊ महेश गोरक्षनाथ काकडे याने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, साईनाथ आणि रुपाली संजय लोंढे हे एकमेकांना ओळखत होते आणि दोघेही वेगवेगळ्या ठिकाणी पुण्यात राहत होते.

साईनाथने रुपाली लोंढेच्या बहिणीला इन्स्टाग्रामवरून(Instagram) मेसेज करून शिवीगाळ केली होती. याचा राग मनात धरून रुपाली संजय लोंढे, तिचा भाऊ अनिल संजय लोंढे, तसेच दिनेश विठ्ठल आसने , पवन कैलास आसने आणि राहुल अशोक चांदर या पाच जणांनी साईनाथ राहत असलेल्या पुण्यातील घरातून त्याला जबरदस्तीने ओढत बाहेर काढले.

त्यानंतर, आरोपींनी साईनाथला एका गाडीमध्ये टाकून कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण शिवारात आणले. तेथे त्याला अमानुष मारहाण करण्यात आली आणि त्यानंतर त्याला विषारी औषध पाजून त्याची हत्या करण्यात आली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर, साईनाथला गंभीर जखमी अवस्थेत शिर्डी येथील सुपर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

तरुणाचा मृत्यू झाल्याचे समजताच, रुग्णालयात जमलेल्या जमावाने आक्रमक पवित्रा घेतल्याने काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. याप्रकरणी पाचही आरोपींविरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मयत साईनाथ आणि आरोपी यांची पूर्वीपासूनच ओळख असल्याने, या हत्येमागील नेमके कारण काय होते आणि शिवीगाळ करण्यामागील पार्श्वभूमी काय होती, याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भगवान मथुरे अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा :

लाडकी बहीण योजनेनंतर आता महिलांसाठी नवा मास्टर प्लान

पाकड्यांचा इतिहास पाहता शस्त्र संधी स्वल्पविराम ठरणार?

‘या’ मुहूर्तावर मान्सून महाराष्ट्रात; तत्पूर्वी होणार वादळी पाऊस अन् अवकाळीचा मारा…