अमेरिका, रशियापेक्षा फ्रान्सच्या राफेल विमानावर फक्त भारताचाच नाही तर जगातल्या अनेक देशांचा इतका विश्वास का?

अमेरिका आणि रशियाने पाचव्या पिढीच्या फायटर जेट्सच्या शर्यतीत मोठी आघाडी घेतली असली, तरी फ्रान्सच्या राफेलने वेगळ्याच कारणांमुळे जगभरात (fighter jets) आपली छाप निर्माण केली आहे. F-22 Raptor, F-35 Lightning II आणि Sukhoi Su-57 ही अत्याधुनिक स्टेल्थ फायटर जेट्स रडारपासून लपून हल्ला करण्यासाठी ओळखली जातात. मात्र फ्रान्सने अजून पाचव्या पिढीचं विमान विकसित केलं नसतानाही Dassault Rafale हे 4.5 जनरेशनचं विमान अनेक देशांची पहिली पसंती ठरत आहे.

भारतासह आखाती देशांनी राफेलवर दाखवलेला विश्वास केवळ त्याच्या तांत्रिक क्षमतेमुळे नाही, तर त्याच्या बहुउद्देशीय वापरामुळे आहे. सध्या भारताकडे 36 राफेल विमानं कार्यरत असून आणखी 114 विमानांच्या खरेदीची चर्चा सुरू आहे. फ्रान्सच्या Dassault Aviation या कंपनीने विकसित केलेल्या या विमानाची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्याची प्रचंड मारक क्षमता आणि अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक युद्ध प्रणाली.

राफेलमध्ये असलेली स्पेक्ट्रा प्रणाली हे त्याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य मानलं जातं. ही प्रणाली विमानाभोवती एक प्रकारचं डिजिटल स्टेल्थ कवच तयार करते, ज्यामुळे शत्रूच्या रडारपासून बचाव होतो. त्याचबरोबर येणाऱ्या क्षेपणास्त्रांची दिशाभूल करण्याची क्षमता देखील यात आहे. त्यामुळे प्रत्यक्ष स्टेल्थ नसतानाही राफेल अत्यंत सुरक्षित आणि प्रभावी ठरतो.

या विमानात आरबीई 2 एईएसए रडार बसवण्यात आला आहे, जो एकाचवेळी अनेक लक्ष्यांचा शोध घेऊ शकतो. यामुळे हवेतल्या लढाईत राफेलला मोठा फायदा मिळतो. त्याशिवाय Meteor missile हे अत्याधुनिक क्षेपणास्त्र राफेलची ताकद अधिक वाढवतं. मॅक 4 वेगाने 150 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर लक्ष्य भेदण्याची क्षमता असलेलं हे मिसाइल डॉगफाईटमध्ये निर्णायक ठरतं.

राफेलचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्याची 9,500 किलोपर्यंत शस्त्रास्त्र वाहून नेण्याची क्षमता, ज्यामुळे ते एकाचवेळी विविध प्रकारची मोहिम पार पाडू शकतं. स्टेल्थ फायटर नसतानाही अत्याधुनिक तंत्रज्ञान, अचूक हल्ल्याची क्षमता आणि उच्च सुरक्षा यामुळे राफेल आजच्या घडीला जगातील सर्वाधिक विश्वासार्ह फायटर जेट्सपैकी एक मानलं जात आहे.

हेही वाचा

आता मंत्र्यांसोबत फक्त एकाच व्यक्तीला प्रवेश; मंत्रालयातील गर्दी टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय

हादरवणारी घटना; आंब्याचे आमिष दाखवून अडीच वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार

कॅन्सरची सुरूवातीची लक्षणे कोणती?