कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचं मनोमिलन होणार, दोन्ही गट पुन्हा एकत्र येणार, शरद पवार एनडीए मध्ये दाखल होणार, भाजपच्या वळचणीखाली येणार, सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होणार, (Nationalist) अशा प्रकारच्या बातम्या प्रसार माध्यमांमध्ये गेल्या दोन-तीन वर्षांपासून येत राहिल्या. अजूनही येत आहेत. पण या सर्व चर्चांमध्ये किंवा बातम्यांमध्ये शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील यांचे नाव वेगळ्या दृष्टिकोनातून घेतले जात होते. पण राजकारणात निष्ठेला अत्यंत महत्त्व आहे असे स्पष्ट करून मी कोणत्याही पक्षात विशेषतः भारतीय जनता पक्षात जाणार नाही असा सुस्पष्ट शब्दात खुलासा करून त्यांनी त्यांच्या भोवतीचे संशयाचे जाळे काढून टाकले आहे.

सांगलीच्या राजकारणातील एक बडे प्रस्थ आणि जयंत पाटील यांचे विश्वासू सहकारी दिलीप तात्या पाटील यांच्या वाढदिवस कार्यक्रमात बोलताना जयंत पाटील यांनी आपण अन्य कुठेही जाणार नाही असे ठामपणे सांगितले आहे. आता येथून पुढे आपल्याबद्दल अशा प्रकारची चर्चा होऊ नये असा एक संदेश त्यांनी प्रसार माध्यमांना दिला आहे. अजित दादा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी फूट पाडल्यानंतर, सत्तेत सहभागी झाल्यानंतर, देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात एक जागा रिक्त ठेवण्यात आली होती आणि ती जयंत पाटील यांच्यासाठी होती. ते भारतीय जनता पक्षात प्रवेश करतील. (Nationalist) अशी राजकीय हवा आजपकडून तापवण्यात आली होती. गेल्या दोन वर्षात जयंत पाटील यांनी अगदी आकस्मिकपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या वर्षा निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. एकदा तर ते एका पंचतारांकित हॉटेलमध्ये मुख्यमंत्र्यांना भेटले होते. या भेटा भेटीचा अर्थ ते शरद पवार गट सोडणार या बातमीशी लावला जात होता.
जयंत पाटील यांनी मात्र या सर्व बातम्यांचे एक घाव दोन तुकडे अशा अर्थाने खंडन केले नव्हते.माझ्या मतदारसंघातील विकास कामाच्या संदर्भात मी त्यांना भेटलो असा खुलासा त्यांच्याकडून केला जात होता. सत्तेत नसताना पक्ष संघटना कशी चालवायची? असा प्रश्न उपस्थित करून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष पदाची जबाबदारी अलगदपणे शशिकांत शिंदे यांच्यावर सोपवली होती.एकूणच गेल्या दोन-तीन वर्षात जयंत पाटील यांच्या राजकारणा भोवती संशयाचे जाळे तयार झाले होते. अगदी सुरुवातीलाच त्यांना हे जाळे दूर करता आले असते, पण ते राजकारणात असूनही त्यांचा स्वभाव नेमस्त असल्यामुळे संशय कमी व्हायचे ऐवजी तो वाढत गेला होता. त्यांच्या मतदारसंघात झालेल्या दिलीप तात्या पाटील वाढदिवस कार्यक्रमात अगदी पहिल्यांदाच स्पष्ट भूमिका मांडली आणि स्वतःभोवतीचे संशयाचे जाळे त्यांनी दूर केले आहे. मी आहे त्या ठिकाणी चांगला आहे. इतर कुठल्या पक्षात प्रवेश करण्याचा कोणताही विचार नाही.
मी राजकारणात निष्ठेला महत्त्व देतो. माझी शरद पवार गटाशी निष्ठा आहे आणि तिच्याशी आपण प्रतारणा करणार नाही घर सोडायचे नाही असा सल्ला पतंगराव कदम यांनी मला दिला होता. आणि म्हणूनच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे घर मी सोडणार नाही असे जयंत पाटील यांनी जाहीरपणे सांगून माझ्या संदर्भात उलट सुलट बातम्या पेरण्याचे काम आता करू नका असे अप्रत्यक्ष आवाहनही त्यांनी मीडियाला केले आहे.जयंत पाटील हे आता कुठे जाणार नाहीत. शरद पवार जो निर्णय घेतील त्या निर्णयाशी ते बांधील राहतील. पण त्यांनी या संशयाच्या जाळ्यापासून स्वतःची सुटका करून घेताना, मुक्त होताना तसा उशिराच केलेला आहे असे निश्चितपणे म्हणता येईल.
जयंत पाटील यांच्यासारखा केडर बेस असलेला नेता भाजपामध्ये असला पाहिजे. असे दस्तूर खुद्द देवेंद्र फडणवीस यांच्यासह (Nationalist) अनेकांना वाटत होते. म्हणूनच त्यांच्यासाठी मंत्रिमंडळात एक जागा राखून ठेवली गेली होती. अजित दादा पवार हे हयात असताना दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रि करणाबद्दलची चर्चा करण्यात जयंत पाटील हे आघाडीवर होते. त्यांनी अगदी छातीठोकपणे एकत्रीकरणाबद्दलची चर्चा झाली होती आणि एकत्र येण्याबद्दलचा मुहूर्तही ठरला होता असे जयंत पाटील यांनी ठामपणाने सांगितले होते. तसे झाले असते तर शरद पवार गट हा सत्तेत भागीदार बनला असता. अर्थात जयंत पाटील हे मंत्रिमंडळात गेले असते. पण आता त्यांनीच स्पष्ट भूमिका मांडून मी स्वतः कुठे जाणार नाही याची ग्वाही दिली आहे.
हेही वाचा :
अजितदादा, तू कुठूनतरी अचानक येशील, अन् राखी पौर्णिनिमित्त सुप्रिया सुळेंची भावुक पोस्ट?
सप्टेंबर महिना मुंबईकरांसाठी डोकेदुखी ठरणार, साखर, दूधनंतर आता प्रवासही महागणार?
एकामागून एक महाआपत्ती नेपाळच का बनतंय निसर्गाचं ‘फेव्हरेट टार्गेट’?