कर्नाटकची राजधानी बेंगळुरू येथे मुसळधार पावसाने भीषण हाहाकार माजवला असून या नैसर्गिक संकटामुळे एक मोठी दुर्घटना घडली आहे. शहरातील शिवाजीनगर (Heavy rain) परिसरात बोरिंग आणि लेडी कर्झन रुग्णालय जवळील संरक्षक भिंत अचानक कोसळल्याने ७ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या दुर्घटनेत रस्त्यावरील दुकानदार आणि वाटसरूंना जीव गमवावा लागला असून अजूनही काही लोक ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

सायंकाळी पाचच्या सुमारास अचानक हवामानात बदल झाला आणि जोरदार पावसासोबत वादळी वारे, मेघगर्जना आणि गारपीट सुरू झाली. या परिस्थितीपासून बचाव करण्यासाठी अनेक नागरिकांनी रुग्णालयाच्या परिसरात आसरा घेतला होता. मात्र, याच वेळी कंपाऊंडच्या भिंतीचा काही भाग कोसळल्याने तेथे उभे असलेले लोक त्याखाली दबले गेले. घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला आणि बचाव कार्य तातडीने सुरू करण्यात आले.
या दुर्घटनेत तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने चौकशी करण्याचे आदेश दिले असून भिंत कोसळण्यामागील निष्काळजीपणावर नाराजी व्यक्त केली. मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनीही घटनास्थळी भेट देऊन बचाव आणि मदतकार्याचा आढावा घेतला आहे.
हेही वाचा
हिंदू तरूणीचे अपहरण, ५ दिवस घरात डांबून ठेवले; ‘लव्ह जिहाद’ने महाराष्ट्र हादरला
बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! MHT CET परीक्षांच्या तारखा जाहीर