स्वयंघोषित कॅप्टन आणि भोंदू म्हणून ओळखला जाणारा अशोक खरात प्रकरण दिवसेंदिवस अधिक गुंतागुंतीचे होत चालले आहे. अनेक महिलांचे लैंगिक शोषण, अत्याचार, फसवणूक आणि आर्थिक गैरव्यवहार अशा गंभीर आरोपांमुळे आधीच खळबळ उडालेल्या या प्रकरणात नवनवे धागेदोरे समोर येत आहेत. सध्या तुरुंगात असलेल्या खरातची एसआयटीकडून सातत्याने चौकशी सुरू असून, प्रत्येक दिवशी नवीन धक्कादायक माहिती उघड होत असल्याचे समोर येत आहे.
दरम्यान, या प्रकरणाला आता राजकीय वळण लागण्याची (complicated) शक्यता निर्माण झाली आहे. राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या जीवाला धोका असल्याची तक्रार एसआयटीकडे दाखल करण्यात आली आहे. विशेष म्हणजे हा धोका रुपाली चाकणकर यांच्याकडून असल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे. बीड जिल्ह्यातील एका व्यक्तीकडून ही तक्रार करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली असून, या दाव्याची सखोल पडताळणी करण्याची प्रक्रिया एसआयटीने सुरू केली आहे. प्राथमिक तपासात ही तक्रार खोडसाळपणे करण्यात आल्याची शक्यता वर्तवली जात असली तरी, यामागील सत्य शोधण्यासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे.
यापूर्वीही रुपाली चाकणकर यांचे नाव या प्रकरणात चर्चेत आले होते. अशोक खरातसोबतचे त्यांचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर जोरदार टीका झाली होती. खरातच्या ट्रस्टशी त्यांचा संबंध असल्याची माहिती समोर आल्यानंतर राजकीय वातावरण तापले होते. या सर्व घडामोडींमुळे त्यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा तसेच पक्षातील महत्त्वाच्या पदाचा राजीनामा दिला होता.
दरम्यान, या प्रकरणात आर्थिक गैरव्यवहाराचा कोनही अधिक स्पष्ट होत आहे. Enforcement Directorate अर्थात ईडीने अशोक खरातच्या तीन बँक खात्यांवर कारवाई करत ती सील केली आहेत. तसेच त्याची फरार पत्नी कल्पना खरात हिचेही एक खाते गोठवण्यात आले आहे. गेल्या तीन वर्षांतील व्यवहारांची चौकशी करण्यात येत असून, संशयास्पद आर्थिक हालचालींचा तपास सुरू आहे.
एसआयटी आणि ईडी या दोन्ही यंत्रणांच्या संयुक्त कारवाईमुळे अशोक खरातभोवतीचा फास अधिक घट्ट होत चालला आहे. या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, पुढील काही दिवसांत तपासाची दिशा अधिक स्पष्ट होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
हेही वाचा
SBI ग्राहकांनो लक्ष द्या! उद्या ‘या’ वेळेत तात्पुरत्या सेवा बंद राहणार
सांगलीत भोंदूबाबाची एन्ट्री; स्मशानभूमीत आढळली काळी बाहुली अन् सुया, नागरिकांमध्ये दहशत
GPayचं हटके फीचर! आता बँक अकाउंटशिवाय करा UPI पेमेंट; पॉकेट मनी आहे तरी काय?