मुंबईत पुन्हा एकदा मुसळधार पावसाने हजेरी लावली असून भारतीय हवामान विभागाने पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. (important)सायन, लोअर परळ, वरळी, दादर, कुर्ला, घाटकोपर, पवई या भागांत जोरदार पावसाचा जोर असल्याचे निरीक्षणात आले आहे. पावसाबरोबर वादळी वाऱ्याचा तडाखा बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ताशी ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांना अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने 1916 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन केलं आहे.
पाणी साचण्याचा धोका, सखल भागांमध्ये विशेष खबरदारी घ्या :
चर्चगेट, महालक्ष्मी, मुंबई सेंट्रल, दादर, माटुंगा, फोर्ट हे भाग सखल असल्याने पाणी साचण्याचा धोका अधिक आहे. (important)काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाच्या सरी सुरू असून हवामान विभागाच्या रडारवर घनदाट ढग आणि वाऱ्याची सक्रियता स्पष्ट दिसत आहे.पावसामुळे निर्माण होणाऱ्या अडचणींचा सामना करण्यासाठी महानगरपालिकेने सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तरीही नागरिकांनी शक्यतो घरातच राहावे आणि पावसाचा अंदाज लक्षात घेऊन प्रवासाचे नियोजन करावे.
मुंबईसह नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यांमध्येही हवामान विभागाने मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. नवी मुंबईतील वाशी, बेलापूर, नेरुळसह अनेक भागांत सकाळपासूनच पाऊस कोसळतो आहे. रायगडमधील अलिबाग, पेण, पनवेल येथेही पावसाचा जोर वाढला आहे. कल्याण-डोंबिवली परिसरातदेखील जोरदार पावसाची नोंद झाली आहे. (important)डोंबिवली पश्चिमेकडील एच-वर्ड रस्त्यावर गुडघाभर पाणी साचल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे. नागरिकांनी स्थानिक यंत्रणांकडे तक्रारी केल्या असून पावसाळ्यापूर्वीच्या तयारीचा फोलपणा उघड झाला आहे.
हेही वाचा :