शिराळा तालुक्यातील रिळे गावाच्या हद्दीत कोकरूड-शिराळा मार्गावर पहाटे घडलेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून तिघेजण जखमी झाले आहेत. (horrific accident) या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, योगेश दिलीप पाटील (वय ३५, रा. रिळे) हे आपल्या नातेवाईकांसोबत वरातीहून परतल्यानंतर चुलत भावाच्या घरासमोर रस्त्याकडेला उभे राहून बोलत होते. त्यावेळी कोकरूडहून शिराळ्याकडे भरधाव वेगाने येणाऱ्या टेम्पोने चालकाचा ताबा सुटल्याने थेट या चौघांना जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत योगेश पाटील यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या अपघातात आशिष पाटील, विशाल पाटील आणि सचिन पाटील हे तिघेजण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी टेम्पो चालक अभिजित तानाजी कडवेकर (रा. जांभळेवाडी, ता. शिराळा) याच्याविरोधात शिराळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक उदय पाटील या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
दरम्यान, योगेश पाटील यांच्या कुटुंबावर गेल्या काही महिन्यांपासून दुर्दैवी घटनांची मालिका सुरू होती. सहा महिन्यांपूर्वी त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यानंतर चुलते आणि चुलती यांचाही मृत्यू झाला. आठच दिवसांपूर्वी त्यांच्या आईचा अपघात होऊन पाय फ्रॅक्चर झाला होता आणि त्यांना नुकतेच दवाखान्यातून घरी आणण्यात आले होते. अशातच योगेश यांच्या आकस्मिक निधनाने पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण गाव शोकाकुल झाले आहे.
हेही वाचा
आता OTP शिवाय मिळणार आधार कार्ड, मोबाइल नंबर लिंकचं टेन्शन संपलं; वाचा महत्वाचे बदल
लाडक्या बहिणींना सरकारचा मोठा झटका, या महिलांचे पैसे कायमचे बंद
मोठी बातमी! राजकारणात पुन्हा मोठा भूकंप? भाजप एकनाथ शिंदेंना देणार मोठा धक्का ?