नाशिकच्या मनमाडमधून राजकारणात खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. नाशिक जिल्ह्यातील मनमाड नगरपालिकेचे शिंदे सेनेचे नगरसेवक मजीद शेख यांचं पद धोक्यात असल्याची माहिती समोर आली आहे.(position) कारण नगरसेवक मजीद शेख यांचे जात प्रमाणपत्र नाशिक विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने रद्द केलं असून ते अवैध असल्याची माहिती आहे. समितीच्या या निर्णयामुळे स्थानिक राजकारणात चर्चांना उधाण आले असून आगामी काळात या प्रकरणाचे दूरगामी परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मजीद शेख यांनी मनमाड नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत ‘मोमीन’ या प्रमाणपत्राच्या आधारे निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांनी विजय मिळवत नगरसेवकपद पटकावले होते. मात्र त्यांच्या जात प्रमाणपत्राच्या वैधतेबाबत निवडणुकीनंतर आक्षेप घेण्यात आला. त्यांचे प्रतिस्पर्धी विजय मिश्रा आणि रिजवाना शेख यांनी संबंधित प्रमाणपत्राविरोधात अपील दाखल करत पडताळणीची मागणी केली होती. (position) यानंतर हे प्रकरण नाशिक विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समितीसमोर सुनावणीसाठी आले. समितीने उपलब्ध कागदपत्रे, पुरावे आणि दोन्ही बाजूंचे युक्तिवाद विचारात घेत सविस्तर सुनावणी केली. सुनावणीनंतर समितीने मजीद शेख यांचे जात प्रमाणपत्र वैध नसल्याचा निष्कर्ष काढत ते रद्द करण्याचा आदेश दिला.
या निर्णयामुळे मनमाडमधील राजकीय वातावरण तापले असून विविध राजकीय पक्षांकडून यावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. विरोधकांनी या निर्णयाचे स्वागत केले असून कायद्याच्या चौकटीत राहून झालेल्या कारवाईचे समर्थन केले आहे. तर मजीद शेख समर्थकांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.(position) दरम्यान, जात पडताळणी समितीच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागण्याचा पर्याय खुला असल्याचे समितीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे मजीद शेख या निर्णयाला न्यायालयात आव्हान देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणामुळे मनमाडमधील राजकारण पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले असून पुढील घडामोडींकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.
हेही वाचा :
तृणमूलमधील फुटीमुळे भाजपला सुवर्णसंधी