रात्री दरवळतो फुलांचा सुगंध, रंगांची उधळण अन् निसर्गाचा चमत्कार ग्लोबल फ्लॉवर फेस्टिव्हलला तुडुंब गर्दी

कोल्हापूर रात्रीच्या अंधारात रंगांची उधळण, फुलांचा दरवळणारा सुगंध आणि निसर्गाचे मनमोहक सौंदर्य अनुभवण्याची संधी कोल्हापूरकरांना ‘सकाळ’ प्रस्तुत ग्लोबल फ्लॉवर फेस्टिव्हलच्या माध्यमातून मिळत आहे. पोलिस उद्यानात सुरू असलेल्या या महोत्सवातील ‘नाईट ब्लूम एक्सपिरियन्स’ने नागरिक, भाविक आणि पर्यटकांना आकर्षित केले आहे. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशीही फेस्टिव्हलला मोठी गर्दी झाली असून, सायंकाळनंतर कुटुंबांसह येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली.

महोत्सव सकाळी सात वाजल्यापासून नागरिकांसाठी खुला होत असल्याने शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दुपारच्या सत्रात आयोजित विविध कार्यशाळा आणि प्रात्यक्षिकांमधून नागरिकांना फुलझाडे, बागकाम आणि निसर्गसंवर्धनाविषयी माहिती मिळत आहे. सायंकाळी पाचनंतर उद्यानात नागरिकांची गर्दी वाढली. विविध प्रकारची फुलझाडे, त्यांचे वैशिष्ट्यपूर्ण रंग आणि फुलांपासून साकारलेल्या आकर्षक प्रतिकृती पाहताना पर्यटक रमून गेले.

फुलांच्या माध्यमातून साकारलेले भव्य श्रीयंत्र, कोल्हापुरी साज, फेटा, कुस्तीच्या आखाड्यातील मल्ल, गवा आणि डॉल्फिन यांच्या प्रतिकृती हे महोत्सवातील विशेष आकर्षण ठरले आहे. रात्रीच्या प्रकाशात फुलांचे सौंदर्य अधिक खुलून दिसत असल्याने नागरिकांनी या देखाव्यांचा आनंद घेतला. करवीरनिवासिनी अंबाबाईच्या मंत्रांची सुमधुर धून, वातावरणातील गारवा आणि फुलांनी सजलेले उद्यान यामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले. (Kolhapur) अनेक भाविकांनी नवदुर्गेचे दर्शन घेतले, तर कुटुंबीय आणि मित्रमंडळींसोबत आलेल्या पर्यटकांनी छायाचित्रे आणि सेल्फी घेत या अनुभवाच्या आठवणी जपल्या.

फुलांचे सौंदर्य केवळ दिवसाच्या प्रकाशातच खुलते असे नाही, तर काही फुलांचे रंग आणि सुगंध रात्रीच्या वेळीही वेगळी अनुभूती देतात. याच नैसर्गिक वैशिष्ट्यांचा अनुभव ‘नाईट ब्लूम एक्सपिरियन्स’मधून नागरिकांना घेता येत आहे. दरम्यान, माजी आमदार ऋतुराज पाटील यांनीही सहकुटुंब महोत्सवाला भेट दिली.महोत्सवात सायंकाळी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमांनी वातावरणात उत्साह निर्माण केला. अंबिका ग्रुपच्या कलाकारांनी ग्लोबल फ्लॉवर फेस्टिव्हलच्या थीम साँगवर सादरीकरण करत उपस्थितांना ठेका धरायला लावला. श्रीजा फाउंडेशनच्या कलाकारांनी ‘अंबाबाई गोंधळाला ये’ या गीतावर नृत्य सादर करून आदिमायेच्या विविध रूपांचे दर्शन घडविले. फुलांचे सौंदर्य, संगीत आणि सांस्कृतिक कार्यक्रम यांच्या संगमामुळे महोत्सवाला वेगळी रंगत आली.

‘ब्लूम्स बियॉन्ड बॉर्डर्स’ या संकल्पनेवर आधारित ग्लोबल फ्लॉवर फेस्टिव्हलमध्ये नेदरलँड्स, अमेरिका, जर्मनी, जपान, थायलंड, व्हिएतनाम, स्वित्झर्लंड आणि बेल्जियम यांसारख्या देशांतील फुलांच्या विविध प्रजातींचा समावेश करण्यात आला आहे. (Kolhapur) वेगवेगळ्या देशांतील फुलांचे प्रकार, त्यांचे रंग आणि वैशिष्ट्ये पाहण्याची संधी नागरिकांना मिळत आहे. या महोत्सवासाठी केएसबीपी नॉलेज पार्टनर असून, संकल्पना आणि अंमलबजावणीची जबाबदारी ग्रीन आर्मीने सांभाळली आहे.

ग्लोबल फ्लॉवर फेस्टिव्हलमध्ये पर्यावरणपूरक जीवनशैली आणि घरगुती बागकामाविषयीही मार्गदर्शन केले जात आहे. सेंद्रिय व नैसर्गिक शेतीचे प्रचारक डॉ. दिलीप माळी यांनी घरातील ओला कचरा रस्त्यावर न फेकता त्यापासून कंपोस्ट खत तयार करण्याचे आवाहन केले. या खताचा वापर टेरेस गार्डन आणि किचन गार्डनमधील रोपांसाठी करता येतो, असे त्यांनी सांगितले.‘किचन गार्डनिंग, टेरेस गार्डनिंग व पाण्याची उपयुक्तता’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. स्वयंपाकघरातील काही वापरलेले पाणी योग्य प्रकारे साठवून, त्यातील साबण आणि इतर रसायनांचे प्रमाण लक्षात घेऊनच रोपांसाठी वापरण्याचा सल्ला त्यांनी दिला. फळांच्या सालींपासून तयार केलेल्या एन्झाइमचा योग्य वापर आणि पाण्याचा पुनर्वापर यांसारख्या उपायांमुळे घरगुती बागकामाला मदत होऊ शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कोल्हापूरच्या ओळखीत भर घालणारा महोत्सव ग्लोबल फ्लॉवर फेस्टिव्हलच्या माध्यमातून नागरिकांना एकत्र आणण्याचे काम ‘सकाळ’ माध्यम समूहाने केले आहे. या महोत्सवामुळे कोल्हापूर शहराला वेगळी ओळख मिळत असून, तो राज्यासाठी महत्त्वाचा उपक्रम ठरू शकतो, असे मत आर्मी रिक्रुटमेंट ऑफिसचे संचालक कर्नल प्रशांत सिंग यांनी व्यक्त केले. ‘सकाळ’चे दक्षिण महाराष्ट्राचे सरव्यवस्थापक यतीश शहा यांच्या हस्ते त्यांचे स्वागत करण्यात आले. (Kolhapur) यावेळी प्रियांका प्रशांत सिंग आणि ‘सकाळ’ कोल्हापूरचे सहाय्यक सरव्यवस्थापक (जाहिरात) आनंद शेळके उपस्थित होते.महोत्सवाच्या पुढील सत्रात मंगळवारी सकाळी अकरा ते दुपारी एक या वेळेत दीपाली तायवाडे-पाटील यांची ‘टेरारियम आणि बोन्साय’ या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. फुलांचे सौंदर्य, बागकामाचे ज्ञान, पर्यावरण संवर्धन आणि सांस्कृतिक कार्यक्रम यांचा अनुभव देणारा हा महोत्सव कोल्हापूरकरांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.

हेही वाचा : 

अखेर मोदी सरकारने तो निर्णय घेतलाच कांद्याचा भाव धाडकन कमी सामान्यांना मोठा दिलासा

 महाराष्ट्रात दुष्काळ, आयपीएल २०२७ चे सामने दुसऱ्या राज्यात हलवणार कदाचित संपूर्ण स्पर्धाच भारताबाहेर

शिरोळमधून युतीच्या उमेदवारांना पॅनेल टू पॅनेल मतदानाची ग्वाही