राज्यातील दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी अकरावी प्रवेश प्रक्रियेबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. यंदाही अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना प्रथम ऑनलाइन नोंदणी करणे बंधनकारक असणार आहे. यासाठी mahafyjcadmissions.in
या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन प्रवेश अर्जाचा पहिला भाग भरावा लागणार आहे. (admission process) दहावीचा निकाल उद्या शुक्रवारी दुपारी १ वाजता जाहीर होणार असून, निकालानंतर विद्यार्थ्यांना अर्जाचा दुसरा भाग भरता येणार आहे. या टप्प्यात विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीची दहा महाविद्यालये निवडण्याची संधी मिळणार आहे.

पूर्वी अनेक विद्यार्थी सोयीच्या महाविद्यालयांत प्रवेश घेऊन नीट, सीईटीसारख्या स्पर्धा परीक्षांच्या कोचिंग क्लासेसला हजेरी लावत होते. त्यामुळे महाविद्यालयातील उपस्थिती नोंदी आणि प्रत्यक्ष उपस्थितीमध्ये मोठी तफावत दिसून येत होती. काही विद्यार्थ्यांनी परजिल्ह्यातील महाविद्यालयांत प्रवेश घेतल्याच्या घटनाही समोर आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर माध्यमिक शिक्षण विभागाने गेल्या वर्षी अकरावी प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन केली होती.
यंदा या प्रक्रियेचे दुसरे वर्ष असून १० एप्रिलपासून प्रवेश अर्जाचा पहिला भाग भरण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत राज्यातील सुमारे सात लाख विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. निकालानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणांनुसार आणि पसंतीनुसार महाविद्यालयांचे प्राधान्यक्रम भरता येणार आहेत.
शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना महाविद्यालय निवडताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. अनेक कनिष्ठ महाविद्यालये त्यांच्या प्रवेश क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना प्रवेश देतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्यापूर्वी संबंधित महाविद्यालयाची अधिकृत प्रवेश क्षमता तपासूनच निर्णय घ्यावा, असे सांगण्यात आले आहे.
विशेषतः विज्ञान शाखेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बायोमेट्रिक उपस्थिती बंधनकारक असणार आहे. वर्षभरात किमान २०० दिवस उपस्थिती आवश्यक असल्याने विद्यार्थ्यांनी कोचिंग क्लासेस, प्रवास, वेळ आणि शैक्षणिक नियोजन लक्षात घेऊनच महाविद्यालयांची निवड करावी, असे शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी स्पष्ट केले आहे.
हेही वाचा
सावधान! हातात FASTag धरून टोल भरणे पडणार महागात
कर्ज थकवणाऱ्यांच्या मालमत्तेबाबत RBI चे मोठे पाऊल
मोठी बातमी! एकनाथ शिंदेंचा मोठा अपघात टळला, वादळात अडकलं हेलिकॉप्टर