कोवळी “पानगळ” रोखली पाहिजे!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी

आर्थिक दृष्ट्या संपन्न असलेल्या कुटुंबातील “एम टेक”झालेल्या उच्चशिक्षित तरुणाने गळफास लावून घेऊन आत्महत्या केली होती. इयत्ता बारावीची परीक्षा नुकतीच उत्तीर्ण झालेल्या, एका प्रतिष्ठित घरातील युवकांने गळफास लावून घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. या दोन्ही आत्महत्या मागील कारणे अद्याप समजलेली नाहीत. (prestigious) गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रात आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे आणि त्यातही युवकांची टक्केवारी वाढलेली असून ती चिंतनीय आहे. आयुष्याचा प्रवास उमलत्या वयातच संपवला जातो आहे, ही कोवळी पानगळ रोखण्यासाठी काय करता येईल याचा विचार समाजशास्त्रज्ञांनी केला पाहिजे.

भारत हा जगामधील युवकांची संख्या मोठी असलेला एक प्रमुख देश आहे. युवकांचा देश म्हणून भारताची ओळख जगामध्ये आहे. देश घडवण्यात, देशाला पुढे नेण्यात युवा शक्तीचेच मोठे योगदान असते. पण याच युवा वर्गातील अनेक जण पलायनवाद स्वीकारून आत्महत्या करण्यासारखी टोकाची भूमिका घेताना दिसत आहेत. गरीब, मध्यमवर्गीय, श्रीमंत, अति श्रीमंत अशा सर्व गटातील तरुण आत्महत्या करताना दिसतात. (prestigious) काही वर्षांपूर्वी महाराष्ट्राचे एका ज्येष्ठ महिला आयएएस अधिकाऱ्याच्या मुलाने बहुमजली शासकीय निवासस्थानाच्या छतावरून उडी मारून आत्महत्या केली होती. तेव्हा संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. अशाच आणखी काही घटनांनी महाराष्ट्र हादरला होता.

19 ते 35 या वयोगटातील तरुणांनी आत्महत्या करण्यामध्ये महाराष्ट्र हा संपूर्ण देशात पहिल्या क्रमांकावर आहे. संपूर्ण देशात महाराष्ट्र राज्य हे आर्थिक दृष्ट्या सधन समजले जाते. पण तरीही इथे तरुणांच्या आत्महत्यांचे प्रमाण चिंता व्यक्त करावी इतके आहे. महाराष्ट्रात दरवर्षी सरासरी 1800 तरुण पलायनवाद स्वीकारून आत्महत्या करतात. म्हणजेच महाराष्ट्रात कोवळी पानगळ वाढताना दिसत आहे. भारतामध्ये जेवढ्या आत्महत्या होतात त्यापैकी 14.7% आत्महत्या या महाराष्ट्रात होतात. त्यात युवकांचे प्रमाण 36 टक्के आहे.आत्महत्या करणारे तरुण किंवा इतर व्यक्ती या आत्मकेंद्रित असतात. त्या आपल्या मनातील भावना इतरांजवळ व्यक्त करत नाहीत. अशा व्यक्ती किंवा तरुण मित्रमंडळींच्या संपर्कात तसेच सहवासात असतात पण त्यातही ते एकाकी असतात. मानसिक आंदोलने किंवा मनातील विचार ही मंडळी इतरांजवळ सांगत नसतात किंवा ते मोकळे होत नसतात. त्यातून त्यांना डिप्रेशन येते. डिजिटल क्रांती झाल्यानंतर कुटुंबातील माणसे एकत्र असूनही वेगवेगळी असल्यासारखी घरातच वावरत असतात. त्यांच्यात संवाद तुटलेला असतो. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धतीत घरातील सदस्य मोकळा वेळ मिळाल्यानंतर परस्परांशी बोलत असत. परस्परांच्या अडीअडचणी सांगत असत. पण आत्ता ते घडत नाही. म्हणून एकत्र कुटुंबात सुद्धा प्रत्येक जण हा वेगवेगळा असतो. तो घरातील सदस्यांशी आवश्यक तेवढेच बोलतो.

एकत्र कुटुंब व्यवस्थेचा ऱ्हास झालेला आहे. आम्ही आणि आमचे दोन अशी चौकोनी व्यवस्था प्रस्थापित झालेली आहे. इतकी कमी संख्या असूनही त्यांच्यात संवाद होतोच असे नाही. डिजिटल क्रांतीची सुरुवात 21 व्या शतकाच्या पहिल्या दशकात झाली. लोकांची जीवनशैली बदलली. ती चंगळवादी झाली. लोकांच्या हातात विशेषता मध्यमवर्गीयांच्या खिशात पैसा येऊ लागला. पण त्याचबरोबर आजची नोकरी उद्या राहील काय अशी अशाश्वत स्थिती निर्माण झाली. (prestigious) त्यातून ताण तणाव वाढत गेले. बदलत्या जीवनशैलीतही अस्थिरता आली आणि मग त्याचे प्रतिकूल परिणाम दिसू लागले. आत्महत्या हा त्यातीलच एक परिणाम म्हणता येईल.शालेय, महाविद्यालयीन युवकांमध्ये आत्महत्या करण्याचे विचार मोठ्या प्रमाणावर येताना दिसतात. विद्यार्थी दशेतील युवकांवर गुणवत्ता टक्केवारीचे ओझे टाकले जाते. तुला या परीक्षेत किमान इतके गुण मिळायलाच हवेत. तुला पुढे विज्ञान शाखेत अभ्यास करावयाचा आहे, तुला डॉक्टर, इंजिनीयर, वकील, विज्ञान व तंत्रज्ञान अर्थात आय टी क्षेत्रात काम करावयाचे आहे असे अपेक्षांचे ओझे पालकांच्याकडून टाकले जाते. त्याचे भयानक दृश्य परिणाम गेल्या काही वर्षांपासून दिसू लागले आहेत.

करियर घडवण्यातील अपयश, अपयशाची वाढत चाललेली भीती, मी परीक्षेत उत्तीर्ण होणारच नाही अशी तयार झालेली मानसिकता, कुटुंबातील कलह, आर्थिक ताण तणाव, नैराश्य आणि व्यसनाधीनता अशी अनेक कारणे आत्महत्या करण्यास प्रवृत्त करत असतात. अशीच स्थिती पूर्वीही होती पण तेव्हा आत्महत्या करावी असे पलायनवादी विचार कुणाच्याही मनात फारसे येत नव्हते. युवकांवर त्यांच्या पालकांनी अपेक्षांचे ओझे टाकले आणि हे ओझे आपणाला पेलता येत नाही अशी त्याची मानसिकता तयार झाली की मग तो आत्महत्याचा विचार करू लागतो. सध्या साक्षरता वाढली आहे, उच्च शिक्षित तरुणांचे प्रमाण प्रचंड वाढवे आहे. पण त्याला स्थानिक पातळीवर त्याच्या शिक्षणाला पूरक असा रोजगार उपलब्ध होत नाही. पुणे, मुंबई, बेंगलोर अशा ठिकाणी नोकरीसाठी जावे लागते. एकूणच आजच्या युवा पिढीसमोर वेगवेगळी आव्हाने आहेत आणि त्या पाठोपाठ येणाऱ्या अडचणी आणि समस्या सुद्धा आहेत. त्याला सामोरे कसे जायचे यासाठीचे आवश्यक असणारे मार्गदर्शन त्याला मिळत नाही. मग तो भांबावतो. विचलित होतो. आई-वडिलांच्या अपेक्षा आपल्याकडून पूर्ण होणार नाहीत या विचाराने तो डिप्रेशन मध्ये जातो आणि मग टोकाचा निर्णय घेऊन आपला जीवन प्रवास ऐन उमेदीच्या काळात संपवून टाकतो. युवा वर्गामध्ये आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढते तेव्हा, समाज चक्रावून जातो. अशावेळी समाजातील बुजुर्ग मंडळींनी युवा पिढीला नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी प्रबोधनाचे काम हाती घेतले पाहिजे. तरच कोवळी पानगळ थांबणार आहे, थांबवता येणार आहे

हेही वाचा :

इंधन दरवाढ की दिलासा? पाहा आजचे पेट्रोल-डिझेलचे ताजे भाव?

1500 की 3000 लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर नेमके किती रुपये जमा?

फोनपे वापरण्यासाठी मोठा झटका नवीन नियम लागू?