सावधान! लपून-छपून लोकांचे व्हिडीओ बनवताय? डिलीट होऊ शकतं तुमचं Instagram अकाऊंट काय आहे नवीन नियम?

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम ने वापरकर्त्यांच्या गोपनीयतेचे संरक्षण करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. मेटाच्या स्मार्ट ग्लासेसचा वापर करून लोकांच्या परवानगीशिवाय त्यांचे व्हिडिओ रेकॉर्ड करून सोशल मीडियावर पोस्ट करण्याच्या वाढत्या प्रकारांवर आता कंपनी कठोर कारवाई करणार आहे. अशा प्रकारचा कंटेंट प्लॅटफॉर्मवरून हटवण्याचा निर्णय (Instagram) ने जाहीर केला आहे.

गेल्या काही महिन्यांत स्मार्ट ग्लासेसच्या मदतीने सार्वजनिक ठिकाणी अनोळखी व्यक्तींचे, विशेषतः महिलांचे, त्यांच्या नकळत व्हिडिओ चित्रीत करून ‘POV’ किंवा ‘पिकअप प्रँक’च्या नावाखाली पोस्ट करण्याचा ट्रेंड वाढला होता. या व्हिडिओंमुळे गोपनीयतेचा भंग होत असल्याची आणि संबंधित व्यक्तींना मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार अनेक वापरकर्त्यांनी केली होती.

(Instagram) प्रमुख Adam Mosseri यांनी स्पष्ट केले की, लोकांचा गैरफायदा घेणारा, त्यांना त्रास देणारा किंवा त्यांच्या संमतीशिवाय तयार करण्यात आलेला कंटेंट प्लॅटफॉर्मवर स्वीकारला जाणार नाही. अशा प्रकारचे व्हिडिओ आढळल्यास ते हटवण्यात येतील आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अकाउंट्सवरही कारवाई केली जाऊ शकते.माध्यमांतील अहवालांनुसार, अशा प्रकारचा कंटेंट पोस्ट करणारी दहा लाखांहून अधिक फॉलोअर्स असलेली काही लोकप्रिय Instagram अकाउंट्स आधीच हटवण्यात आली आहेत. या व्हिडिओंमध्ये सार्वजनिक ठिकाणी लोकांशी संवाद साधताना स्मार्ट ग्लासेसच्या कॅमेऱ्याचा वापर करून गुप्तपणे चित्रीकरण करण्यात आले होते.

दरम्यान, AI-आधारित स्मार्ट ग्लासेसमुळे अशा प्रकारचे व्हिडिओ तयार करणे अधिक सोपे झाले आहे. पारंपरिक स्मार्टफोनपेक्षा हे ग्लासेस सहजपणे संभाषणादरम्यानही रेकॉर्डिंग करू शकतात. त्यामुळे गोपनीयता, संमती आणि वैयक्तिक सुरक्षिततेबाबत नव्या चिंता निर्माण झाल्या आहेत.तथापि, (Instagram)ने अद्याप नियमभंग करणाऱ्या क्रिएटर्सना आधी इशारा दिला जाईल की थेट कारवाई केली जाईल, तसेच वारंवार नियम मोडणाऱ्या अकाउंट्सवर कायमस्वरूपी बंदी घातली जाईल का, याबाबत सविस्तर माहिती दिलेली नाही. मात्र वापरकर्त्यांच्या गोपनीयतेला सर्वोच्च प्राधान्य देत अशा कंटेंटविरोधात कठोर भूमिका कायम राहणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा :

झिम्बाब्वेविरुद्धचा सामना कुठे पाहता येणार? योग्य माहिती जाणून घ्या?

आमदार नारायण कुचे यांच्या कारचा भीषण अपघात ३ जण गंभीर जखमी?

मग अट्टहास कशासाठी केला?