भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती आज देशभरात (birth anniversary) मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. पहाटेपासूनच विविध सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक संस्थांकडून अभिवादनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. मुंबईतील चैत्यभूमी येथे अनुयायांची मोठी गर्दी उसळली होती. निळ्या पताका, “जय भीम”च्या घोषणा आणि अभिवादनाच्या कार्यक्रमांनी परिसर दुमदुमून गेला होता. अनेक ठिकाणी रक्तदान शिबिरे, व्याख्याने, ज्ञानदान उपक्रम आणि प्रभात फेऱ्यांचे आयोजन करून बाबासाहेबांच्या विचारांना उजाळा देण्यात आला.

या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत डॉ. आंबेडकरांना अभिवादन केले. त्यांनी आपल्या संदेशात बाबासाहेबांचे संविधान निर्मितीतील योगदान अधोरेखित करत त्यांच्या व्यापक सामाजिक आणि आर्थिक दृष्टिकोनाची आठवण करून दिली. “भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून त्यांचे योगदान अतुलनीय आहे आणि पुढील अनेक पिढ्या त्यांच्या ऋणात राहतील,” असे ते म्हणाले.
राज ठाकरे यांनी यावेळी बाबासाहेबांच्या अर्थशास्त्रातील अभ्यासाचाही विशेष उल्लेख केला. रुपयाच्या घसरणीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी बाबासाहेबांनी लिहिलेल्या ‘The Problem of the Rupee: Its Origin and Its Solution’ या ग्रंथाची आठवण करून दिली. या ग्रंथातील विचारांनीच पुढे Reserve Bank of India स्थापनेचा पाया घातला, असे त्यांनी नमूद केले.
तसेच त्यांनी आजच्या राजकीय आणि सामाजिक वातावरणावरही भाष्य केले. केवळ जयंती आणि पुण्यतिथींना मिरवणुका काढणे, कर्कश्य डीजे लावणे किंवा पुतळ्यांपुरतेच महान नेत्यांचे स्मरण मर्यादित ठेवणे योग्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांसारख्या महान व्यक्तिमत्त्वांच्या विचारांचा सखोल अभ्यास करून ते आचरणात आणणे हीच खरी श्रद्धांजली असल्याचे त्यांनी सांगितले.
राज ठाकरे यांनी पुढे म्हटले की, सध्याच्या काळात विकासाची व्याख्या केवळ पायाभूत सुविधांपुरती मर्यादित ठेवली जात आहे. मात्र समाजातील मोठा घटक अजूनही या विकासापासून वंचित आहे. अशा वेळी बाबासाहेबांसारख्या व्यापक सामाजिक आणि आर्थिक दृष्टी असलेल्या नेत्यांच्या विचारांची गरज अधिक तीव्रतेने जाणवते.
एकूणच, बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त दिलेल्या संदेशातून केवळ औपचारिक अभिवादन न करता त्यांच्या विचारांचा अंगीकार करण्याचे आवाहन करण्यात आले असून, सध्याच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवरही भाष्य करण्यात आले आहे.
हे ही वाचा ;
मोबाईलच्या किमतीत मोठी वाढ; जाणून घ्या कोणत्या कंपनीचे फोन किती महाग झाले?
लाडक्या बहिणींची अर्जप्रक्रिया पुन्हा सुरु होणार? आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं
दहावी, बारावीच्या निकालाबाबत महत्त्वाची अपडेट, या दिवशी लागण्याची शक्यता