पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात एक हृदयद्रावक घटना समोर आली असून, बेलसर येथील एका मशरूम उत्पादन केंद्रात कामावर असताना तिघांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. रविवारी सायंकाळी घडलेल्या या भीषण दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, (Purandar) एका सहकाऱ्याला वाचवण्याच्या प्रयत्नात इतर दोघांनाही मृत्यूने कवेत घेतले.

मशरूम युनिटमधील भीषण अपघात बेलसर परिसरातील एका खासगी मशरूम प्रकल्पात ही घटना घडली असून, ड्रेनेज वाहिनीची अडचण दूर करण्यासाठी एक कामगार टाकीत उतरला होता. मात्र, टाकीमध्ये गेल्यानंतर काही वेळातच त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि तो तिथेच अडकला. आपल्या सहकाऱ्याला संकटात पाहून त्याला मदत करण्यासाठी धावलेले इतर दोन कामगारही एकापाठोपाठ एक टाकीत उतरले, (Purandar) परंतु दुर्दैवाने विषारी वायूमुळे तिघांचाही जागीच गुदमरून मृत्यू झाला.साधारण साडेचारच्या सुमारास ही दुर्घटना घडली असून, बराच वेळ कोणीही बाहेर न आल्याने तिथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी तत्काळ मदत कार्य सुरू केले. ड्रेनेज टँकचा वरचा भाग जेसीबी मशीनच्या साहाय्याने तोडण्यात आला आणि त्यानंतर या तिन्ही कामगारांना बाहेर काढण्यात आले. तातडीने त्यांना जेजुरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.
या घटनेत जीव गमावलेले तिन्ही तरुण हे उत्तर प्रदेश राज्यातील देवरिया जिल्ह्याचे रहिवासी होते. पिंटू राजेश प्रसाद , वय २३ वर्ष, व्यास सोहम कुमार वय २२ वर्ष आणि गौतम रामसुरन कुशवाहा वय ३६ वर्ष अशी मृतांची नावे निष्पन्न झाली आहेत. हे सर्वजण पोटाची खळगी भरण्यासाठी आणि कुटुंबाला आधार देण्यासाठी हजारो मैल दूर महाराष्ट्रात आले होते.पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, ड्रेनेज टाकीत साठलेल्या घातक गॅसमुळे ऑक्सिजनची पातळी कमी झाली आणि त्यांचा गुदमरून मृत्यू झाला. (Purandar) याप्रकरणी पोलिसांनी सध्या आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, मृतदेहांचे शवविच्छेदन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सहकाऱ्याप्रती असलेली निष्ठा त्यांच्या प्राणावर बेतल्याने या कामगारांच्या मूळ गावी आणि कामाच्या ठिकाणी मोठी शोककळा पसरली आहे.
हेही वाचा
आता मंत्र्यांसोबत फक्त एकाच व्यक्तीला प्रवेश; मंत्रालयातील गर्दी टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय
हादरवणारी घटना; आंब्याचे आमिष दाखवून अडीच वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार